मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ११६ ते ११९

पदसंग्रह - पदे ११६ ते ११९

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ११६. (चाल-आतां राम पायीं)
सये पुंडरीक-वरद हा रुक्मिणीरमण हरि समपदीं कां उभा गे ॥
समनयन समकटीं ठेवुनि करतटीं राहिला कां तुझ्या चंद्रभागे ॥धृ०॥
चंद्रभागा म्हणे सिद्ध प्रज्ञे तुझे प्रश्न मीं सांगतें ऐक बाई ॥
प्रवृत्ती निवृत्ति उभय पक्ष हे जन म्हणे अनुभवें समपदीं विषम कायी
अद्वितिय ब्रह्म हें वर्म सुजनाप्रती सुचविलें या मिषं जाण पायीं ॥
स्थिरचरीं हरि एक समनयनीं देखणें आपणासि आपणें सर्व ठायीं ॥१॥
ठेविलें समतटीं कर सतत म्हणसि कां तरि परिस तूं अभिप्राय याचा ॥
निरतीशयं निश्वयें ब्रह्मफळ मी स्वयें देतसें दान मज मी त्रिवाचा ॥
उभय कर लाउनि आत्मफळ देउनि भ्रम हरिन मी ह्मणें या भवाचा ॥
दानपात्नें भक्त अविमुक्त सहज ते सेवितां स्वाद मम वैभवाचा ॥२॥
तव तिरीं श्रीहरी कां उभा म्हणसि तरि भाव धरी श्रवण करी बुद्धी माये ॥
ज्ञानहीनें दिनें भजनविहिनें हरीदर्शनें त्रिविध भवताप जाय ॥
ह्यणउनि अचळ भूवैकुंठ पंढरीं वैखरी वर्णितां गम्य काय ॥
पूर्ण निज रंग हा पांडुरंग स्वयें अंडकोटिंतहि जो न माये ॥३॥
कसी बोधली बुद्धि स्वानंदबोधें ॥ वेधली पुंडरीकवरद-वेधें ॥धृ०॥

पद ११७.
श्रीहरीसम ऐसी माउली कैंची ॥ महिमा लव नेणें स्तवितांही विरंची ॥धृ०॥
जळबिंदुचें करुनियां निर्माण संरक्षी गर्भीं सर्वस्वें आपण ॥
प्रसुतीची व्यथा हरुनियां दारुण ॥ जन्मवी मार्ग देउनियां नारायण ॥१॥
अस्थि मांस रक्त मळ मूत्र त्यांतून ॥ दुग्ध हें कवणें केलें वो उत्पन्न ॥
वाढविलें बाळा देउनि स्तनपान ॥ क्षिरसागरवासी पाळितो विश्वजिवन ॥२॥
अन्नोदक वसनें देउनियां नित्य ॥ प्रतिपाळित सकळां माता ते हें सत्य ॥
सद्रुरु निज स्वरुपें वारुनि अनित्य ॥ सहज पूर्ण रंगें हरिले जन्म मृत्य ॥३॥

पद ११८.
हरिस न भजतां कां उपजों उपजों ॥ मरतो ॥ पामर तो ॥धृ०॥
किती सांगावें सविस्तर ॥ प्राणी जड मुढ केवळ प्रस्तर ॥
मोठा क्रूर भवार्णव दुस्तर ॥ कैसा भजनेंविण तरतो ॥१॥
कैं तो मानिल विषवत्‌ विषय ॥ कैं त्या होईल मनोजय ॥
कैं त्या वासनेचा क्षय ॥ होउनि दुस्तर निस्तरतो ॥२॥
श्रीहरिभजनपरायण होतां ॥ तरि तो निज रंगें रंगतां ॥
सहजें दु:संग भंगतां ॥ मागें मागें कां सरतो ॥३॥

पद ११९.
हरिहरि हरि भवकरिस नासस्मरणमात्रें ॥
विभांडुनि कुंभस्थळें विदारिलीं गात्रें ॥धृ०॥   
कैंचा भवनाग मिथ्या मृगजळवत्‌ नामीं ॥
मुनिमन विश्रामधामीं पूर्ण अवाप्त कामीं ॥१॥
हरिसम हरिभक्त नित्यमुक्त हरीस्मरणें ॥
मिथ्या बंध मोक्ष मिथ्या जन्म आणि मरणें ॥२॥
नामीं अनाम ब्रह्मप्राप्ती भक्तिभावें ॥
सर्व रंगीं निजानंद सहज स्वभावें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP