मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २२

उपासना खंड - अध्याय २२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (भुजंगप्रयात्)

भृगूसी वदे भूपती सोमकांत ।

कसा जाहला दक्ष देहीं सुकांत ॥

असा आंगवायू मुनी मुद्गलाचा ।

कसा तो असे त्या मुनी उत्तमाचा ॥१॥

कसा लाभ झाला त्वरेनें तपाचा ।

कसा लाभ झाला प्रभूदर्शनाचा ॥

बरें पूर्वजन्मीं पुण्य तें काय केलें ।

असें व्यंग कैसें तया देहिं आलें ॥२॥

जईं मुद्गलानें तपा फार केलें ।

तईं त्याजला दर्शनें मुक्त केलें ॥

नसे हें कसें जाहलें सांग मातें ।

असें भूपती पूसितो त्या मुनीतें ॥३॥

मुनी भूपतीला कथी वृत्त जें तें ।

करी संशयो दूर भूपा अतां तें ॥

सतीनें प्रधानें मनें शांत केलीं ।

कथा ही पुढें ऐकिली त्याच कालीं ॥४॥

(गीति)

पूर्वी सिंधूदेशीं, पल्ली नामें पुरांत कल्लयाण ।

नामें वैश्य असे तो, धार्मिक नी दानशूर तो जाण ॥५॥

कांता इंदुमति ती, साध्वी आणिक पतिव्रता त्याची ।

समयोचित कालीं ती, बल्लाळभिद सुपुत्र जन्मेची ॥६॥

बालक लहान असतां, देवपुजेचा तयास बहु छंद ।

खेळगडयांसह जाई, ग्रामाबाहेर नित्य हा नाद ॥७॥

दगडांचे देव करी, त्यांची पूजा करीत बैसतसे ।

मित्रांसह एक दिनीं, गोटयांच्या गणपतीस पूजितसे ॥८॥

दूर्वा आणिक पर्णां, गणपतिला पूजिती हि तोक असे ।

काया वाचा मनसें, तल्लिन झाले वनांत मधु-प असे ॥९॥

ध्यानीं निमग्न कोणी, कोणी जपती गणेशनामास ।

कोणी नाचति भजनीं, कोणी करिती गणेशगानास ॥१०॥

कोणी देऊळ करिती, मंडप करिती बहूतसा वानीं ।

गंधाक्षतादि योजिती, नाना उपचार बाळ त्या रानीं ॥११॥

पूजेची सामग्री, रानांतिल जीं फुलें तशीं पानीं ।

त्यांतील एक बालक, पुराण सांगे तयांस बोधूनी ॥१२॥

इतरीं निवेदिलें तें, एकाग्रें करुन शांतशा चित्तीं ।

एणेंपरि शिशु सारें नाना कार्ये करुन रंजन तीं ॥१३॥

ते सर्व तोक झाले, पूजेमजी वनांत ते गुंग ।

तृष्णा क्षुधाधि सारे, विस्मृति झाले जसे मधा भृंग ॥१४॥

(भुजंगप्रयात्)

मुलांची असे काळजी पालकांसी ।

म्हणूनी तयां शोधिती ग्रामवासी ॥

कळे त्या कुमारास येई सवें तो ।

वणिक्‌पुत्र बल्लाळ नेतो वनीं तो ॥१५॥

असे सांगती लोक ते ग्रामवासी ।

सुता आवरीं वैश्य कल्लयाण यासी ॥

जरी तूं तया नावरीसी तरी हें ।

करुं श्रूत सारें पुरी श्रेष्ठ त्या हें ॥१६॥

अशा भाषणा ऐकुनी वैश्य जेव्हां ।

तया क्रोध आला वना जाइ तेव्हां ॥

मुलें पाहती क्रोधमुद्रा तयाची ।

करीं देखिली यष्टि ही जाण साची ॥१७॥

असें पाहुनी तोक सारे फरारी ।

तया सांपडे पुत्र त्यांचा पुढारी ॥

तया ताडुनीयां रक्तबंबाळ केलें ।

तया वृक्ष-वल्लीं तिथें बांधियलें ॥१८॥

मुखें बोलला कोणता देव सोडी ।

तुला खावया कोण घालील कोडी ॥

स्वहस्तें करी भंग त्या मंदिराचा ।

स्वहस्तें त्यजी देवही पूजनाचा ॥१९॥

भृगू सांगती वैश्यवार्ता नृपाला ।

पुढें सूत त्याचा स्तवी त्या प्रभूला ॥

तुझ्या पूजनें विघ्न हें नाश होतें ।

तुझें नांव हें विघ्नहर्ता असे तें ॥२०॥

परंतू तुझ्या पूजनें योग ऐसा ।

चमत्कार वाटे असा भोग कैसा ॥

स्तवी यापरी पूर्ण भक्ती करुन ।

पहा तोक त्यातें नमीं आळवून ॥२१॥

(शार्दूलविक्रीडित)

शेषानें त्यजिलें जगास रवि तो सोडी प्रभेला जरी ।

अग्नीनें त्यजिलें स्वतेज अपुलें सोडी न भक्तां तरी ॥

ऐशी कीर्ति तुझी प्रथीत श्रवणीं ग्रंथांतरीं हें असे ।

कोपानें फुगला पित्यास वदला शापासही देतसे ॥२२॥

मोडी मंदिर ही प्रभूस त्यजिलें साठीं तुला शाप हा ।

होसी अंध मुका तसा बधिर तूं कुब्जी तनू ही पहा ॥

माझी भक्ति जरी तुम्हांस रुचली साचा करी शाप हा ।

बोले बालक हा स्तवास करुनी बापास शापीत हा ॥२३॥

(गीति)

तातें ताडण केलें, बंधन केलें म्हणून वाईट ।

वाटत नाहीं मजला, पण पूजा भंगणेंच वाईट ॥२४॥

कोणी झाला तरिही जड देहासी करील तो बद्ध ।

मन्मन भक्तिस तोही, योग्य नसे बंधनासि हें सिद्ध ॥२५॥

हे देवा मी तुजला, अनन्यभावें भजोन मरणार ।

शाश्वत नाहीं देहहि, योजियला त्याग खास साचार ॥२६॥

(इंद्रवज्रा)

बल्लाळ भक्ती निरखून भाव ।

रुपीं नटे तो द्विज-राज देव ॥

उदयास येई रविराज जेव्हां ।

प्रकाश पसरे जगतांत तेव्हां ॥२७॥

पाहून त्यातें करि बंध मुक्त ।

साष्टांग वंदी बल्लाळ भक्त ॥

शरीर झालें बहुतेजयुक्त ।

ज्ञानेंच झाला परिपूर्ण भुक्त ॥२८॥

(ओवी)

जगत्‌कर्ता । जगत्‌भर्ता । सुखकर्ता । विनायका ॥२९॥

दुःखहर्ता विघ्नहर्ता । भक्‍त्यर्था । गजानना ॥३०॥

संरक्षिता । पालिता । ज्ञातादाता । गणाधिपा ॥३१॥

बुद्धिदाता । सिद्धिदाता । विद्यादाता । गणपती ॥३२॥

धनदाता । वरदाता । भयत्राता । गजानना ॥३३॥

शत्रुहंता । कलावंता । यशदाता । विनायका ॥३४॥

(शुद्ध कामदा)

ऐकुनी स्तुती तुष्ट जाहले क्षेम देउनी त्यास बोलिले ।

शाप हा तुझा सत्य होइल देह सर्वही भग्न होईल ॥३५॥

(इंद्रवज्रा)

बल्लाळ बोले बहु आदरानें ।

भक्तीस देई पहिले वरानें ॥

क्षेत्रांत राहे दुसरे वरानें ।

विघ्नास नाशी अपुल्या बळानें ॥३६॥

(गीति)

गणपति म्हणे तयाला, राहें येथें करुनियां वास ।

यात्रेकरुहि घेती, माझ्या आधीं तुझ्याच नामास ॥३७॥

माझे भक्तस्थाना, बल्लाळायुत विनायकस्थान ।

ऐसे भक्तहि सारे, वदती हें भक्तिभावनें करुन ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP