(पृथ्वी)
ऋषींस कथिती कथा सुत फल-श्रुती ती विधी ।
श्रवोन वदले बहू मुदित व्यास ते त्या विधी ॥
पितामह तुझीं सुधावचन प्राशुनी मच्छ्र्ती ।
पुनीत बहु जाहली परि नसे श्रुती तृप्त ती ॥१॥
कथी महति मंत्र तो आणिक मंत्र कोणी अधीं ।
कशापरिहि पावली यश मिळोन सांगे अधीं ॥
भृगू कथिति भूप जो व्यथित पातला आश्रमीं ।
तयास कथिती कथा विधि तशीच व्यासास मी ॥२॥
विधी म्हणति त्या तुझ्यासम असे खरा शिष्य हा ।
म्हणून कथितों तुला स्व-मुख मंत्र ऐकें महा ॥
असें प्रथित नाम हें जपत ॐम एकाक्षरी ।
गणेश भगवान हा धरि शिरींच एकाक्षरी ॥३॥
करी प्रथम पूजना मनिषकार्य साधे पहा ।
जपास बसतां अधीं दृढ धरीच विश्वास हा ॥
जपास बसण्यास तूं स्थल निवान्त योजीं बरें ।
अशापरि करी तपा फल मिळेल बा सत्वरें ॥४॥
हरी सकल विघ्रही करिं कृपा बरी तूं मुनी ।
सुरा असुर चारणीं गुहक नाग यक्षीं मनीं ॥
तसेंच भजती अधीं सकल देवही किन्नर ।
तसेच भजती अधीं सुरसगायकी तत्पर ॥५॥
(गीति)
कवणा कसा गजानन, झाला व्यासा प्रसन्न इतिहास ।
ऐसे स्वस्थ मनानें, श्रवण करी ठेवि प्रेम विश्वास ॥६॥
(साकी)
प्रलयकाल हा होतां जेव्हां पर्वतही उडतात ।
सूर्यतपानें सारे जलधी शुष्क शुष्क होतात ॥७॥
॥धृ०॥ सुन सुन वृत्तासी, भूपति या कालासी ।
नंतर अग्नी प्रकटुनि अवनी दग्ध करी उद्ध्वस्त ॥
वायू आणिक सूर्य अग्नि हीं सकल करी तीं फस्त ॥८॥
नंतर नीरद नाम तयाचें "संवर्तक" हें त्याचें ।
गजशुंडे-इव वर्षुनि उदकें जलमय करि सृष्टी चें ॥९॥
ऐशापरि हीं भूतें सारीं सृष्टीच्या नाशास ।
अनुक्रमानें बहु क्षोभुनी तत्पर हीं समयास ॥१०॥
अशा प्रसंगीं परमात्मा हा अणु-रुपां धरितो ।
नाम गजानन कोठें तरिही स्थीर होउनी वसतो ॥११॥
अशा स्थितींतहि बहुत काल हा अंधःकारीं असतो ।
सर्व विश्व हें औदासीन्यें पिडितसे बघतो ॥१२॥
(दिंडी)
सख्या व्यासा हें ॐकार-रुप ।
नादब्रह्माही युक्त मायरुप ॥
उभयसंयोगें जगत निर्मियेलें ।
तोचि परमात्मा गणाधीश झाले ॥१३॥
तयापासुन हे त्रिगुण जन्म होती ।
तसे त्रैमूर्ती जन्म पावताती ॥
अशा रीतीनें प्रलयकाल होतां ।
पुन्हा गणपति कीं जनन करी त्राता ॥१४॥
अशा मायेनें ब्रह्मादि देव झाले ।
कोण कवणा कार्यास जनित केलें ॥
कोण जनिता हा बोध नसे झाला ।
अशा पर्यायें उगम नसे झाला ॥१५॥
स्वजनिं त्याचा शोध करायासी ।
एकविंशति स्वर्ग फिरे ऐसीं ॥
पुढति महिवरती शोध बहू केला ।
सप्त पाताळें शोधितां नसे झाला ॥१६॥
म्हणुनि त्यांनीं बा तीव्र तपा केलें ।
सहस्त्र वरुषें कीं कष्ट बहू केले ॥
परी त्यांना ही नसे प्राप्त झाले ।
म्हणुनि अवनीसी परत तसे आले ॥१७॥
(पृथ्वी)
समुद्र सरिता वनें सकल हीं तडागीं भले ।
तसेच गिरिही बहू फिरुन ते अती श्रांतले ॥
परंतु जनिता कुठें श्रमुनियां नसे लाभला ।
म्हणून करिती पुनः बहु तपास त्या निर्मला ॥१८॥
अशा समयिं त्या नभीं अमित तेज तें पाहिलें ।
तयास बघतांच ते नयनही दिपों लागले ॥
म्हणून नभ हे तिघे फिरुनि ते श्रमी जाहले ।
अशी करुण ही स्थिती बघुन त्यां प्रभू भेटले ॥१९॥
(शार्दूलविक्रीडित)
रुपानें हरिलें मना पद-नखें रातोत्पलें लाजलीं ।
काया ती बघतां रवी-वरुण-भा तैसी दिसों लागली ॥
त्याचें जें कटिसूत्र हेंचि पिवळें तेजागळें मेरुसी ।
भासे ज्या कर ते चतुर्थ असती त्यामाजि शस्त्रें अशीं ॥२०॥
हस्ती ज्या असती असित्रिशुलही धन्वादि शक्ती अशी ॥
नासा सुंदर ही असे करि जशी शुंडेपरी ही अशी ॥
कांती त्या मुखमंडला तिथि-शशि भासे तया आगळी ।
ज्याला एकचि दंत हा हरवितो वाराहदंतावळी ॥२१॥
शुंडाग्रास बघून भीत असती ऐरावतादी गज ।
तेजस्वी बहुसूर्य-भा-इव असे ज्याचा किरीट ध्वज ॥
वस्त्रांनीं हरिला प्रकाश अवघा तारांगणाचा जसा ।
ब्रह्मादी स्तविती गजानन तदा ध्यानीं मनीं हा असा ॥२२॥