चक्रधारी ठक कृष्ण, कपटनाटकी सूत्रधार
खेळ बाहुल्यांचा भूवर, महाभारत कथासार ॥ध्रृ॥
विश्व रंगमंच कुरुक्षेत्र नाट्यपट रचून
अवघ्या कुरु पांडवाना, मायाजाळी गुंतवून
नररुपी बाहुल्या, खेळवितो सूत्र धरुन
रथ, गज, अश्व, दल चालवितो महासंगर
खेळ बाहुल्यांचा भूवर .......॥१॥
वाद्य वाजवितो शंभू, कथा सांगती नारद
काही उमगेना, कोण कुणाची करतो पारध
साराच कोलाहल, रणी गाजतो शंखनाद
ही बादरायण कथा रचेता तो विश्वंभर
खेळ बाहुल्यांचा भूवर .......॥२॥
रण ते भयकारी पाट रक्ताचे वहाती
रक्त, मांस चिखल कुणी हाणामारा किंचाळती
गुरु, शिष्य, चुलता, मामा, भाचा, बंधू त्वेषाने भिडती
कोण जाणे कोण कुणासाठी करितो संगर
खेळ बाहुल्यांचा भूवर .......॥३॥
अठरा अक्षौहिणी दल, महारथी महावीर
अठरा दिसांचे संगर ते महाभयंकर
अवनी डळमळे, उन्माद सरे, सरला भूभार
स्वये जनमेजय नृप, परिसतो कथासार
खेळ बाहुल्यांचा भूवर .......॥४॥
नट, खट, भाट, बहुरुपी, गारुडी श्रीहरी
खेळ हा गारुड्याचा, स्वये खेळतो मुरारी
भक्ताधीन परी, ठकासी महाठक चक्रधारी
आदिकेशवराया माया तुझीच ही अपार
खेळ बाहुल्यांचा भूवर .......॥५॥