मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४२१ ते ४२५

पदसंग्रह - पदे ४२१ ते ४२५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४२१.
रामा रे तुझे कृपेविण न कळे ॥धृ०॥
मिथ्या माया ह्मणती लोकीं परि ते सुटेना कीं ॥
विराग्य शब्दापोटीं भोगी न सुटे मिठी व्यर्थ करितो चावटी ॥१॥
सांगोपांग करी चर्चा परि अनुभव केंचा ॥
पाठ ज्ञानाचे शब्द तेणें नव्हेचि बोध कैसा तुटेल भवबंद ॥२॥
अनुभव नाहीं नेटें बोटें ह्मणउनि हें मिथ्या वाटे ॥
निजानंद चरणीं रंग तरीच सर्वही सांग अन्यथा जाणावें सोंग ॥३॥

पद ४२२.
रामकृष्णा वसुदेवा अखंड घडो तुझी सेवा ॥ उरलेनि आयुष्यें गा संतसंग मज यावा ॥धृ०॥
अष्ट वर्षें शूद्रवत्‌ व्यर्थ आयुष्य गेलें ॥ पनयन करुनियां द्विजत्व दिधलें ॥
विद्याभ्यास करितां हो विप्र नाम हें आलें ॥ सद्नुरुनें कृपाद्दष्टीं वासुदेवचि केलें ॥१॥
ज्याच्या वीर्याच्या तीन धातु जनिता बोलिजे पिता ॥ उपनयन करी जो गोपिता दुसरा तत्वता ॥
विद्याभ्यास करविता पिता तिसरा तत्वता ॥ अन्नदाता भयत्राता चवथा पांचवा पिता ॥२॥
ऐसे पांच पिते जगीं होती  तैसे नाहीं मज झालें ॥ जनिता उपनयन पितयानेंचि केलें ॥
ब्रह्मविद्या देउनियां अन्नें शरीर पोषिलें ॥ भवभयापासुनियां आपणचि सोडविलें ॥३॥
ऐसा सत्य पिता एक जगीं बापचि झाला गुरू ॥ संसारसागरीं गा उतरिला पैलपारू ॥
निजसुखें रंगुनी आपणचि झाला तारूं ॥ ब्रह्मांडीं कीर्ति ज्याची बाप निजानंद गुरू ॥४॥

पद ४२३. [अभंग]
माझें ध्यान निजानंद मन निजानंद ॥
जीवन निजानंद जीवनकळा रे ॥धृ०॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान अवघा निजानंद घन ॥
द्दश्य द्रष्टा निजानंद तोचि दर्शन ॥१॥
निजानंद तनु मन निजानंद माझें धन ॥
पाहाणें पाहातां जन वन निजानंद ॥२॥
निजानंद कार्यकर्ता कारणहि तोचि आतां ॥
भोग्य भोगणें भोक्त निजानंद ॥३॥
संग निजानद नि:संग निजानद ॥
रंग निजानंद रंगातीत ॥४॥

पद ४२४.
सिद्ध जग जोगी जागत ॥ डोरे विवेक गर्जत ॥
शिंगी वाजे अनुहत ॥ तुं तुं ह्यणउनी सांगत ॥धृ०॥
सिद्ध निजानंदघना ॥ जगव्यापक जगज्जीवना ॥
क्षेत्रपाळा तूं क्षेत्रज्ञा ॥ महिमा अपार कळेना ॥१॥
पुढें पाउलाची देखी ॥ मागें न व्हावें साधकीं ॥
एका भावें श्रवण झांकी ॥ सिद्ध खुणा दाखवी लोकीं ॥२॥
शांती-विभूतीलेपन ॥ बाप वैराग्या भूषण ॥
करी स्वधर्मस्थापन ॥ जना दावी तो करुन ॥३॥
वाचे अलक्ष बोलणें ॥ अनात्मा नाहीं ह्मणे ॥
सिद्ध सर्वही देखणें ॥ मयुरपत्राचिये खुणें ॥४॥
मन न राहे चपल कामीं ॥ तया भुवनतीर्थं नेमीं ॥
भगवें दावी माझा स्वामी ॥ भिक्षा तयाप्रती ने मी ॥५॥
ऐसा नेणती गोसावी ॥ तया कानीं मुद्रा दावी ॥
आत्मचिंतनासी लावी ॥ एकांत ह्मणे सेवीं ॥६॥
सिद्ध निजानंदराय ॥ कीर्ती ब्रह्मांडीं न माय ॥
माझें जीवन तुझे पाय ॥ चरणीं रंगल्या निर्भय ॥७॥

पद ४२५.
मृदंग-टाळ-घोषें टाळी वाजवा रे ॥ जीवींचे जीवन निज रामंरगी पालवा रे ॥
अवघे हातो-पातीं रामासि विनवा रे ॥ माझें बंधन तोंडा ह्मणा राघवा रे ॥१॥
काम क्रोधें बहुत मज व्यापिलें रे ॥ मदमत्सरें जीव्हार. माझें भोदिलें रे ॥
आशा तृष्णा सर्पिणीनं डंखिलें रे ॥ दंभ अहंकारें शरिर खोंचिलें रे ॥२॥
संत भक्त तुमची मी दासी ॥ तुह्मीं अवघे बोलवा रामासी ॥
आतां धीर न धरवे मानसीं ॥ किती अंत पाहासी ह्मणा राघोबासी ॥३॥
राम निजानंदघन माय बाप ॥ रामा तोडावे माझे त्रिविध ताप रे ॥
रंगीं रंगुनियां हरीं संताप रे ॥ प्रेम देईं आपुलें उमाप रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP