(शार्दूलविक्रीडित)
व्यासाला विधि तो कथी त्रिपुर हा झाला कसा वृत्त हें ।
यज्ञादी करणास पूजन अधीं आहे गणेशास हें ।
यासाठीं मुनिंसी गणेश यजना पूर्वीच नामास कीं ।
द्यावें गृत्समदाचिया म्हणवुनी श्रेष्ठत्व ये त्यास कीं ॥१॥
येइ गृत्समदास शिंक-रव तो झाला असे घोरसा ।
त्या योगें सुत तो जपा-कुसुमसा झाला असे दीप्तसा ।
पाहे तो सुत त्यास हें पुसतसे तूं कोण रे सांग कीं ।
बोले बालक तूं सुजाण असुनी मातें पुसे कौतुकीं ॥२॥
हे तात अपुल्यास शिंक नुकती आली असे तींत मी ।
जन्मा ये अपलाच बालक असे आहे लघू फार मी ।
होईं थोर पुढें पराक्रम तुम्हां दावीन वर्तून मी ।
जिंकीं मी त्रिजगांस नंतर पहा इंद्रास जिंकीन मी ॥३॥
वाटे गृत्समदा जरी भय तरी हर्षे मनीं तात तो ।
बोले तूं अससी मदीय सुत मी मंत्रोपदेशीन तो ।
देतां मंत्र तुला गणेश वरदीं वेदोक्त आहे असा ।
भावें मंत्र जपे यशास मिळवी वांच्छीत तें दे असा ॥४॥
(स्त्रग्धरा)
पुत्राला मंत्र देतां करित तपसें सांगतां त्या विधीनें ।
भावें एकाग्रचित्तीं सुत करित बहू अब्द या कालमानें ।
अग्नीचे लोट तेव्हां निघति मुखिं तया जाळिती ते जगासी ।
पाहे तेव्हां प्रभू तें तप मुदित वरा ओपण्या प्राप्त त्यासी ॥५॥
बोले त्या बालकाला गणपति वर तूं मागुनी घेइं आतां ।
बोले तेव्हां मला तूं जरि वर तरि दे इष्टसा योग्य आतां ।
द्यावें सामर्थ्य मातें सकल जगतिं हें राज्य माझें असावें ।
व्हावें अंकीत माझे सुर असुर मुनी दक्ष आदी स्वभावें ॥६॥
इंद्रादी लोकपालें मजसि निशि-दिनीं नित्य सेवीत जावें ।
या लोकीं भोग मातें प्रचुरपणिं असे भोगतां नित्य यावे ।
व्हावा उद्धार अंतीं सकलहि मनिशा पूर्ण होवोत देवा ।
द्यावे मातें असे हे सकल वर अतां मागतों देइं देवा ॥७॥
(गीति)
गणपति म्हणे वरेण्या, शंभूवांचून एकला भारी ।
सृष्टीमध्यें होसी, मानिति तुजला म्हणून जन भारी ॥८॥
देतों पुरें तुला मी, लोहाचें रजत आणखी हेम ।
ऐशीं तीन पुरे हीं, असती म्हणुनी त्रिपूर हें नाम ॥९॥
सृष्टीमधील सारे, भोग पुरे भोगशील सौख्यानें ।
तिन्ही पुरें सदाशिव, छेदी तेव्हां शरेंच एकानें ॥१०॥
तेव्हां तुजला मुक्ती, शिव-चापानें मिळेल हें समज ।
होतील पूर्ण हेतू, जन्म तुझा सफल होतसे सहज ॥११॥