मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५६६ ते ५७०

पदसंग्रह - पदे ५६६ ते ५७०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५६६. [चाल-पार्वतीवर मीं नमिला शिवशंकर.]
आपुल्या नामासाठीं नामांकित धांवुनि येती ॥ध्रु०॥
भक्ता प्रर्‍हादाकारणें ॥ स्तंभीं प्रकटुनि संरक्षणें ॥
नाहीं पडों दिधलें उणें ॥ नाम स्मरतां संकटीं ॥१॥
पशू गजेंद्रा भवजळीं ॥ नांव स्मरतां तये काळीं ॥
धांवुनि येउनि त्वां वनमाळी ॥ सरता केला वैकुंठीं ॥२॥
गणिका कुट्टिनी पापराशी ॥ अजामिळ तो महा दोषी ॥
कैवर्तक तो केला ऋषी ॥ नामें स्मरतां उफराटीं ॥३॥
श्री हरी भक्तकामकल्पद्रुम ॥ मुनिजनमनविश्रामधाम ॥
शरणागत प्रतिपाळक नाम ॥ श्रुति गर्जती बोभटीं ॥४॥
नाम स्मरतां ते द्रौपदी ॥ संरक्षिली पदोपदीं ॥
सहज पूर्ण निजानंदीं ॥ कृष्णरंगीं रंगली ॥५॥

पद ५६७. [चा. सदर.]
तुझीं बिरुदें त्वां जतन करावीं आतां ॥ध्रु०॥
निगमागमें वाखाणिलीं ॥ त्यांत एक दोन हरविलीं ॥
उरलीं जतन करावीं आपुलीं ॥ ज्याचीं त्यानें विवेकें ॥१॥
आम्हीं आपलीं आपण यत्नें ॥ संरक्षिलीं जैसीं रत्नें ॥
ह्रदयीं धरूनी करितों जतनें ॥ नानापरी दिनरजनीं ॥२॥
पतीतपावन करणें एक ॥ दीनबंधुपण अमोलीक ॥
दोन्ही गमाविलीं लौकिक ॥ होवू पाहातो तुझा ॥३॥
पतीतपण हें आम्हीं चित्तीं ॥ धरिलें न सोडूं कल्पांतीं ॥
पावनपण हें तुझें अंतीं ॥ दिसेनासें पैं झालें ॥४॥
काया वाचा मनें दीन ॥ आम्हीं सर्वस्वें संपन्न ॥
तूं दीनबंधु म्हणतां मौन ॥ धरूं नमो निजरंगा ॥५॥

पद ५६८. [चा. सदर.]
ज्ञानी परमहंस तो जाणावा ॥ध्रु०॥
मुनिजनमानस विजनविहारी ॥ मुक्त मुक्ताफळ आहारी ॥
नित्यानित्य विचार करी ॥ क्षीरनीर बिभागी ॥१॥
स्वीकारुनी सारभाग ॥ करितो अनित्याचा त्याग ॥
ऋद्धि सिद्धि स्वर्गभोग ॥ गौण मानुनी राहे ॥२॥
सहज पूर्ण निजानंद ॥ रंगीं रंगला स्वच्छंद ॥
निरतिशय सुख निर्द्वंद्व ॥ सच्चिद्बुवनीं विराजतो ॥३॥

पद ५६९. [चा. सदर.]
भगवंत निजभक्तांचीं संकटें दूर करितो ॥ध्रु०॥
कांता कांचन पुत्र धन ॥ भाग्य त्नैभवसंपन्न ॥
होतां करितिल आनोआन ॥ म्हणऊनि धन कांचन हरितो ॥१॥
मोहमदें मदोन्मत्त ॥ कदां होऊं नेदी चित्त ॥
त्याचें करणें तें स्वहित ॥म्हणवुनि पाश वारितो ॥२॥
सर्वसंग परित्यागी ॥ निरपेक्ष जे वीतरागी ॥
निजानंदें सर्वसंगीं ॥ त्यांना सत्वर उद्धरितो ॥३॥

पद ५७०. [चा. सदर.]
उच्चारीं वाचे श्रीराम जयराम जय जय राम ॥ध्रु०॥
मंत्र त्रयोदशाक्षरी ॥ जपतां निरंतर वैखरी ॥
रामरूप चराचरीं ॥ सबाह्म अंतरीं दाटे ॥१॥
उफराटिया नामासाठीं ॥ वाल्मिक तरला उठाउठीं ॥
वदला रामायण शतकोटी ॥ भविष्य अवतारापूर्वीं ॥२॥
भवभय बापुडें तें काय ॥ जैसा मिथ्या मृगजळ न्याय ॥
रामनामस्मरणें होय ॥ निर्विष सांब सदाशिव तो ॥३॥
नारदादिक महामुनी ॥ स्मरणें पावन करिती अवनी ॥
स्वयें विचरती चिद्भुवनीं ॥ नीजानंदें निर्द्वंद्वें ॥४॥
सहजीं सहज पूर्ण रंग ॥ तें हें नामस्मरण नि:संग ॥
येणें तरले अभंग ॥ सर्व रंगीं वर्ततां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP