मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५१ ते ५३

पदसंग्रह - पदे ५१ ते ५३

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५१. आरती सप्रेम० या चालीवर.
शरण रिघा गुरुवर्या आत्मानात्मविवेक करा ॥ दुस्तर भवनिधितारक नावाडयाचे पाय धर ॥धृ०॥
कांहि तरि निज स्वहिताचा विचार न करावा कां जी ॥ त्यागुनि परमामृत मज गमतें सेवितसां कांजी ॥
दुर्लभ नरतनु हे क्षणभंगुर लावा निज काजीं ॥ शाश्वत निजसुख त्यागुनि व्यर्थचि जातां नरका जी ॥१॥
देखत अंध बधीर श्रवणीं ऐकत असतांही ॥ जाणत जाणत वेडे होतां कांहीं ना बाही ॥
मी माझें जें ह्नणतां तें तंव मृगजळवत पाहीं ॥ जन्ममरण संसरणपुरींया पडिलां प्रवाहीं ॥२॥
पंच भुतात्मक द्दश्य विकारी जड मूढ आद्यंतीं ॥ जन्म निरर्थक होईल ऐसें जाणुनियां संतीं ॥
निगमाचार्य स्वमतें समुळीं सांडुनि भवभ्रांती ॥ निजरंगें रंगले पूर्ण अच्युतानंतीं ॥३॥

पद ५२. बोलणें पोल झालें या चा०
त्याला मानव लोकीं ॥ हरि ह्मणे मी मानवलों कीं ॥धृ०॥
परात्पर परमहंस सुविचार ॥ निवडुनि क्षीर नीर सारा-सार ॥
सेविति मुक्ताफळ संभार ॥ ब्रह्मानंद मानसीं ॥१॥
निष्कामना निरहंकृती ॥ भगवद्भाव सर्वांभूतीं ॥
पूर्ण दया क्षमा शांती ॥ दैवी संपत्तिचे भोके ॥२॥
संचित क्रियमाण प्रारब्ध ॥ ब्रह्माग्नीनें झालीं दग्ध ॥
नित्यमुक्त शुद्धबुद्ध ॥ हरिगुरु भजन परायण जे ॥३॥
हरिजन हरिसम नि:संशय ॥ निगमागमिचा कृतनिश्चय ॥
नामरुपातित निर्गुण अद्वय ॥ पूर्ण प्रत्यय हा ज्यांचा ॥४॥
पूर्ण परमामृतें तृप्त ॥ सच्चित्सुखघन जीवन्मुक्त ॥
जगदोद्धारी भगवद्भक्त ॥ निजानंदें रंगलें ॥५॥

पद ५३.
कायापुर पाटणीं राजा मन ॥ राज्य करितां जाहला उन्मन ॥
ऐका हो त्याची कथा सावधान ॥ मुमुक्षु मुक्त भक्त विरक्त जन ॥धृ०॥
राजपल्या मुख्य दोघी जणी ॥ निवृत्ति प्रवृत्ति पतिव्रता साजणी ॥
धाकुटी प्रीतिपात्न झाली राणी ॥ सर्वदां ती बोलाची शिराणी ॥१॥
तिनें जें केलें ते त्यासी न मोडे ॥ प्राणाहुनि अंतरीं आवडे ॥
नाचवी तैसें नाचे हो तीपुढें ॥ स्वस्वरुप स्मरणीं झालें केवळ वेडें ॥२॥
पुरुष वश्य झालासे ह्मणवुनी ॥ आबह्मस्तंभ व्यापिलें कामिनी ॥
पाहूंही नेदी निवृत्तीसी नयनीं ॥ आपण चि अवघी अशनीं ॥३॥
ज्येष्ठ वनिता निवृत्ति नावडती ॥ तीयेतें कोण्ही न पुसे कल्पांतीं ॥
वंध्यादोषें न देखे विश्रांती ॥ गर्जती श्रुती ना पुत्न लोकोस्ति ॥४॥
वर्जिली दुरी दिगंतीं जे होती ॥ पुण्यें मनें ते एकांतीं ॥
अनुभवितां सुख शेज निवृत्ति ॥ संभवला उदरीं गर्भ तो निश्चिती ॥५॥
प्रबोधचंद्र जन्मला सुपुत्र ॥ सुलक्षणी पावन पवित्र ॥
ऐकोनि हा वृत्त त विचित्र ॥ प्रवृत्ति ह्मणे बुडविलें कुळगोत्र ॥६॥
आतां बाई कायवो करावें ॥धृ०॥   धृ०
माझी माता ममता मोह पिता ॥ कामादि साही बंधु हे तत्वता ॥
आशा तृष्णा कल्पना दुहिता ॥ पाहातां यांसी ठाव कैंचा वो आतां ॥७॥
पडिलें आतां संसारासी पाणी ॥ खुंटली माया माहेर येणीं जाणीं ॥
भ्रतार हिरोनि नेलागे साजणी ॥ परतोनि सहसा न पाहे तो प्राणी ॥८॥
शुद्धसत्व सत्य सद्भाव विश्वास ॥ भूतदया नित्य सद्धुद्धि संतोष ॥
धारणा धैर्य निर्लोभ अविनाश ॥ पर्वकाळ यांचा तेणं विशेष ॥९॥
स्वानुभव विवेक वैराग्य ॥ शांति क्षमा उपरति त्या योग्य ॥
मिळाली दैवी संपदा सभाग्य ॥ भेदाभेद गेले झाले आरोग्य ॥१०॥
प्रवृत्ति निवृत्ति दो हीसी निरसुनी ॥ पूर्ण ब्रह्म मन झालें उन्मनी ॥
अनुहात ध्वनी न समाय गगनीं ॥ निजानंद रंगला जनीं वनीं ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP