मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २०६ ते २१०

पदसंग्रह - पदे २०६ ते २१०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २०६.
संतनाममाळा शोभे कंठीं ॥
तो नर इहलोकीं परि वैकुंठीं ॥धृ०॥
मृत्यलोकीं साधुसंतसमागम इच्छिती सुरवर राहुनि स्वर्गीं ॥
दुर्लंभतर नरहरिजनदर्शन करुनि लागों म्हणती मोक्षमार्गीं ॥१॥
सगुण ब्रह्म साधुसंत मूर्तिमंत आदि न अंत न मध्य जयासी ॥
गाररूपें जळनिर्मळ केवळ दीनदयाळ ते वैकुंठवासी ॥२॥
ज्यासि हरिप्रिय ते हरिचे प्रिय अद्वय अक्रिय स्वानुभवी ते ॥
तो निजरंग न जाणति मानव-दानव-रूप सदैव भवीं ते ॥३॥

पद २०७
आम्हीं दासिंच्या पडदासी विद्वद्वर्यांचे घरिंच्या ॥
द्दष्टिसि सृष्टिच नाहीं कांहीं आहों या परिच्या ॥धृ०॥
सज्जनसेवा-बळें द्दष्टिसि नाणूं कवणाला ॥
भेवूंना सर्वथा त्या लंकेच्या रावणाला ॥१॥
नव्हों साबण सुडक्या बुडक्या मृगजळिं मारायाच्या ॥
सज्जनसेवाबळें भवनिधि तरोनि तारायाच्या ॥२॥
अक्षयी प्रशस्त निर्मळ निराकार निजधाम ॥
बुद्धयादिकांसि उसंत नाहीं परि पूर्णकाम ॥३॥
तत्पद-पद्मपरागीं भ्रमरी होउनि दिनरजनीं ॥
परमामृतरसपानें तन्मय चिन्मय निजभजनीं ॥४॥
पिता माता भ्राता सुत पति कुळदैवत संत ॥
नि:शब्द शब्दें गीतीं गाऊं होउनि निभ्रांत ॥५॥
निजानंद रंगें रंगुनि चित्सुखभुवनीं ॥
सहज पूर्ण समसाम्यें जैना जीवन-बिंदू जिवनीं ॥६॥

पद २०८. (चाल-अभंग)
व्हावें पायाळा अंजन ॥ तेव्हां द्दष्टिसी दिसे धन ॥धृ०॥
साधु संतांचीं लक्षणें ॥ काय जाणावीं विचक्षणें ॥१॥
बहिर्मुख द्दश्य द्दष्टीं ॥ पाहातां व्यर्थचि होती कष्टी ॥२॥
कृपण ठेवणें निक्षेपी ॥ तैसा साधु चिन्हें लोपी ॥३॥
मृगजळाचा तरंग ॥ तैसा दिसे बाह्म रंग ॥४॥
सजिं सहज ते निजांगें ॥ रंगीं रंगले पूर्ण रंगें ॥५॥

पद २०९.
मी आत्माराम पूर्णब्रह्म पूर्णका ॥धृ०॥
विश्वपटीं पोतप्रोत चित्तंतु मी अनुस्यूत ॥ नाहीं यातिकूळ ना रूपनाम ॥१॥
अनंत ब्रह्मांडें पोटीं त्याची वार्ता ना गोष्टी ॥ तेथें कैंचा हा गुणग्राम ॥२॥
सहज पूर्ण रंग निजानंद नि:संग ॥ मुनिजन-विश्राम निजधाम ॥३॥

पद २१०.
वय वायां गेलें कांहिंच स्वहित न केलें ॥धृ०॥
घाणा वाळु गाळुनि व्यर्थचि मंथन ॥ जळीं मज झालें ॥१॥
हरिविण विषयविलासीं गुंतुनि ॥ स्मरणचि अवघें नेलें ॥२॥
श्रमतरुचें फळ श्रमची केवळ ॥ दु:ख विभागा आलें ॥३॥
मृग मद मद नाभिसीं असतां नेणुनि ॥ भ्रमतां भ्रमतां मेले ॥४॥
निजरंगें रंगेना कां हें ॥ भवोदधींत बुडालें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP