(हरिणी)
कठिण समयीं पुत्राचें ती करी स्मरणा अती ।
बहुत विवळे शोकानें तों कुमार बघे सती ।
वधुन जनका शोकानें तो अशी कुदशा तदा ।
वदत तिजला ऐकें व्यासा विधी कथि हें तदा ॥१॥
जननि पतिच्या तेजानें तूं त्रिभुवनं दाहसी ।
बलहि तुजला होतें साचें असें शर साहसी ।
अधम नृपती जाणोनी तो मला बहु वाटतें ।
नवल जननी राहूं कैसा तुझेविरहीत तें ॥२॥
(सुढाळ)
अरे परशुरामा नको शोक आतां ।
वदे जननी त्याची बसे येथ सूता ।
बहू अधम नीचें वधिलें अम्हांसी ।
तया लवकरी तूं करीं शासनासी ॥३॥
तनू मग खिळी ही शरें एकवीशीं ।
करी वसुमती वीर ते शून्य ऐशीं ।
मिति समरवेळा करी एकवीस ।
वदे परशुरामा त्यजी प्राण खास ॥४॥