मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ३४

उपासना खंड - अध्याय ३४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (गीति)

रुक्मांगदास नारद, सांगति वृत्तान्त तूं करीं श्रवण ।

गौतम उश्शापानें, दिव्य तनू पावला शची-रमण ॥१॥

यास्तव गणेशचरणीं, भक्ति जडे फार फार इंद्राची ।

आसन घालुन बैसे, वृक्षातळिं एकचित्त नेमेंची ॥२॥

प्रारंभीं इंद्र तिथें, गुरुबोधित जो षडक्षरी मंत्र ।

जपतां बहूत वर्षें व्यापियला तेथ वारुळीं गात्र ॥३॥

पाहे तीव्र तपा या, तोषितसा जाहला गणेश अती ।

तेजोमय रुप असें, पाहुन तें इंद्रनेत्र कीं दिपती ॥४॥

भ्याला ओकस्थाली, ऐसें देखून त्या मधुरवचनीं ।

बोले गणेश इंद्रा, भीति नको पातलों वरद-दानीं ॥५॥

इच्छित वर मागें तूं, ऐकुनियां देव भाषणा मगती ।

भीति लयाला गेली स्तविलीं स्तोत्रें बहूत तीं गीतीं ॥६॥

(मंदक्रांता)

देवा मातें तव चरित हें वर्णना शक्ति नाहीं ।

देवा तूं हें अससिच स्वयें आसरा ठाव नाहीं ।

विश्वाच्या या अससि परि तूं आसरा जाणतों हें ।

नित्य ज्ञानी अससि म्हणुनी सच्चिदानंद लाहे ॥७॥

मोठया यत्‍नें करुन तपसा ज्ञान नाहींच झालें ।

झाले कष्टी सनक मुनिही त्यांजला प्राप्त झालें ।

मंत्राचें हें बहुत बल हा दर्शनें लाभ झाला ।

देवश्रेष्ठा भजसि वरदीं तुष्टतसे प्राप्त झाला ॥८॥

आतां मातें स्मरण तुमचें सर्वदा तें असावें ।

ज्या वृक्षाच्या तळवटिं जपा बैसलों भक्तिभावें ।

तेथें मोठें नगर बसवीं नांव द्यावें कदंब ।

तेथें कुंडीं प्रथम करिं ती स्नान हो शापलंब ॥९॥

यासाठी त्या जल पुनितशा नाम चिंतामणी हे ।

द्यावें देवा करिल जलिं या स्नान दानास जो हें ।

त्याची इच्छा सफल अशि या तीर्थवासेंच व्हावी ।

ऐसा द्यावा वर मजसि हें इंद्र इच्छीत भावी ॥१०॥

(गीति)

गणपति म्हणे सुर-वरा, इच्छा होती समस्त त्या पूर्ण ।

संकटसमयीं स्मरतां, संकट निरसी स्वयेंच तें तूर्ण ॥११॥

ऐसा वर त्या मिळतां, स्वर्गांतुन आणिली इथे गंगा ।

स्नान प्रभूस घाली, परिवारासह यजीत रक्तांगा ॥१२॥

पूजन समाप्त होतां, निजधामासी गणेश तो जाई ।

केली पुरंदरानें, स्फटिकाची मूर्ति ती तया ठायीं ॥१३॥

स्थापुन स्वर्गी गेला, महिमा झाला तया स्थलीं थोर ।

रुक्मांगदास नारद, सांगुन सुचवी उपाय एक कर ॥१४॥

चिंतामणिकुंडीं त्या, करितां स्नानेंच मुक्त तूं होसी ।

नारद सांगुन गेला, कथिलें विधिनें तसेंच व्यासासी ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP