मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ३१

उपासना खंड - अध्याय ३१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

रुक्मांगदास नारद सांगे वृतान्त तो भृगू कथितो ।

ऐकें शांत मनानें नृपती तो सोमकांत आश्रमिं तो ॥१॥

गौतमभार्या बोलत इंद्राशीं आश्रमीं असें जेव्हां ।

स्नान करुनियां आले गौतम मुनि परत आश्रमीं तेव्हां ॥२॥

अपुली दारा एव्हां नियमापरिती उभी नसे दारीं ।

हातीं घेउन पाणी पाहेना वाट मानसी हेरी ॥३॥

न दिसे दारा म्हणुनी हांका मारी मुनी तिला तेव्हां ।

नित्यापरि आसनही नाहीं म्हणुनी मुनी पुसे तेव्हां ॥४॥

मुनीच्या वचना ऐकुन, कांपत कांपत पुढें उभी राहे ।

पातिव्रत्यापासुन, भ्रष्ट म्हणूनी वरी नसे पाहे ॥५॥

साष्टांग प्रणिपातें वंदन केलें तिनें पतीचरणीं ।

झालें वृत्त पतीला कथिलें सारें हळूच लीनपणीं ॥६॥

ऐकुन वृत्त मुनी तें कोपानें बोलिला असे सतिला ।

दुःशीले तुजलागीं इतुका सहवास हा फुकट गेला ॥७॥

इंद्राचें कपट कसें कळलें नाहीं वदोन धिःकार ।

करितां झाला गौतम शाप वदे शासनास घोरतर ॥८॥

शीलापासुन भ्रष्टे यास्तव होई शिला पडे धरणीं ।

श्रीराम येत फिरतां उद्धरसी स्पर्शतां तुला चरणीं ॥९॥

गौतमशापें झाली शीला तत्काळ ती पडे धरणीं ।

पाहुन प्रकार इंद्रा कंप सुटे भीतिनें बसे धरणीं ॥१०॥

काय करावें आतां जाऊं कोठें लपूं तरी कोठें ।

झाला विद्रापरि तो, मांजररुपा धरी निघे वाटे ॥११॥

मुन्याश्रमांतुनी तो निघतांना जाणिलेंच त्या मुनिनें ।

अंतरसाक्ष करुनी वदते झाले तयास या वचनें ॥१२॥

नीचा तूं देवांचा राजा आहे म्हणून शापानें ।

भस्म करित मी नाहीं शासन दे योग्य तुजसि कर्मानें ॥१३॥

भग लंपट तूं झाला यास्तव अंगा सहस्त्र हो भग्नें ।

भाषण कानीं पडतां दिसती अंगास त्यास तीं भग्नें ॥१४॥

(हरिणी)

बघुन नयनीं दुःखी झाला वदे सुर-भूपती ।

मजहि गुरुंनीं केलें बोधा नसे तिकडे मती ।

म्हणुन फळ हें भोगीं आतां स्मरुन वदे असें ।

वदन अपुलें न्यावें देवासमोर असें कसें ॥१५॥

अधम मदनें केली कैसी मदीय अशी स्थिती ।

अधम मदना धिक्कारी तो कथूं वचनें कीती ।

मनुज करिती जैसी कर्मे तशीं फलं पावतीं ।

सहन करुनी भोगावीं तीं तशींचहि लागती ॥१६॥

(गीति)

ऐसें वदून इंद्रें, कीटकजातीसमान गोप असे ।

घेऊन रुपा लपतो, कमलाचा देठ त्यांत तो बैसे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP