पुरंदरायण - देवास गार्हाणे
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
माझ्या पंढरीच्या राया पुरंदर विठ्ठला
का रे येथे आणिलेस का रे जन्म दिधला ॥ध्रृ॥
मी निराधार देवा, धनसंपदा गेह नाही
प्रेमे मज पाहील, ऐसा नृप तो नाही
देवा अनाथरक्षका, कोठे शोधू तुजला
माझ्या पंढरीच्या राया, पुरंदर विठ्ठला ॥१॥
अज्ञात हा देश, देवा उदासले मन
जीव तळमळे, जैसा जळाविण मीन
बोलावून येथे मज, देणारा तो कोण
सुखाचे ते सोबती, कोण संकटी धावला
माझ्या पंढरीच्या राया, पुरंदर विठ्ठला ॥२॥
थकल्या देहासी कोण देईल आधार
ऐसा कैसा झालो देवा भूमीवरी भार
देवा आता पुरे जनन मरण फेर
ब्रीद तुझे का रे सांडिशी कृपाळा
माझ्या पंढरीच्या राया, पुरंदर विठ्ठला ॥३॥
अव्हेरिसी मज देवा, का सरली करुणा
का तू झालास दगड, म्हणू नारायणा
का केलीस वंचना, माझी तू दयाघना
माझा दगडाचा देव तो, कुठे रे दडला
माझ्या पंढरीच्या राया, पुरंदर विठ्ठला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP