मंत्र जपणे-पूर्वी पद्मासन घालणें, इंद्रियदमन करणें व न्यास करणें असा जपाचा विधि आहे.
मंत्रप्रकार:-
एकाक्षरमंत्र-
एक अथवा अर्धा लक्ष जप, षडक्षरमंत्र-एक अगर दहा लक्ष जप, पंचाक्षर व अष्टाक्षरमंत्र तितकाच व अठ्ठावीस वर्णाक्षर मंत्र १०,००० जप करावा; हे मंत्र प्रमुख होत.
हिमालयानें पार्वतीला एकाक्षर व षडक्षर मंत्रांचा एक महिनाभर जपण्याचा उपदेश केला.
जपाचा पहिला प्रकार-श्रावण शु.४ ते भाद्रपद शु.४ अखेर व दुसरा प्रकार---भाद्रपद शु.४ ते आश्विन शु०४ अखेर जप करुन सांगता करावी.
प्रतिमापूजन-
स्त्रियांनीं व पुरुषांनीं मृत्तिकेच्या प्रतिमेचें पूजन करावें म्हणजे धन, पुत्र, पशु इत्यादिकांची व इष्ट हेतूची प्राप्ति होते म्हणून सांगितलें. नित्य पार्थिव पूजा अधांतरीं गोमय आणूनही करण्यास सांगितलें आहे.
प्रतिमासंख्या फलें
प्रतिमा १ - असाध्य गोष्टी साध्य होतात.
प्रतिमा २- असाध्य गोष्टी साध्य होतात.
प्रतिमा ३- राज्य, रत्नें व संपत्ति मिळते.
प्रतिमा ४- चार पुरुषार्थ-धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे मिळतात.
प्रतिमा ५- सार्वभौम राजा होतो.
प्रतिमा ६- सृष्टि, स्थिति व लय हीं करण्याचें सामर्थ्य येतें.
प्रतिमा ७ - ८ - ९- सर्वज्ञ होणें व त्रिकाळज्ञ होणें.
प्रतिमा १०- सर्व तेहतीस कोटि देव व सनकादिक देव वश होतात.
प्रतिमा ११ - एकादश रुद्राचा स्वामी होतो.
प्रतिमा १२- द्वादशसूर्याचा सत्ताधारी होतो.
१०८ कोणतींही संकटें येत नाहींत.
१,००,००० मोक्ष मिळतो.
प्रतिमा ५ - (३-५-७) दिवस पूजा केल्यास कारागृहांतून मुक्त होतो.
७ रोज पांच वर्षे पूजन केल्यास महापापें नाहींशीं होऊन मुक्त होतो.
प्रतिमा १ - पूजन जन्मभर करणारा प्रत्यक्ष गजाननस्वरुप होतो. याच्या दर्शनानें दुसर्यांचीं विघ्नें निवारण होतात. याची पूजा केली असतां गजानन संतुष्ट होतो-तशी प्रत्यक्ष गजाननाची पूजा केल्यानेंही होत नाहीं.
प्रतिमा ३- पूजन नऊ दिवस केल्यास रोग नाहींसा होतो.
प्रतिमा :- सुवर्ण, रजत, ताम्र, कांस्य, मौक्तिक, प्रवाल यांपैकीं असल्यास त्वरित सिद्धि होते.
भाद्रपद शु.४ स गणपतीचें पूजन, उत्सव, जागरण, गायनवादन इत्यादि करावीं. तसेंच जपाचे १/१० होम व बलिदान, आचार्यपूजन, गो, वस्त्र, भूमि इत्यादि दानें देऊन करावें. होमाचा १/१० तर्पण व तर्पणाचा १/१० ब्राह्मणभोजन--विशेषतः दंपत्यें असावी. त्यांची यथोपचारें पूजा करावी. नंतर दुसरे दिवशीं प्रतिमा पालखींत घालून वाजतगाजत छत्र-ध्वज-पताका-चवर्या इत्यादि घेऊन मोठया पवित्र जलाशयांत प्रतिमा विसर्जन करावी. हा विधि अ. ४९ व ५० यांत सांगितला आहे.
टीप - १ श्रावण शु० ४ पासून भाद्रपद शु० ४ पर्यंत ब्रह्मचर्य व्रतानें राहून गणपतीचें पूजन करावें. उपवास, एकभुक्त नक्त किंवा अयाचित वृत्तीनें दिवसाच्या चवथ्या भागांत ह्विश्वान्नाचें भोजन करावें. मीठ वर्ज्य करावें. षडक्षर, चतुरक्षर, द्वयक्षर, एकाक्षर, दशाक्षर किंवा द्वादशाक्षर यांपैकीं उपदेशानुरुप मंत्राचा लक्ष किंवा दहा लक्ष जप करावा. अथवा त्याच्या निम्में करावा. तसेंच १/१० होम करावा. सावधपणानें गजाननाचें ध्यान करावें. भाद्रपद शु०४ स चार अगर दोन तोळे सोनें घेऊन त्याची मोरावर किंवा उंदरावर आरुढ झालेली सुंदर प्रतिमा करावी. सुंदर मखरांत धान्यराशीवर सोनें, रुपें किंवा तांबें धातूच्या कलशावर पूर्ण पात्र ठेवून, पंचपल्लव व पंचरत्नें घालून कलशास वस्त्र वेष्टून पीठपूजा करावी. त्या कलशावर प्रतिमा स्थापावी. यथोपचार पूजा करावी. अनेक द्रव्यांचें हवन करावें. आचार्यपूजन, १०८ ब्राह्मणभोजन अगर २१ ब्राह्मणभोजन करावें. दीन, अंध, पंगू इत्यादिकांना अन्नदान व खीरमिश्रित भोजन द्यावें. ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावे. आप्तेष्टांसह मौनीं भोजन करावें. नंतर प्रतिमा उत्तरपूजन व विसर्जन करुन व्रताची नेमसांगता करावी.