मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३१६ ते ३२०

पदसंग्रह - पदे ३१६ ते ३२०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३१६. (चाल-कामाचे मजुर.)
रामरंगें रंगली ये बाई वो ॥धृ०॥
पंचभूत सर्व सृष्टि ॥ कर्ता काय द्दश्य द्दष्टि ॥ अंतरंग भासे ठायीं ठायीं वो ॥१॥
देहादि इंद्रियें प्राण ॥ चित्तचतुष्टय जाण ॥ रामरूपीं वाव सांगों कायी वो ॥२॥
सहज पूर्ण निजानंद ॥ हाही जेथें बोल मंद ॥ अनिर्वाच्य रंगुनियां पायीं वो ॥३॥

पद ३१७. (राग कलंगडा.)
निर्लज्जा साधिलें काज काय रे ॥ गर्भभोंर श्रमविली माय रे ॥धृ०॥
अमृताचे ताटीं जाण ॥ कांजी वोगरुनी प्राण ॥ रक्षणासि सेविसी रसोय रे ॥१॥
इंद्रियां देउनी लळे ॥ कांसया झांकिले डोळे ॥ काळ वेळ टाळिला नव जाय रे ॥२॥
कामची आंदण दासी ॥ क्षोभाची केवळ रागी ॥ मोहें नाडलासी हाय हाय रे ॥३॥
मानवी देहाचें भाग्य ॥ कैवल्यपदासी योग्य ॥ धि:कारिलें केवीं तृणप्राय रे ॥४॥
सार हा उपाय रे ॥ निजानंदें राहें रे ॥ प्रेमरंगं शिरीं धरीं पाय रे ॥५॥

पद ३१८. (राग व चाल-सदर.)
मना नाचविसी काय बाह्म सोंग रे ॥ जाहला नाहीं अंतरंग रे ॥धृ०॥
वरदळ वेष रे नाहीं सुकलेश रे ॥ यश केविं पावसी निर्दोष रे ॥१॥
वोडंबरीं भाव रे जळीं बक ठेवि पाव रे ॥ वायस बोलतो काव काव रे ॥२॥
सर्व अंतवंत रे साक्षि भगवंत रे ॥ सर्वज्ञ बोलति साधुसंत रे ॥३॥
साधुसंगें सार रे ॥ श्रुतिचें जिव्हार रे । नेणसी तैसाच भूमिभार रे ॥४॥
श्रुतिवाद मंद रे तरिच निजानंद रे ॥ रंगुनियां सांडीं नाना छंद रे ॥५॥

पद ३१९.
राहें राहें रे भुललासि मना ॥ दु:खदायका सांडि कामना रे ॥धृ०॥
जन रंजवुनि करिसि चारा ॥ जाहलें हित काय येणें अविचारा रे ॥१॥
वेष साजीरा सैरणी दावी ॥ सती उत्तम काय ते वदावी रे ॥२॥
रसीं वावरे दर्वी वरवंटा ॥ तैशा चाळिसी युक्ति बरवंटा ॥३॥
अहंममतेच्या चुकविं पापा ॥ निजीं रंगुनि धरीं अनुतापा रे ॥धृ०॥

पद ३२०.
वाटे चोज तुज मज भिन्न भेद काय ॥ चाल संतांपाशीं लावितील सोय ॥धृ०॥
जैसा जळाचा सुत कल्लोळ ॥ जैसा ज्वाळाचा स्फुलिंग बाळ ॥
वंश युगाचें निमिष्य पळ ॥ तैसा जीव मीं आत्मया तुझा खेळ रे ॥१॥
घटा प्रसवली सांग काय धरा ॥ हेम व्यालें केविं अलंकारा ॥
तंतु पटिंची कायसी परंपरा ॥ तैसा नामरूप पावलों मी बरा ॥२॥
गोष्टी गोड गोड प्रमेय उत्तम ॥ तेणें तोषें तोषला आत्माराम ॥
कार्य कारण मिथ्या परिणाम ॥ निजानंद रंगला पूर्ण काम ॥३॥
नाहिं नाहिं अभेदीं देखिला भेदा ॥ ब्रह्म अद्वितीय कायसा वाद ॥धृ०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP