मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६३ ते ७०

पदसंग्रह - पदे ६३ ते ७०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६३.
भय मीपण-संगें जडलें ॥धृ०॥
मी मी ह्मणतां कापिती मान ॥ तूं म्हणतां तूं तिचा माना ॥१॥
देह गेह सुत कांचन कांता ॥ माझें म्हणतां उपजे चिंता ॥२॥
मुळिंचा मी निजरंग त्यजुनी ॥ माझें म्हणतां भय उत्पन्न ॥३॥

पद ६४.
पहा वय व्यर्थचि गेलें रे ॥ध्र०॥
या नरदेहीं श्रीगुरु-भजनें ॥ कांहीं स्वहित न झालें रे ॥१॥
विषय-विलासीं गुंतुनि गेलें ॥ काय बरें हें केलें रे ॥२॥
मृगमद नाभिसिं असतां नेणुनि ॥ भ्रमतां भ्रमतां मेले रे ॥३॥
निज रगें रंगेना तैं हे ॥ जीतचि मेले रे ॥४॥

पद ६५.
कारण श्रीगुरु राज दया ॥धृ०॥
भव-तम-नाशक-चिद्भानू हा ॥ यावयास दया ॥१॥
शांति क्षमादिक दैवी-संपत्ति ॥ यावया ह्रदया ॥२॥
पूर्णनंदें रंगुनि जड जिव ॥ पावति निजपद या ॥३॥

पद ६६.
हरि करुणा-निलया ॥ विलया ने दुस्तर माया ॥
निरसुनि ह्रत्तम शांत मन त्वत्पद-जलरुह-युगुल नमाया ॥धृ०॥
क्रुरतर भवपुरविषय आवर्तीं पडलों सतत भ्रमाया ॥
जन्म मरण संसरण भोतिता झालों पात्र श्रमाया ॥१॥
विषयासक्त मी शक्त नव्हें हा इन्द्रियसमुह दमाया ॥
त्यजुनि रमावर करिल कवण नर जप-तप-यम-नियमा या ॥२॥
दीनदयालय मां परिपालय नासुनि अंधतमा या ॥
निजानंदें रंग रंगवीं सच्चित्स्वरूपिं रमाया ॥३॥

पद ६७.
सेवूं राम रसायन या ॥धृ०॥
भवज्वरनाशक पोषक नवविध ॥ औषध घेऊं या ॥१॥
अनन्यभावें मागति त्यांसहि ॥ मात्रा देऊं या ॥२॥
नित्य निरामय निजसुख रंगीं ॥ मानस ठेवूं या ॥४॥

पद ६८.
पाहुं चला पंढरपूरपती ॥धृ०॥
विधु-भागातट निकट निकेतन ॥ निर्जरवर जपती ॥१॥
कामादिक ज्याचें नामचि घेतां ॥ विलपती लपती ॥२॥
शुक सनकादिक निज रंगें ज्याच्या ॥ दर्शना टपती ॥३॥

पद ६९.
बुडालों ब्रह्मानंदजळीं ॥धृ०॥
याति-कुळासह वर्णाश्रम गुण ॥ नाम-रुपें समुळीं ॥१॥
एकसरें तळ घेउनि आलों ॥ निमसुख कल्लोळीं ॥२॥
निजरंगें रंगुनियां ठेलों ॥ मी अहळीं बहळीं ॥३॥

पद ७०. राग झंपा.
आतां राम पायीं मना लाग वेगें ॥
सोसिले बहुत अन्याय मागें ॥धृ०॥
जन्मजन्मांतरीं मास नव दाथरीं निरय शेजेवरी जठरकूहरीं ॥
घातलें अघपुरीं शिणविलें यापरी काय सांगों तरी दु:खलहरीं ॥१॥
न निघतां बाहेरी जेविं ओढे सरी जन्मद्वारीं करी अटक भारी ॥
जन्मलीया वरी मूढ वृत्ती धरी रडत कोहं स्वरीं देहधारी ॥२॥
श्वान सूकर खरा मार्जरा वानरा कृमिकिटकांतरा पाप योनी ॥
जन्मलों त्यांचिये उदरिं मी जेधवां अभक्ष्य तें भक्षीयलें न समजोनी ॥३॥
बाळपण न कळतां वेंचलें वय वृथा तरुणपणिं योषिता संग नाडी ॥
वृद्धपण आलिया गलिततनु झालिया स्मरणपद गेलिया काळ ताडी ॥४॥
पूर्णपुण्यें आतां जाहलों जन्मतां मानवी तत्वता देह धरुनी ॥
येथ नाना पिडा तापत्नय रोकडा नीघ तूं झडझडां स्वहित करुनी ॥५॥
पुनरपी सांगणें हेंचि तुज मागणें दिननिशीं जागणें रामभजनीं ॥
निगम आगमें बरें दाविती जें खरें तेंचि तूं आचरें विषय त्यजुनी ॥६॥
दोष-दर्शन न पाहा सतत भजनीं राहा लावुनि देह हा रामकाजीं ॥
रंगसी निजपदीं मोहमाया नदी आटली जाण घे भाक माझी ॥७॥
पूर्ण निजरंग नि:संग टाकुनि मना सर्वदां विचरसी कामधामीं ॥
हो आतां तरि तुतें सांगतों स्वहित तें ऐकसि तरि मूढा रंग रामीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP