मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २६६ ते २७०

पदसंग्रह - पदे २६६ ते २७०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २६६.
जळो जिणें हरिविण सर्व त्यजावें ॥धृ०॥
मंदिर सुंदर पुत्र कलत्रही ॥ सोडुनि शेवट एकट जावें ॥१॥
राहाट माळेपरी समजावें ॥ कोण मी काय गुरुकृपें उमजावें ॥२॥
सर्व विरंग कुरंगजळापरी ॥ जाणुनियां पुनरपि नुपजावें ॥३॥

पद २६७.
स्मर हरी कलिकल्मषहारी ॥धृ०॥
धृव प्रर्‍हाद गजेंद्रहि तारी ॥ द्रौपदिच्या धांवण्या पावे मुरारी ॥१॥
अंबरिषाचा हरि साहाकारी ॥ परिक्षितिचें गर्भीं संकट वारी ॥२॥
व्याध अजामिळ गणिका नारी ॥ हरिरंगीं रंगली श्रीहरि सहचारी ॥३॥

पद २६८.
धिग्‌ धिग्‌ विरस जिणें रे लारिजवाणें ॥धृ०॥
लाज नये रघुरायपदाहुनि विषय सुखावह काय रे ॥
हारविला नरदेह निरर्थक व्यर्थ श्रमविली माय रे ॥१॥
रसना रसाभिलाषीं लोचन ॥ तन्मय रूपविलासीं रे ॥
गजस्पर्श पदबंधन पावे भ्रमर जेवीं कमलासिं रे ॥२॥
नेणसि हित वृथागत जीवित ॥ नादें जेविं कुरंग रे ॥
सावध रे निजरामपदांबुजि शरणागत होउनि रंग रे ॥३॥

पद २६९. (राग व चाल सदर.)
शरण त्या गोपाळा जावें तन्मय व्हावें भावें रे ॥धृ०॥
रंजवुनि भवंभजन तो हरिपद निरंजन ध्यावें रे ॥धृ०॥
सोडवि कोण तुतें भवपाशीं ॥ तूं विषयांचि दासी रे ॥
तव ह्रत्कोशीं जो ह्रषिकेशी ॥ अविदित काय तयासि रे ॥१॥
कर्म जिवा पितृवत्‌ प्रतिपाळी ॥ शत्रुहि होउनि जाळी रे ॥
कोण बलिष्ठ असा वसुधातळीं ॥ स्वकृत कर्महि टाळी रे ॥२॥
कर्मकिंकर जीव निरंतर ॥ बोलति श्रुति स्मृतिकारक रे ॥
तें कर्म निरहंकृति फळत्यागें होय जिवा भवतारक रे ॥३॥
विबुध दानव पन्नग मानव ॥ कर्मप्रयोगें झाले रे ॥
तें कर्म बह्मार्पण करितां सुखें श्री भगवानही डोले रे ॥४॥
भगवद्भजनें प्रिय साधूजन ॥ सारविवेक वैराग्यें रे ॥
निष्कर्भता जिव होय सदाशिव ॥ परमानंदा योग्य रे ॥५॥
जनक सनकादिक शुक नारद वामदेव मुनिवृंद रे ॥
रंगुनि निजानंद पदीं ते डोलति निजसुखछंदें रे ॥६॥

पद २७०. (चाल व. राग. सदर)
भगवद्भक्त ययापरि जाणति जाणिव सांडुनि सर्व रे ॥
स्थिरचरि हरि दुंदुभि वाजति न धरति रतिही गर्व रे ॥धृ०॥
तंतुपटीं घटीं मृन्मयता जळौघ तरंगीं विराजे रे ॥
अस्ति भाति प्रिय नाम रुपात्मक राघव रुपडें साजे रे ॥१॥
काम्य निषेध निषेधुनि विधिचा दाविती सादर भावरे ॥
कर्म किं करते न कदापिहि डोलति पूर्वप्रवाहें रे ॥२॥
अहं निवारुनि सोहंहि वारुनि डोलति निजसुख रंगें रे ॥
निरतीशय निज निर्विकार सुख नेणति जन; देहसंगे रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP