(गीति)
राजा कृतवीर्याचें, पूर्वीचें जनन वृत्त कथि इंद्र ।
ऐके भूपति सावध, व्रत करितां होतसे त्वरित भद्र ॥१॥
कृतवीर्याचा जनिता, अपुल्या होईल कुलास बहु हानी ।
यास्तव दुःखित झाला, विधिला भेटे त्वरीत जाऊनी ॥२॥
पुशिलें विधिला त्यानें, ईश्वरभक्ती सुवर्तनीं प्रीती ।
ऐसी असून सूता, सूत नसे त्यांत कायसें कमती ॥३॥
त्याला पुत्र नसे हो, यास्तव नरकांत जाति पूर्वज कीं ।
मजला चिंता वाटे, मत्पुत्रें पूर्वजन्मिं त्या लोकीं ॥४॥
केलीं असती पापें, तीं नाशास्तव उपाय सांगावा ।
विष्णू-सुत मग त्याला, कथितो वृत्तान्त पूर्ण ऐकावा ॥५॥
सूत तुझा ज्या नगरीं, आतां आहे तिथेंच पूर्वीचा ।
नामें साम असे तो, अंत्यज होता कनिष्ठ जातीचा ॥६॥
द्रव्याच्या आशेनें, द्वादश विप्रांस मारिता झाला ।
त्यांचीं शवें आणूनी, गिरिकंदरिं गुप्त ठेविता झाला ॥७॥
त्या दिवशीं माघांतिल, कृष्ण चतुर्थी असे उपासाची ।
अंत्यज मार्ग-प्थांची, निरहारी-वाट पाहे दिवसाची ॥८॥
उद्यम सारुन आला, सदनाप्रति चंद्र उदय त्या काळीं ।
पुत्रास हांक मारी, गणेश नामें करुन त्या काळीं ॥९॥
उपवास घडे दिवसा, चंद्रोदयिं भोजनास तो बैसे ।
अज्ञानपणें घडलें, सहजासहजीं तयास पुण्य असें ॥१०॥
यास्तव स्वर्गी गेला, पुण्याचें फळ तिथेंच भोगियलें ।
सरतां पुण्य तयाचें, इहलोकीं जनन हें तथा झालें ॥११॥
जन्मे राजाकुलीं तो, तोच तुझा सूत होय कृतवीर्य ।
पूर्वी द्वादश विप्रां, वधिलें यास्तव अपुत्र कृतवीर्य ॥१२॥
संकष्टीचें व्रत हें, करितां तें पाप पूर्वजन्मीचें ।
निरसेल सांग मग बा, सूतासी सूत होय हें साचें ॥१३॥
माघी वद्य चतुर्थी, भौम दिनीं येतसेच त्या दिवशीं ।
शुभचंद्र आधिं पाहे, आरंभीं हो सुदीनशा दिवशीं ॥१४॥
(पृथ्वी)
प्रभात समयीं उठे करुन दंतशुद्धीस ही ।
करी स्वपन स्वर्ग ही तनुस शुद्धता नीतही ।
करुन विधि चालतां तदपुरी गणेशा जपा ।
पुढें यजुन तें करी विधिपरी प्रभूची कृपा ॥१५॥
करुन उपवास तो धरुन मौन वर्ते दिनीं ।
निशीथ समयीं करी स्नपन हें प्रभू पूजनीं ।
जपून अधिं मंत्र तूं करुन पूजनाचा विधी ।
अपूप तिललड्डुकां करुन अर्पिणें हा विधी ॥१६॥
तशीच फल दक्षिणा क्रमुक अर्पिणें भक्तिनें ।
करुन मग आरती यजन पूर्णता हो मनें ।
अतां पुढति चंद्रही अथिति मानुनी पूजणें ।
जलीं सुमन गंधही करुन अर्ध्य तो अर्पिणें ॥१७॥
गणेश आणि चंद्र या अशन अन्नही अर्पुनी ।
यथामितहि ब्राह्मणां सहित भोजना सारुनी ।
गणेश चरितां करी श्रवण भक्तिनें यामिनीं ।
करुन बहु उत्सवा वरुष एक त्या हेतूंनीं ॥१८॥
(गीति)
हें व्रत करितां लाधे, संतति आणी मनोरथां खास ।
कृतवीर्य जनक जो त्या, विधि सांगे यत्न हा करायास ॥१९॥
हें व्रत करणारानें, चंद्रोदयिं पारणा करायास ।
भक्षण करणें वस्तू, सांगे विधि हे तयास ते मास ॥२०॥
श्रावण मासा माजी, भक्षण लाडू तिळी करी सात ।
भक्षी दधी नभातें, उपवासी अश्विनांत हे तात ॥२१॥
कार्तिकमासीं दुग्धचि, निरहारी मार्गशीर्ष मासांत ।
पौषीं गोमूत्रातें, माघीं तिल हे प्रमाण चिमटींत ॥२२॥
स्वादू घृत भक्षण हें, फाल्गुन मासांत नेमिलें साचें ।
चैत्रीं योजित केलें, आचमनें पंचगव्य हें साचें ॥२३॥
दूर्वारस वैशाखीं, ज्येष्ठीं घृत भक्षिणें असा नेम ।
मधु भक्षणास योजी, आषाढी पारणास हा नेम ॥२४॥
पालन करणें व्रत हें, होते सिद्धी खचीत ती त्वरित ।
भौमी वद्यचतुर्थी, असल्याचें फल विधी तया कथित ॥