(गीति)
कौंडिन्य भूप निधना, नंतर कथिती पुढील वृत्तासी ।
विश्वामित्र मुनी हें, भीमाला भीम-पुत्र कथनासी ॥१॥
कुंडिनपुरांत नूतन, राजा करण्यास योजिला दिवस ।
ज्योतिषघटीत पाहुन, उत्तमशा योग्य योग्य समयास ॥२॥
नगरींचे जन सारे, पाचारी राज-मंदिरीं सुलभा ।
हस्तीन एक अणवी, रंगी नटवी बहुत दे शोभा ॥३॥
शुंडेंत रत्नमाला, देउन विनवी तिला सती राणी ।
राज्यास योग ऐसा, निवडी मानव फिरुन तो आणी ॥४॥
वाद्यें वाजति नाना, चारण करिती स्तुतीस कीं गाना ।
समुदाय त्यांत सोडी, अघ्राणुनि पारखी शिरें नाना ॥५॥
अपुल्यास राज्य व्हावें, यास्तव जमला बहूत जनवृंद ।
भूपति तशाच नारी, घेउन पुत्रांकडेसि सुत-वृंद ॥६॥
हस्तिन फिरुन पाहे, जमलेला जनसमूह लवलाहें ।
जिकडे गणेशमंदिर, तिकडे गेली वनांत ती पाहे ॥७॥
पूजी गणेशमूर्ती, कमलासुत दक्ष त्यास ती पाहे ।
कंठीं माळा घाली, हस्तिन हें सह समूह हा पाहे ॥८॥
हस्तिन शोधित राजा, सर्वांना मान्य जाहला काय ।
मंत्री तपास घेती, नेती तो थाट पाहती काय ॥९॥
मंगल वाद्यें वाजति, जयघोषें गर्जतीहि ललकारी ।
राज्याभिषेक केला, दक्षाला मोद जाहला भारी ॥१०॥
माता मुद्गल आणुनि पूजा करि दक्ष भूप भक्तीनें ।
मुद्गल तोषित केला, विप्राम्ना दीधलीं बहू दानें ॥११॥
वल्लभ भीम नृपाला, कळलें हें वृत्त तेधवां आला ।
मोदें सुतास दिधलें, आलिंगन नी पिता सुतें नमिला ॥१२॥
स्वप्नीं गणेश येउन, सांगे दृष्टान्त वीर सेनास ।
अपुली उपवर कन्या, दक्षा देईं सुयोग्य समयास ॥१३॥
दक्षास बृहत् भानू, सुत झाला त्यास पुत्र हलधर हा ।
त्याचा पुत्र सुधीला, पद्माकर त्यास होइ नामक हा ॥१४॥
रिपुमर्द पुत्र झाला, त्या पुढती चित्रसेन तो झाला ।
त्यापासुन भीमा तूं, जन्मा आलासि सांगतों तुजला ॥१५॥