मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५९ ते ६२

पदसंग्रह - पदे ५९ ते ६२

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५९.
अनुभव सुख सांगातिणी ॥ म्हणे ऐक माय बहिणी ॥
तुझ्या संसाराची काहणी ॥ मजला चोजवली वो ॥
तुटलें सासुरें माहेर ॥ समुळीं खुंटली येरझार ॥
पडिला कपाळीं भ्रतार ॥ नामरुपातीत वो ॥ कूळ कर्म पाप पुण्य ॥
आश्रम वर्ण व्यक्ति शून्या ॥ स्तवनीं स्तवितां नये मौन ॥
धरूनि राहावें सये ॥ ऐशियाशीं पडिली गांठी ॥
जिवित्वाची झाली साठी ॥ तुह्यी मांडिली आटाटी ॥
बोलीं बोलवेना ॥१॥
तुझें गेलें माणुसपण ॥ झाली नामरुपा बोळवण ॥
सांडी मांडी हे वण वण ॥ कवण करिल वावुगी ॥
निरसुनियां छेद भेद ॥ निज मंदिरीं निर्द्वंद्व ॥
राहें सांडुनियां छंद ॥ चित्तीं झालेपणाचा ॥
जातां वाजोनियां वारें ॥ तरू पूर्ण संस्कारें ॥
हाले डोले तैसी विचरें ॥ हेहीं प्रारब्धयोगें ॥
परि तें तृणाचें बुझवणें ॥ माणुस म्हणावें त्या कवणें ॥
दिसे गार गारपणें ॥ परि तें केवळ नीर कीं ॥२॥
तरि तूं आतां ऐसें करीं ॥ निर्भय होउनिया अंतरीं ॥
निरतीशय सुख शेजेवरी ॥ अखंड निजीं नीजवो ॥
कर्पूर दीपकाच्या मेळीं ॥ रक्षा मैस ना काजळी ॥
अहं सोहं दोन्ही जाळीं ॥ समुळीं ब्रह्मग्नीमाजीं ॥
कैंची प्रकृती कैंचा पुरुष ॥ तेथें कैंचें हर्षामर्ष ॥
निष्कळंक निर्विशेष ॥ तुझीं तूंचि निश्वयें ॥
त्यांचा संतोष ना खेद ॥ मावळले भेदाभेद ॥
सहज पूर्ण निजानंद ॥ सर्वरंगीं रंगला ॥३॥

पद ६०.
हर हर प्रभु महादेव देवाधिदेवा ॥ पतीतपावना सदाशिवा ॥१॥
भ्रमे तुझी नाहीं केली सेवा ॥ क्षमा करीं जिवाचिया जिवा ॥२॥
अनुपमा सर्वोत्तमा शिवा ॥ तारि तारि वारी देहभावा ॥३॥
स्वभक्तविश्रामा पूर्णकामा ॥ नुपेक्षावें दयासिंधुनामा ॥४॥
भवानीशा ईशा महारुद्रा ॥ भालचंद्रा मृडहर वीरभद्रा ॥५॥
निजानंदा निर्द्वंद्वा निजरंगा ॥ दावीं वेगीं पद-पद्माच्या संगा ॥६॥

पद ६१.
जळों तें ज्ञान अज्ञान खरें ॥धृ०॥
अहं ममता-स्पद सकळ कळा या ॥ मारिती मदनशरें ॥१॥
आत्म कळेविण देहीं देहबुद्धी ॥ भ्रमते भ्रांतिभरों ॥२॥
सर्व जाणें नेणें आपणातें निज ॥ खरुपाच्या विसरें ॥३॥
भेद अभेदी नसतां देखे ॥ अद्वैतीं दुसरें ॥४॥
पूर्णानंद पदीं निज रंगें ॥ रंगेना अपुरें ॥५॥

पद ६२. भूपाळी.
प्रात:स्नान प्रात:काळीं ॥ शिवस्मरण गांगाजळीं ॥
करितां झाले भूमंडळीं ॥ पुण्य-पावन महादोषी ॥१॥
द्वादश जोतिलिंगें वाचे ॥ अगणित गुण-गण सदाशिवाचे ॥
स्मरतां तुटती पाश भवाचे ॥ हें नि:संशय कां नेणां ॥धृ०॥
वाराणशी विश्वनाथ ॥ भागीरथी महा तीर्थ ॥
मोक्षपुरी ते समर्थ ॥ त्निशुळावरी रचियली ॥२॥
सोमनाथ तो सोरटी ॥ स्मरणें नाशित पापें कोटी ॥
सांब सदाशिव धूर्जटी ॥ भवसंकटीं स्मरावा ॥३॥
उत्तरदिशें जगदोद्धार ॥ करावया श्रीशंकर ॥
लीलाविग्रही अवतार ॥ बद्रीकेदार जाहला ॥४॥
साठि वर्षें वाट पाहत ॥ मल्लिकार्जुन तो विख्यात ॥
श्रीशैल्य पर्वत ॥ आधिष्ठान जयाचें ॥५॥
अवंतिका नामें नगरी ॥ मुक्तिदायक जे अवधारी ॥
महंकाळ तो त्रिपुरारी ॥ तेथें आहे पाहुं चला ॥६॥
परियली नामें क्षेत्र ॥ तीर्थ मार्कंडेय हरिहर ॥
वैजनाथ कर्पूरगौर ॥ स्मरतां भवसागर तारी ॥७॥
ब्रम्हगिरी शिखरीं पाहें ॥ गंगा जटा-मुकुटीं वाहे ॥
त्र्यंबकराज नाम हें ॥ जपतां हरती महापापें ॥८॥
भीमाशंकर भीमा-उगमीं ॥ स्तवनीं स्तविजे निगमागमीं ॥
स्रानें पानें ते संगमीं ॥ करितां हरती महापापें ॥९॥
आवंढयानागनाथीं पूजन ॥ घडतां विमळ तीर्थीं स्रान ॥
झाले पतीत बहु पावन ॥ सज्जन जन वन-चंदन तो ॥१०॥
पाहोनि नर्मदेचें तीर ॥ तेथें मांधाता नृपवर ॥
ओंकार ममलेश्वर ॥ भजतां पावन तो झाला ॥११॥
वेळापुरीं अधिष्ठान ॥ वेरुळ ह्मणती ज्यातें जन ॥
तेथं घृष्णेश्वर त्रिनयन ॥ दीन दयाघन शोभतसे ॥१२॥
समुद्रतीरीं करुनि स्रान ॥ रामें केलें लिंगार्चन ॥
रामेश्वर तो ह्मणती जन ॥ जो निजभजनें उद्धरितो ॥१३॥
ऐसीं जपतां प्रात:काळीं ॥ द्वादालिगें नामावळी ॥
भुक्ति-मुक्ति-दायक सकळीं ॥ चंद्रमौळी संतोषे ॥१४॥
निजानंदें हे भपाळी ॥ रंगीं रंगतां कपाळीं ॥
करुणाकर हर हा कृपें पाळी ॥ अनन्य शरणागत त्यातें ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP