(गीति)
आज्ञा होतां ऋषिंची, स्नानाकरितां समस्त ते गेले ।
ऋषि-पत्नि उभयतांनीं, प्रार्थुन त्या कामधेनुसी अणिलें ॥१॥
जाणुन कार्या तेव्हां, त्वरित करी आयती तिथें व्यासां ।
सुरभीकार्य कसें हें, करिती झाली क्षणांत मुनि-वासा ॥२॥
आधीं मंडप उभवी, घाली तेथें सुरम्य रांगोळी ।
जलपूर्ण भाजनें तीं, मांडुनी ऐशा अनेक त्या ओळी ॥३॥
दासी-दास जनांची, गर्दी झाली क्षणांत त्या ठायां ।
ताटें सुवर्ण मांडुनि, पक्वान्नें तीं अनेक वाढाया ॥४॥
षड्सयुक्त अशीं तीं, वाढिति अन्नें मधूरशीं ताटीं ।
स्नानें करुन आले, बसले सारे सुयोग्य त्या पाटीं ॥५॥
भोजन करण्यासाठीं, विनती केली तयांस शिष्यांनीं ।
वाद्यें मंजुळ वाजति, पद्यें म्हटलीं मधूर शिष्यांनीं ॥६॥
अश्रुतपूर्व असें हें, भोजन केलें बहूत आनंदें ।
असलें भोजन त्यांना, जन्मांतहि लाभलें नसेच वदे ॥७॥
भोजन झाल्यानंतर, मुखशुद्धीला दिले सुतांबूल ।
भूषित केलें मुनिंनीं, भूषणवस्त्रें करुन तीं बहल ॥८॥
वाजी-गजादि पशुही, तोषविले त्यां सुभक्ष देऊन ।
इतुकें झाल्यावर मग, भूपें पुशिलें मुनींस पाहून ॥९॥
आलों आधीं तेव्हां, कांहीं दिसलें नसे मला मुनि हो ।
मजला विस्मय वाटे, देखुन अद्भुत प्रकार सांगा हो ॥१०॥
सात्त्विक भावें मुनिंनीं, हा आहे कामधेनु उपकार ।
कथिलें भूपा तेव्हां, अभिलाषावी हरुन धेनु तर ॥११॥
भूपति मुनींस वदला, असली धेनू तुम्हांस कां व्हावी ।
मुनिंनीं वनांत रहावें, प्रेमानें कंदमुळेंहि सेवावीं ॥१२॥
अमुच्या येथें धेनू, असली तर ती अनेक कार्यार्थ ।
उपयोग तिचा करुनी, घेऊं ऐसा सुभाव इत्यर्थ ॥१३॥
भूपति आहे मुनि मी, बल आहे तें मदीय अनिवार ।
यास्तव द्यावी धेनू, अथवा नेऊं बळेंच साचार ॥१४॥
भूपति उद्धट वचना, ऐकुन मुनि त्या वदे सविस्तर तें ।
ऐकें व्यासा आतां, मुनिभाषण हें कथी विधी त्यातें ॥१५॥
सज्जन अससी भूपा, होता माझा खरोखरी तर्क ।
ऐकुन वचना तुझिया, नीच खरा तूं कळून ये तर्क ॥१६॥
सत्कार तुझा केला, घडली मोठी मदीय ही चूक ।
हंसें काक शिशूतें, बाळगिलें म्हणुनि हंस हो काक ॥१७॥