मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७७

उपासना खंड - अध्याय ७७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(चामर)

देवदूत सांगतात शूरसेन भूपती ।

पूर्वकालिं गौडपूर त्यांत गौड वानिती ।

वेदशास्त्रपूर्ण विप्र एक त्यांत हा असे ।

शाकिनी सतीस नाम योग्य प्रेम त्या असे ॥१॥

त्यास पुत्र जाहला बहूत प्रीय तो असे ।

रुपवान हास्यमुख बोलकाहि तो असे ।

योग्य कालिं लग्न त्यास गूण कन्यकें करी ।

नाम तीस दीधलेंच सत्यवान नोवरी ॥२॥

योषयुक्त होत तों करित संग योषिता ।

छंद त्यास लागला गृहास होय त्यागितां ।

भूषणादि चोरुनीहि देत तीस नित्य तो ।

तस्करें धनादि लूटिलें म्हणून सांगतो ॥३॥

कामयुक्त वासना बहूत वाढली असे ।

आठ आठ दीन तो गृहास येतही नसे ।

तात सूत वर्तनास पाहुनी दुखावला ।

एकदांच योषिता गृहांत पुत्र गांठिला ॥४॥

(हरिणी)

वदत तनया चंद्रालागीं कलंक जसा असे ।

मम कुळिं तरी तैसा होसी जनीत तसा दिसे ।

दगड असतां तूंही मातें खचीत रुचे तरी ।

जनकवचना ऐकूनी तो क्रुधीत हि अंतरीं ॥५॥

(गीति)

क्रोधें अविचारानें, अधमानें ताडिला बहू जनक ।

प्राण तयाचा गेला, अधमानें ओढिला त्वरें आणिक ॥६॥

टाकी घाणीमाजी, प्राशुन मद्यास घालवी रजनी ।

आनंदानें होता, वैश्यागृहिं तो तियेस मोहूनी ॥७॥

दुसरे दिवशीं गेला, सदनीं अपुल्या स्थिती कशी झाली ।

माता उपदेशी त्या, न रुचे क्रोधें तिला वधी स्वबलीं ॥८॥

माता पिता वधूनी, स्वेच्छाचारें करीत दुष्कर्म ।

एके दिवशीं सति ती, सांगे पतिला सुवर्तनीं मर्म ॥९॥

अपुली भार्या असुनी, रुप गुणानें कमी नसें मीही ।

वेश्येंत काय रमतां, रमण्याची हौस ती असे ती ही ॥१०॥

मजला स्वइच्छ ठेवा, त्यापरि वर्तेन सांगतें खास ।

केलें कर्म पुरें हें, आपण ब्राह्मणकुळांतले खास ॥११॥

पत्‍नीचें भाषण हें, अधमासी लागलें असे वर्मीं ।

वाटे शल्यापरि तें, दुस्सह झालें तयास तें वर्मीं ॥१२॥

बुचडा धरुन तिजला, लत्ता मारुन पाडिलें अवनीं ।

दंडें ताडुन तिजला, पाठवि स्वकरें त्वरीत यमसदनीं ॥१३॥

माता पिता नि कांता, मारुन झाला निवान्त तो दुष्ट ।

वर्ते स्वेच्छाचारें, वेश्या संगें रमोन कुल-नष्ट ॥१४॥

कांहीं अवधी जातां, अधम शिरे कालभी घरीं दिवसा ।

त्याची पत्‍नी स्वबळें, भोगी तेव्हां तयास शाप असा ॥१५॥

मजवरी जुलूम केला, सर्वांगीं कुष्ट हो तुझी काया ।

शाप तुला हा आहे, जन्मोजन्मीं न टाळवे वायां ॥१६॥

शापित असा नरातें, बहु पापांनीं अनंत यमजाच ।

कल्पाब्द काल संख्या, भोगुन उपरी तया जनन हेंच ॥१७॥

पूर्वीच्या शापानें, कुष्टी झाला बहूत पातक तें ।

यास्तव या दृष्टीनें, विमानगति खुंटली असे हो तें ॥१८॥

(दिंडी)

शूरसेनानें ऐकिलें असें वृत्त ।

म्हणुन त्याचें जाहलें खेद चित्त ।

तया पाप्याची मुक्तता कशी व्हावी ।

म्हणुन दूतांसी पूशिलें कृपा भावी ॥१९॥

देवदूतांनीं यत्‍न कथन केला ।

चारअक्षरि तो मंत्र निवेदीला ।

तया पाप्यासी मंत्र हाच सांगे ।

तया मंत्रानें पाप पूर्ण भंगे ॥२०॥

तया पाप्याच्या शूरसेन कर्णी ।

मंत्र सांगे हा तीन वेळ वाणी ।

मंत्र ऐकुनियां शुद्ध देह झाला ।

भूप सर्वांसह गणपपुरा गेला ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP