मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३६१ ते ३६५

पदसंग्रह - पदे ३६१ ते ३६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३६१.
आणा मंदिरा इंदिरावरा ॥धृ०॥
वैराग्य वसंतमासीं ॥ सोज्वळ मानसशशी ॥ विरहिणी बुद्धि बोले होईन मी दासी ॥१॥
साजणी ग्रासिलें पापें ॥ त्नासिलें त्रिविध तापें ॥ हरिवियोग संतापें अनुतापें तापे ॥२॥
आणा गोविंद लागला छंद ॥धृ०॥
नावडे वावुगी मात ॥ उपचार वाटे घात ॥ विषयीं विरक्त चित्त गोपाळीं हेत ॥३॥
आणा गोपाळा गोकुळपाळा ॥धृ०॥
हरिचा विरह जाची ॥ जाणुनि सखी निजाची ॥ श्रवणीं सादरें सांगें खुण निजगुजाची ॥४॥
पाहें कृष्ण तूं सावध राहे ॥धृ०॥
अंतर बोधलें कैसें ॥ सागरीं सैंधन जैसें ॥ निजानंद जनीं वनीं कोंदला असे ॥५॥
सैर समाधी सहजच नीज ॥धृ०॥

पद ३६२.
श्रीराम राम वदा हो जय जय ॥धृ०॥
श्रीराम राम वदा ॥ सुख स्वानंद सदां ॥ चुकती भव आपदा ॥१॥
श्रीराम सत्य ज्ञान ॥ अनंत सुखघन ॥ गर्जति श्रुति सर्वदां ॥२॥
श्रीराम निजमूर्ति ॥ रंगीं रंगली स्फूर्ति ॥ पावली पूर्णपदा ॥३॥

पद ३६३.
रामा रामा रामा मेघश्यामा ॥ तुझा वेध लागो माझ्या रामा ॥धृ०॥
सखा सोयरा तूंचि बाप माय ॥ रामा माझें अंतर जाणसी सांगों काय ॥१॥
वाट पाहतां शिणले माझे डोळे ॥ रामा न लाविं उशिर येईं तूं एक वेळे ॥२॥
गोड न लागे आणिक कांहीं धंदा ॥ रामा वृत्ति चरणीं रंगवीं निजानंदा ॥३॥

पद ३६४.
भ्रमभरें भुललासी वायां रे सावध ॥ मानवि मागुती न ये काया रे सावध ॥धृ०॥
धन सुत देह गेह जाया रे सावध ॥ जायाची ही सांडीं यांची माया रे सावध ॥१॥
शिकविती निज गुज श्रुती रे सावध ॥ विषयीं विरक्ती मोक्षदाती रे सावध ॥२॥
करूं तुज विनंती हे किती रे सावध ॥ आयुष्याचि काय केलि माती रे सावध ॥३॥
धरीं धरीं सत्संगीं आवडि रे सावध ॥ सच्छास्त्रश्रवणीं लागो गोडी रे सावधं ॥४॥
हरि-गुरु-भजन न सोडीं रे सावध ॥ तेणें रंगें निजानंद जोडीं रे सावध ॥५॥

पद ३६५.
मी कोण ऐसें पाहें विचारुनि रे ॥धृ०॥
देह मी म्हणतें सुखदु:खा जाणतें ॥ जाणुनियां नेणते कां रे ॥१॥
इंद्रियां चाळक बुद्धिप्रकाशक ॥ सत्तामात्र तोचि एक रे ॥२॥
निजानंद अभंग सर्वही त्याचाचि रंग ॥ रंगीं रंगुनि नि:संग रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP