मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १३६ ते १४०

पदसंग्रह - पदे १३६ ते १४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १३६. (भक्तासि भगवद्भजनें )
दु:खरूप-संसृति अबला सुख-रुप ते साधु पाहाती ॥ वेधली दिठी कवळें त्या पीतवर्ण सर्वही होती ॥
प्रांजळ हे द्दष्टि तयातें शुभ्र तें शुभ्रचि अंतीं ॥ ज्वरिता क्षिर विषवत्‌ इतरां पुष्टता शरिरीं प्राप्ति ॥धृ०॥
वर्णाश्रमाश्रित कर्में निपजती ते ते पाळी ॥ विधिनिषेध शोधुनि शुभ तें आचरुनियां इतरां गाळी ॥
कर्मींच ब्रह्मप्रतिति कर्तृत्वबीज तें जाळी ॥ यास्तव ते सुखरुप योगी वर्ततां विषयसमेळीं ॥१॥
अहं-ममता-भ्रांतिवशें जे विषयांध होउनि रमती ॥ सुत वैभव कांचन कांता सारांश मानुनि भ्रमती ॥
क्षिरनिरवत्‌ नित्य अनित्या स्वप्नींही नेणति कुमती ॥ यास्तव ते दु:खी प्राणी कर्मानुसारें श्रमती ॥२॥
जाणती जग नग हेमीं हेमींच प्रतिति जयांतें ॥ नामरूप त्यजुनी दोन्ही उरलें त्या स्वस्वरूपातें ॥
हानि लाभ सहसा नाहीं सुख दु:ख कैचें तेथें ॥ यास्तव ते सुखरुप योगी चालतां अनुभव-पंथें ॥३॥
नसतेंचि मृगजळ दिसतें तैसें हें द्दश्य विलासे ॥ मानिती साच यया तें नर मृग हो ते पहा कैंसे ॥
असतांचि न दिसे राहू सविता हें तेविं न भासे ॥ यास्तव हे जडजीव प्राणी दु:खरूप ते अनायासें ॥४॥
स्वरुपावबोधें ज्ञानी मातले पूर्ण आनंदें ॥ डुल्लती अनुदिन दुसरें नावडे निज-सुख-छंदें ॥
रंगले सहज निज रंगें विचरती पूर्ण अभेदें ॥ ते तेचि झाले ज्यातें ह्मणितलें नेती वेदें ॥५॥

पद १३७.
कांरे सावधपणें वर्तणूक नाहीं केली ॥धृ०॥
नवविध भजनें विहिताचरणें ॥ कराल म्हणउनि नारायणें ॥
मानवि तनु हे दिधली तेणें ॥ रमारमणें गोपाळें ॥१॥
सारासार विचार वर्म ॥ स्थूळ सूक्ष्म धर्माधर्म ॥
शुभाशुभ कर्माकर्म ॥ मनुष्य-देहीं जाणावें ॥२॥
साधु-संगें शास्त्र-श्रवणें ॥ शुद्ध सत्व अंत:करणें ॥
हरिगुरुभजनीं लावुनि करणें ॥ हरिस्मरणें सर्वदां ॥३॥
सर्वहि सांडुनि हा विचार ॥ डोळे झांकुनि अंध:कार ॥
केला मानला संसार ॥ गोड पिय़ूषाहुनि परम ॥४॥
असत्कर्मीं परमादरें ॥ आसक्त होउनियां अविचारें ॥
केलीं दुश्वरणें व्यभिचारें ॥ कोण सूख पावले ॥५॥
हरिहरब्रह्मादिकांप्रती ॥ केलीं कर्में तीं न सुटती ॥
तुह्मां जड जीवां कल्पांनीं ॥ कर्म भोगणें घडे ॥६॥
आतां तरी सानुरागें ॥ अनन्य भावें विद्वत्संगें ॥
पूर्ण निजानंद रंगें ॥ सर्व रंगीं रंगावें ॥७॥

पद १३८.
पावला सद्नुरुराज ॥ पंचाक्षरी तेज:पुंज ॥
जडपिलें होतें मज ॥ पंचभूतीं ॥धृ०॥
अवलोकितां कृपाद्दष्टी ॥ आनंदें भरली सृष्टी ॥
तत्त्वमसी कानीं गोष्टी ॥ सांगितली ॥१॥
श्रवणीं पडतां वाक्य ॥ स्वरुपीं जाहलों ऐक्या ॥
पाहों जातां त्नैलोक्य ॥ मीच मी स्वयें ॥२॥
निरसतां देहद्वय ॥ कोण ह्मणें अद्वय ॥
कैंचीं भुतें कैंचें काय ॥ कवणें ठाईं ॥३॥
सहज पूर्ण निजरंग ॥ रंगला हा अभंग ॥
सर्व रंगीं नि:संग ॥ होउनि ठेला ॥४॥

पद १३९.
जैसें बोले तैसें चाले ॥ आह्मीं वंदुं त्याचीं पाउलें ॥धृ०॥
जैसा उपदेश इतरां सांगे ॥ तैसा अंतरिं अनुभव जागे ॥१॥
जैसा वरि वरि निर्मळ भासे ॥ तैसा अंतरीं रज तम नाशे ॥२॥
जैसें बाहेरी भगवें दावी ॥ तैसें अंतर निजरंगें राबी ॥३॥

पद १४०.
स्मरतां नित्य हरि ॥ मग ती माया काय करी ॥धृ०॥
नामरुपात्मक सकळहि नाशक ॥ निश्वय हा विवरी ॥१॥
शांति दया पर श्रवणीं सादर ॥ भ्रांति भ्रमा न वरी ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें रंगुनी ॥ सद्नुरुपाय धरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP