मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६१

उपासना खंड - अध्याय ६१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कृतवीर्याच्या जनका, विधि कथिती वृत्त हें चतुर्थीचें ।

अंगारक नामक या, वृत्ता कथिती महत्त्व हें त्याचें ॥१॥

पूर्वी अवंति नगरीं, भारद्वाज प्रमूख मुनि होता ।

वेदादि शास्त्रकूशल, अग्नीहोत्री प्रमूखसा होता ॥२॥

विद्यादाना रतही, कर्मठपणिं वर्तनांत बहु पुनित ।

एके दिवशीं स्नाना, क्षिप्रेवरि पातला मुनि त्वरित ॥३॥

क्षिप्रेवरि प्रभातीं, स्नानासी एक अप्सरा आली ।

पाहुन तिला मुनीची, कामातुर चित्तवृत्ति ही झाली ॥४॥

रेतस्खलन तयाचें, झालें तें भूमि सांठवी उदरा ।

प्रसवे सूता मग ती, रंगी जाश्वत्‌कुसूम एक सरा ॥५॥

पालन केलें त्याचें, भूमीनें सात वरुष मायेनें ।

सूतें तियेस पुशिलें, प्रसवे कैसा सुरक्त अंगानें ॥६॥

ऐकुन कुमार वचना, सांगे त्याला जनीत वृत्तान्त ।

ऐकुन बोले मजला, दाखविं माते कुठें असे तात ॥७॥

मानियलें भूमीनें, घेउन गेली तयास मुनिपाशीं ।

स्वीकारा या सूता, प्रेमें आलिंगिलें स्वभुजपाशीं ॥८॥

(शार्दूलविक्रीडित)

भारद्वाज बघे सुदीन बरवा मौंजी तयाची करी ।

वेदाभ्यास तयाकडुन करवी मंत्रोपदेशा करी ।

सांगे त्यास उपासना, गणपती शास्त्रोक्त तूं त्या परी ।

वर्ते सूत झणीं तपा करितसे बैसोन नेमापरी ॥९॥

पाहे स्थान तपास शांत बरवें श्रीनर्मदेच्या तिरीं ।

भावें तीव्र तपा करी प्रचुर तीं वर्षे तिथें यापरी ।

पावे श्रीप्रभु त्यास दे वर तिथें ऐकें नृपा तूं अतां ।

सांगे त्या विधि शांत तो श्रवतसे भक्तांस हा तत्त्वतां ॥१०॥

(गीति)

माघी शुद्ध चतुर्थी, होती तेव्हां तपास त्या दिवशीं ।

भूमी पुत्रा देई, गणेश वर ते कथीतसे त्यासी ॥११॥

भूमीपुत्र गणेशा, स्वर्गांतिल वास दे सुधापानीं ।

मागे त्रिभुवनिं माझें, होवो विख्यात नाम वरदानीं ॥१२॥

मजला वरप्रदानीं, तोषविलें ज्या तिथीस शुभकारी ।

होवो अशा वरासी, द्यावें देवा स्मरोन भक्त करी ॥१३॥

(उपजाति)

देवेश देती वर भूमिपुत्रा । स्वर्गास राहे सुरसा कुपुत्रा ।

प्राशीत तेथें सुरसा सुधेला । प्रख्यात हो मंगल नाम तूला ॥१४॥

अंगारकांती तव देह आहे । म्हणून अंगारक नाम लाहे ।

जन्मून भूमी उदरीं सुकाया । म्हणोन घे भौम असें वरा या ॥१५॥

देऊन ऐसे वर तेथ देव । अदृश्य झालें स्थलिचें सुदैव ।

स्थापीतसे तेथ सुरालयासी । स्थापी तिथें भौम गजाननासी ॥१६॥

शुंडा असे एक दहा करांनीं । मूर्ति अशी युक्त करी करांनीं ।

ठेवीतसे मंगलयुक्त मूर्ती । प्रख्यात नामें जगतांत मूर्ती ॥१७॥

(गीति)

श्रीमद्गणेश आज्ञें, दूतांनीं आणिलें विमानासी ।

बसवुन कुपुत्र नेती, गणपतिच्या त्या पदांबुजांपाशीं ॥१८॥

भूमीपासुन झाला, जन्म तयाचा म्हणून त्या भौम ।

होती प्रसन्न तेव्हां, तीथ चतुर्थी असेहि दिन भौम ॥१९॥

यास्तव याच तिथीला, महत्त्व आहे विशेष वरदानें ।

झाला कुपुत्र तेव्हां, वन्हीपरि तो असेच रंगानें ॥२०॥

यास्तव त्याला दुसरें, अंगारक हें प्रसिद्ध नाम असे ।

भौमदिनीं चौथीचें, अंगारकि हें म्हणून नाम असे ॥२१॥

मंगलमूर्ती स्थापित, स्थान असे पारनेर नगराचें ।

पश्चिमभागीं आहे, चिंतामणि क्षेत्र हें असे साचें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP