(दिंडी)
शूरसेनानें इंद्रास पूजियेलें ।
कसें अपुलें हो पूर वरी चाले ।
यत्न मजला सांगणें योग्य साचा ।
करिन लवलाहें यत्न वदे त्याचा ॥१॥
शूरसेनाला इंद्र वदे हें कीं ।
असो ब्राह्मण वा क्षात्रकुला जो कीं ।
करी संकष्टी नेम विधी सांग ।
तदिय पुण्याचें उदक तया माग ॥२॥
एक वर्षाचें पुण्य अम्हां लागे ।
पूर तेव्हां तें सहज चढूं लागे ।
असें ऐकुनियां शूरसेन बोले ।
ऐक व्यासा तें पुढति काय झालें ॥३॥
(गीति)
सुखकर मला अती हें, व्रत वदलां त्यास देवता कोण ।
हें व्रत कसें करावें, यापासुन पुनित जाहला कोण ॥४॥
इंद्र वदे भूपाला, पूर्वी नारद कथीत कृतवीर्या ।
केला असे तुला तो, सांगें इतिहास ऐक नृप-वर्या ॥५॥
या इतिहासें तुजला, संकष्टीचें महात्म्य समजेल ।
यास्तव तुजला कथितों, देईं अवधान कार्य करशील ॥६॥
पूर्वी जगतामाजी, नामें कृतवीर्य धर्मशील असा ।
भूपति पराक्रमी तो, होता, होता धनाढय सुज्ञ असा ॥७॥
त्याच्या सदनीं ब्राह्मण, भोजन चाले सदैव नियमानें ।
बारा हजार गणती, होते देई तयांस बहु दानें ॥८॥
त्याची कांता साध्वी, नाम सुगंधा तशीच प्रेमळ ती ।
कीर्ती जगांत गाजे, संतानाच्या सुखांत ये कमती ॥९॥
संतानसुखासाठी, दंपत्यांनीं बहूत ते यत्न ।
केले परंतु त्यांना, झालें नाहीं तयांस सुतरत्न ॥१०॥
पुष्कळ वर्षें झालीं, पुत्राविण भूपतीस ये वीट ।
यास्तव राज्य कराया, मंत्र्यांना दीधलीहि वहिवाट ॥११॥
दंपत्य तपासाठीं, कांतारीं जात वल्कलाधारी ।
तपसा करितीं झालीं, भक्षुनि पर्णे तसाच मेघ-अरी ॥१२॥
उभयें जर्जर झालीं, पाहे नारद तयांस त्या विपिनीं ।
स्वर्गी कृतवीर्याच्या, जनकाला विदित वृत्त तें करुनी ॥१३॥
सांगे पुत्रासाठीं, तीव्र तपा करुनियां स्नुषा-सूत ।
झाले मरणोन्मुख ते, जगतिल सूतास देखुनी खचित ॥१४॥
स्वर्गांतुन निघतांना, देखियलीं कुंभिपाकिं दंपत्यें ।
होतीं भ्रुशुंडि मुनिचीं, माता-पितरें कठीत दुःखातें ॥१५॥
पाहुन प्रकार सारा, नारद गेला भ्रुशुंडि मुनिपाशीं ।
वृत्तान्त तया सांगे, ऐकुन मुनि चकित होत त्यासरशीं ॥१६॥
क्षणैकदृष्टी झांकुन, अंतरदृष्टी बघून त्या मुनिनें ।
त्यांच्या उद्धारासी, योजियला तो उपाय मननानें ॥१७॥
त्यानें गजाननाचें, ध्यान करुनियां तयास आणविलें ।
प्रभुच्या हस्तावर तें, संकष्टीच्या व्रतोदका दिधलें ॥१८॥
बोले गजाननासी, भक्तीपूर्वक व्रतास कीं केलें ।
यास्तव या फलयोगें, उद्धारावें कुळास मुनि बोले ॥१९॥
पडतां गजाननाच्या, हस्तावर पुण्य-उदक तेव्हांच ।
झाले पुनीत सारे, नरकांतुन नेति दूत ते साच ॥२०॥
आणुन विमान पितरां, बसवुनि स्वर्गास नेति ते दूत ।
एक दिनाच्या पुण्यें, तरले सारे प्रकार अद्भूत ॥२१॥
इंद्र वदे भूपाला, केलें व्रत हें अजन्म कीं ज्यानें ।
उड्डाण करी भूपा, पुर त्याच्या तो बघेल पुण्यानें ॥२२॥