मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६०६ ते ६१०

पदसंग्रह - पदे ६०६ ते ६१०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६०६.
हें एकांतींचें गुज सद्नुरुकृपें कळलें वर्म ॥ अन्य साधनें. न पडे ठायीं नेणें त्याचें कर्म ॥ध्रु०॥
चोज एक वितलें सखिये तें मी सांगों काई ॥ सादर परिसें श्रवणीं वनांत सिंह चारित गाई ॥
पुत्र जन्मला आधीं मग जन्मली त्याची आई ॥ अनन्य भावें लागे जेथें शिष्य गुरुचे पायीं ॥१॥
आधीं पान पाठीं मूळ या वृक्षाचें झालें ॥ प्रथमचि फळ मग त्याहुनि त्याचे मागुनि पुष्प निघालें ॥
गजासि मारित मार्जार पांगुळ गिरिशिखरावरि गेलें ॥ वनांत मीन व्याला त्याला पाहावया जन आळे ॥२॥
पायाळ पाताळिंचें देखे जरि तो अंजन ल्याला ॥ निधान येतां हाता स्वयें निधान होउनि ठेला ॥
समरंगणिं तो शूर युद्ध करितां मरोनि ज्याला ॥ निजरंगें रंगुनि सद्भावें शरण रिघावें त्याला ॥३॥

पद ६०७.
पतीतपावना ॥ध्रु०॥
पतीतपावन नाम तुझें ऐकुनियां मी श्रवणीं ॥ शरण आलों श्रीरंगा आतां तारीं तूं विर्वाणीं ॥
भक्तकामकल्पद्रुम तुजला म्हणती वेदपुराणीं ॥ तरि तूं साच करुनियां दावीं पाहू येच क्षणीं ॥१॥
सर्वांशीं अपराधी मी अन्यायी महा दोषी ॥ कामी क्रोधी लोमी रागद्वेषी अविश्वासी ॥
दांभिक मिथ्यावादी निदक संकल्पाची राशी ॥ ऐसी हे सामग्री करुनि आलों पायांपाशीं ॥२॥
दुष्ट दुराचारी दुर्जन चंचळ मळीन भारी ॥ संशयाची खाणी भेदवादीं मी अविचारी ॥
परदोषदर्शनीं अखंड चित्त विषयविहारी ॥ कुटीळ कपटी तस्कर ऐसा आहें सर्वांपरी ॥३॥
व्याध अजामिळ गणिका वाल्मिक उद्धरिले त्वां मागें ॥ त्याहुनि काय उणा मी तुजला नकळे कां हें सांगें ॥
पतीतपावन ब्रीदें साच करिसी तूं निजांगें ॥ म्हणवुनि शरण आलों वेगीं तारावें श्रीरंगें ॥४॥
सहज पूर्ण निज रंगा तूं नि:संगा निर्विकारा ॥ दीनबंधू दयासिंधू देवा श्रुतिसारा ॥
भवगजपंचानना पूर्णकामा विजनविहारा ॥ तारीं भवसागरीं करुणा करा परात्परा ॥५॥

पद ६०८.
माते तूं जरि मजवरी उदास तरि म्यां कवणावरी रुसावें ॥ आत माझे मनिंचें मग वो कवणें हें पुरवावें ॥ध्रु०॥
चकोरासी तृप्ती एका चंद्रामृतपानें ॥ चातकासी तृप्ति एका मेघाच्या जीवनं ॥
दाध मधु पय घृत मानुनि तृणवत्‌ उदकीं वास मीनें ॥ करणें हा कृतनिश्वय इतुका जाणें पूर्ण मनें ॥१॥
मंगळसूत्रेंविण वधु नाना अळंकार ल्याली ॥ तितुके सर्व निरर्थक तैसा गति हे मजला झाली ॥
पतिव्रता पतिशेज उपेक्षुनि परपुरुषाशीं रतली ॥ तरि ते व्यभिचारिण जाणावी तैसी गति मज गमली ॥२॥
आतां मज उद्धरिं सत्वर जननी कृपांगें ॥ भक्तवत्सले दीनदयाळे येउनियां तूं वेगें ॥
वोसंगा घेउनि स्तन देईं मजला तूं निजांगें ॥ अक्षय निजसुख देउनि जिववीं निववा पूर्ण रंगें ॥३॥

पद ६०९.
गुरुभजनीं उन्मन मन दिन रजनीं ॥ध्रु०॥
गुरुदास्यें गुरुदास गुरुरूप ॥ सजनीं हो कां विजनीं ॥१॥
वोळंगताती चतुर्विध मुक्ती ॥ भावें श्रीगुरुपुजनीं ॥२॥
निजरंगें गुरुभक्त रंगले ॥ भेदाभेद-वना त्यजुनी ॥३॥

पद ६१०.
धन्य धन्य ते शिवभक्त ॥ जगदुद्धारी जीवन्मुक्त ॥ध्रु०॥
शिव पुजुनि शिव झाले ॥ शिवभजनें नित्य निमाले ॥१॥
शिवसागर भक्त गंगा ॥ ऐक्य सहजें शिवलिंगा ॥२॥
शिवभक्त निजानंदें ॥ रगीं रंगले स्वच्छंदें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP