(शार्दूलविक्रीडित)
मंदारीं शिव त्याकडे त्रिपुर हा दूतास प्रेशी त्वरें।
मागें दुत शिवास दे झडकरी चिंतामणी सत्वरें ।
जिंकूनी जगतास आज धनि मी आहें शिवा यास्तव ।
सामानें प्रतिमा निरोप कळतां देणें असें वास्तव ॥१॥
दूताच्या मुखिंचा निरोप कळतां बोले सदाशीव हें ।
तूं आहेस गडी म्हणोन मदना केलें असे भस्म हें ।
तैसें मी तुजसी करीत नच तें जाणें मनीं पूर्ण हें ।
ऐसें उद्धट भाषणास करि त्या त्यातें वधी तूर्ण हें ॥२॥
मूर्ती ही अधमास खास न मिळे जन्मांतरीं पाइका ।
ऐसें भाषण ऐकुनी परत तो गेला गडी कीं मुका ।
सांगे दूत निरोप जो घडतसे वृत्तान्त झाला असे ।
रागानें मग तो त्रिपूर अवघ्या सेनेनिशीं येतसे ॥३॥
(गीति)
तिकडुन त्रिपूर येई, युद्धासाठीं त्वरीत मंदारीं ।
इकडुन शिवही गेले, उभयांचें सैन्य पातलें समरीं ॥४॥
तुंबळ युद्ध सुरु तें झालें मग तो रुधीर कर्दम कीं ।
झाला रणांगणीं बहु, युद्धासी रंग येत निस्तुल कीं ॥५॥
झालें युद्ध बहू दिन नंतर ते मल्लयुद्ध करितात ।
विधि व्यासाला कथिती, वृत्त अतां हें पुढें प्रसंगांत ॥६॥
भृगु आश्रमांत अपुल्या, पावन तैशा रुचीरशा गोष्टी ।
तनु शुद्धिस्तव कथिती, नृपती तो सोमकांत जो कुष्ठी ॥७॥
व्हावें सुखी म्हणूनी,ऐके गोष्टी अहर्निशीं भूप ।
सतिसह मंत्री दोनी, सेविति आणी श्रवीत ज्या भूप ॥८॥
एणेंपरि कवनें हीं, मांदाराची सुपुष्प माला ती ।
मोरेश्वरसुत अर्पी चिंतामणिकंठ भूषणासम तीं ॥९॥