पुरंदरायण - मी पुण्यवंत रे
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
मी पुण्यवंत रे माझे कर्म बलवंत
तुज काय काम देवा कैसा कृपावंत ॥ध्रृ॥
नव्हेच सामान्य तुझे ब्रह्मलिखित
देवा, कासया लिहीले, माझ्या नशिबात
नाही अल्पसुख देवा, चिंता दिनरात
कसा म्हणू देवा तुला अनाथांचा नाथ
मी पुण्यवंत रे ..... ॥१॥
द्वारी आला अतिथी रे, विन्मुख धाडीले
दुष्टसंग दुराचार नाहीच सांडीले
उदरभरण देवा फुकाची मी केले
अनाचारी अधम देवा मी जन्मजात
मी पुण्यवंत रे ..... ॥२॥
सोडीले मी देवा तुझे भजन पूजन
जीव हा श्रमला मृगजळी धावून
युगायुगाचे भ्रमण जनन मरण
दे रे दयाघना आता हाती तुझा हात
मी पुण्यवंत रे ..... ॥३॥
तूची मायतात देवा बंधु माझा थोरला
उध्दरुनी मज देवा करी भक्त आपुला
आलो तुझ्या पायी श्री पुरंदर विठ्ठला
वास करी देवा आता माझ्या हृदयात
मी पुण्यवंत रे ..... ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP