मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४४१ ते ४४५

पदसंग्रह - पदे ४४१ ते ४४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४४१. [चाल-सखया रामा विश्रां.]
काय सांगों संतांची उत्तम कळा ॥ कळातीत सतर्क्य ब्रह्म-गोळा ॥धृ०॥
झालें सुख तें सांगाया दुजें नाहीं ॥ सुखीं सुख संचलें एक पाहीं ॥
अनुभव ठायीं अनुभवितां न दिसे कांहीं ॥ गेले गेले द्दष्टांत दिशा दाही ॥१॥
ज्याच्या पायीं निवालें अंतर माझें ॥ ऐसें बोलें बोलतां मानिती वोजे ॥
दाविति खूणा अद्वैतिं कैचें दूजें ॥ एकमेवा सांगती श्रुति बुझे ॥२॥
बोलीं बोले त्यालागनियाचि दाही ॥ साक्ष येथें अष्टादश चारी साही ॥
निजानंदीं बोलावया रंग नाहीं ॥ बोलणें तें अत्यंत कांहीं बाहीं ॥३॥

पद ४४२.
लाज नये म्हणवितां ज्ञानी ॥धृ०॥
लोभ न टाकी दया टाकी ॥ ज्ञातेपणाचा अभिमान सेखी ॥१॥
मींपण हें सांडिलें नाहीं ॥ तंववरी हा केवीं होय विदेही ॥२॥
वेदां लीन निजानंदीं ॥ रहणीविणें ज्ञान उपाधी ॥३॥

पद ४४३.
अघटित घटना पटीं माया मोहनी सवांसि रे ॥ सुर नर उरगां भुलवी, वायां धरी कां गर्वासि रे ॥धृ०॥
भिल्लीसाठीं लागे पाठीं देवतो ईशान रे ॥ वृदेच्या स्मशानभुवनीं लोळे श्री भगवान्‌ रे ॥१॥
श्रीकृष्णें निजस्कंदीं भावें यान वाहीजे ज्याचें रे ॥ वृथाचि शापी अति संतापी विपरीत दुर्वासाचे रे ॥२॥
नहुष उन्मत्त झाला द्विजवर शापें सुकृतहारी रे ॥ ब्रह्मऋषीचे शत सुत कौशिक मत्सरयोगें मारी रे ॥३॥. (अपूर्ण)

पद ४४४.
धन्य धन्य आह्मीं जाहलों ॥ स्वामीदर्शनें निवालों ॥धृ०॥
ज्ञानगंगें नाहलें ॥ बोध-राम पाहुनि निघालों ॥१॥
संतचरणीं लोळलों ॥ प्रेम-धुळीनें घोललों ॥२॥
आतां संतसंगें राहूं ॥ नाम गुरुरायाचें गाऊं ॥३॥
रंगीं निजानंद पाहूं ॥ आनंदरूप होउनि राहूं ॥४॥

पद ४४५.
आरते आरती उजळुं सद्नुरु निजमूर्ति ॥ निराकार अपार कैसी कीजे निजभक्ति ॥धृ०॥
एकवीस स्वर्गे मुकुट सप्तपातळ चरण ॥ पृथ्वी उदर त्याचें कवण करी पूजन ॥१॥
ज्ञानघृतें ब्रह्माग्नी निर्धुम पाजळिला ॥ त्रैलोक्य निरसुनि वोंवाळिकें जो उरला ॥२॥
अविद्या काजळी तुटोनि दश दिशा उजळी ॥ शांती क्षमा दया यांची कुरवंडी केली ॥३॥
पूज्य पूजन पूजितां जाउनि सद्नुरु पूजिला ॥ मी-तूंपणोंविण निजानंद रंगला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP