मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३९६ ते ४००

पदसंग्रह - पदे ३९६ ते ४००

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३९६.
राजस रामाबाई शिवादि सुरनर लागति पायीं वो ॥ महिमा वर्णिला कवण शिळा उद्धरली लवलाहीं वो ॥धृ०॥
जानकीजीवन मनमोहन माते ह्र्दयनिवासिनी वो ॥ जाळें भवदु:खाचें तोडुनी केलें सुख संजीवनी वो ॥
जाणेल जडभारी माझें कोण तुजवांचुनी वो ॥ जाणसि मनिच्या खुणा जिवासी जीवन तूं संजीवनी वो ॥१॥
न करीची अवज्ञा पितृवचनासी पाळिलें वो ॥ न धरीच अभिमान राज्य सांडुनि वना चाले वो ॥
न ह्मणे सानें थोर दैत्य दानवां उद्धरिलें वो ॥ नगर सोनियाचें शरणागतासि दिधलें वो ॥२॥
किति उपकार बोलों केलें भवबंधनमोचन वो ॥ किति जन्माचें दु:ख त्याचें केलें त्वां दहन वो ॥
किन्नर विद्याधर तुज ध्याती ब्रह्मादिक मुनिजन वो ॥ कीटक मर्कट पक्षी नामें झाले परि पावन वो ॥३॥
नाहीं दैवत ऐसें नामें त्रैलोकां उद्धारा वो ॥ नाम जीवन शिवाचें शमलें हळाहळ साचार वो ॥
नाम निजबीज म्हणुनि बोधी पार्वतीसि निर्धार वो ॥ नामें नारद तन्मय नामापरतें नाहीं सार वो ॥४॥
थक्कित देव किन्नर ह्मणती आश्वर्य रूप रामाचें वो ॥ थरथरली भूबाळा नखीं तेज कंदर्पाचें वो ॥
थक्कित गण गंधर्व रूप रंगलें निजानंदाचें वो ॥ स्थळ अणु नाहीं रितें जनीं वनिं रामरूप साचें वो ॥५॥

पद ३९७.
वेधक रामा बाई मज विश्रांति तुझ्या पायीं वो ॥ तनु मन धन अर्पण करितां नव्हे मी उतराई वो ॥धृ०॥
निष्काम निजधाम निराभास निजमूर्ति ॥ नि:शब्द निर्गुण निष्कळ पार बह्मादिक नेणती ॥
निवविलें सर्वांगें निजानेंदें केले तृप्ती ॥ निजगुज माझे जिविचें तूं जाणंसि आर्तगती वो ॥१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति ध्यानीं मनीं तूं चिंतनीं वो ॥ झालों तुझेनि सुखी तूंचि जनक आणि जननी वो ॥
जाळित राज-तम-वृत्ती माझी कोण तुजवांचुनी वो ॥ जाणिव छेदुनि माझी स्वयें भाससि जनीं वो ॥२॥
नकळे पार तुझा शेष शिणला करितां स्तुती वो ॥ न बोलवे प्रकट वेद श्रुति ह्मणती नेती वो ॥
न कळसि सुरवरां अकळ ब्रह्मादिक नेणती वों ॥ न धरत धीर मना देखुनि धांवसि निजभक्तिं वो ॥३॥
दशेंद्रियातीते द्वंद्वदु:खसमूळ हर्ते वो ॥ दशदिशाव्यापके जनिं वनीं भुवनें साक्षभूते वो ॥
दवडुनि अभिमानातें निजानंदें भजविसि सत्ते वो ॥ दंभ मद मत्सर रंग अर्पियला चरणांतें वो ॥४॥

पद ३९८.
इतुकें देईं देवा तुझी आवडी लागो जीवा ॥ यापर साधन नलगे न मनीं मुक्तीचाही ठेवा ॥धृ०॥
वृत्ती माझी शून्य रामा होऊं नेदावी ॥ मन भ्रमलें तरी रामा आठवण द्यावी ॥
बुद्धि माझी निश्चयें शिबिरीं बैसवावी ॥ शरण रिघोनि तुज हेंचि मागें जिवेंभावीं ॥१॥
तुझी गोडी मनासि रामा लागलीयावीण ॥ अपार अगणित भेद मनाचे आवरी हे कवण ॥
इंद्रियांत मन मीं म्हणवीशी तें कवणा निवारण ॥ तुझिया भजनेंविण ज्ञान चावटी हें जाण ॥२॥
तुझी कृपा पूर्णत्वें परिपूर्ण मनासि होय ॥ तैं सकळ अवयवांसहित मन निश्चळ राहे ॥
समूळ रंग टाकुनि मन हें निजानंदें धाय ॥ भवबंधाची मात तया स्वप्नींही न साहे ॥३॥

पद  ३९९.
निज रामा ये रे ॥धृ०॥
काम क्रोध दैत्य ॥ मारिले समस्त ॥ शीणलासी बहुत ॥१॥
वासना ताटिका ॥ छेदिली निमीष्यें एका ॥ भक्तजन सुखा ॥२॥
जनीं व्यापकपण ॥ होतां जाहला शीण ॥ छेदाया रंगपणा ॥३॥

पद ४००.
गडी आमुचा रे ॥धृ०॥
प्रपंचीं उदास पाहीं ॥ कल्पना समूळ नाहीं ॥१॥
सर्वही आपण जाणे ॥ जाणीव समूळ नेणे ॥२॥
निजानंद रंगें धाला ॥ द्वैताद्वैत आंचवला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP