(दिंडी)
सोमकांताला भृगू सांगतात । गूणवर्धन तो करुणरसें विनत ।
वदे कामंदा परि तया दया ने यी । बहू पापांनीं हृदय कठिण होई ॥१॥
वदे कामंदहि तया ब्राह्मणासी । अरे मूर्खा हे फुकट बोलतोसी ।
ऐक माझ्या तूं सकल भाषणाला । नको सांगूं तूं अमितबोधमाला ॥२॥
(ओवी)
तूं मला कासया बोधतोसी । तुझा बोध व्यर्थ मसी ।
दगडापुढें ओरडलासी । तैसें असे रे पंडिता ॥३॥
फुटक्या घटा कीं माजी । कायसा जीवन ओतितोसी ।
तरी तें त्यांत राहील कांजी । येणेंपरी होतसे ॥४॥
कीं मद्यप्याला तत्त्वज्ञान । तैसें मशीं हें भाषण ।
रुचत नसे कायसा शीण । करुं पाहसी बडिवारा ॥५॥
ज्यास असे कामविकार । शांत करित असे नर ।
त्यास लाज भीड नसणार । हें तुज ठाउकें नसे कीं ॥६॥
कीं जो करी द्रव्यसंचय । त्यासी असे दया काय ।
व्यर्थ विनवणी ही होय । तैसें पंडिता जाण पा ॥७॥
कीं वायसासी पवित्रता । कीं जुगार्यासी सत्यता ।
कीं नपुंसकास धीरता । साधेल कैसी ॥८॥
कीं सर्पासी क्षमा । पाहिलीस का विप्रोत्तमा ।
ऐसी शिकार न मिळे आम्हां । तरी कासया सोडावी ॥९॥
(गीति)
ऐसें भाषण करुनी, तो त्या विप्रास वधितसे दुष्ट ।
एणेंपरि कामंदें सहस्त्रावधि विप्र मारिले सुष्ट ॥१०॥
नमुन्यासाठीं भूपा, तुजला कथिली लहानशी गोष्ट ।
वृद्धापकाल येतां, कामंदासी बहुत हो कष्ट ॥११॥
नानापरि व्याधींनीं, जर्जर झाला बहूत कामंद ।
परिवारासह सेवक, हेळसती त्या नसेच आनंद ॥१२॥
संकटसमयीं भूपा, आठवला त्यासि एक द्विज-मित्र ।
त्यातें प्रार्थुन आणी, त्यासि म्हणे इतर आणुनी मित्र ॥१३॥
विप्राच्या भीडेस्तव, आणितसे भीत येति त्या सदना ।
कामंदानें पुशिलें घेतां कां दिल्यास बहु दाना ॥१४॥
ऐकुन विप्र म्हणाले तव दानासी अम्हीं नच शिवावें ।
तूं पापी बहु मोठा, म्हणुनी तुजशीं अम्हीं न बोलावें ॥१५॥
घेतां दान तुझें बा, किंवा भाषण करुन तव पापें ।
आम्ही पापी होऊं, म्हणुनी जातों नको तुझीं पापें ॥१६॥
विप्र घरासी येतां, त्या पाप्याचें दिसे अम्हां वदन ।
त्यासी भाषण झालें, पापाच्या क्षालनार्थ तें स्नान ॥१७॥
पापक्षयार्थ त्यांनीं, पवमानाचा समग्र जप केला ।
यापरि प्रायःश्चित्तें, विप्राम्चा संघ हा पुनित झाला ॥१८॥
इतुकें झाल्यानंतर, कामंदाची उडे पहा धुंदी ।
पश्चात्तापें रक्षा, पापांची होउनीच ये शुद्धी ॥१९॥
तेव्हां कामंदानें, विप्रस्नेहास एक पूशियलें ।
श्रीमद्गणेश-मंदिर, तेथें विपिनीं असेंच देखियलें ॥२०॥
पापक्षयार्थ जें धन, संकल्पित करुनि ठेविलें निकटें ।
तें त्या जीर्णोद्धारा, खर्चावें धन असें मला वाटे ॥२१॥
ऐसे वदून तेव्हां, आरंभीं इष्ट कार्य बहु नेटें ।
होतें लहान मंदिर, आतां धरि लांब रुंदसें मोठें ॥२२॥
देवालयास चारी, बाजूंना चार भव्यशीं द्वारें ।
फल-पुष्प-युक्त ऐशीं उद्यानें भोंवती लताभारें ॥२३॥
तैशाच चार कोनीं, बांधियल्या चार वापिका नामी ।
बहुतेक खर्च झालें, उरलें तें सर्व वारसा नामीं ॥२४॥
नंतर कांहीं दिवशीं, यम-सदना जाय पापि कामंद ।
यम-सेवक बहुतांपरि, शासुन करिती तयास अतिमंद ॥२५॥
(दिंडी)
पुढें कामंदा यमदूत यमापाशीं । उभे करिती नेऊन पुसायासी ।
चित्रगुप्तानें तया पूशियेलें । पापपुण्यासी साच निवेदीलें ॥२६॥
अधीं भागीसी काय सांग पाप्या । पुसे कामंदा चित्रगुप्त पाप्या ।
अधीं भोगीं मी पुन्य कर्मभोग । म्हणुन कामंदा जन्म राजयोग ॥२७॥
असे भूवरि तो सौराष्ट्र एक प्रांत । तिथें जन्मसि तूं राव सोमकांत ।
अशी ऐकुनियां पूर्वजन्मगोष्टी । राव शंकितसा दिसे ज्ञानदृष्टी ॥२८॥
अशा समयासी घडे चमत्कार । भूपदेहांतुन उडत पक्षि फार ।
तया टोंचुनियां बहुत शीणवीलें । मनीं संशय हे त्यास जाणवीलें ॥२९॥
(ओवी)
जयजयाजी मुनीवर्या । पशू पक्षी याच ठायां ।
वैर-भाव सांडुनीयां । नांदती ऐसें देखिलें ॥३०॥
ऐसें असतां मज विव्हलासी । कांहो पीडिलें या ठायासी ।
कांहीं अपराध घडे मशीं । सांगावें जी मायबाप ॥३१॥
मी आपणांसी शरण आलों । मी अती दीन झालों ।
मी रोगांनीं कष्टलों । यास्तव दया करावी ॥३२॥
रक्षण करणें आपुलें ब्रीदें । यातनामुक्त करा प्रसादें ।
यापरी राव मुनीसी वदे । क्षणक्षणा नमून ॥३३॥
ऐसें वदतां सोमकांत । तुवां संशय धरिला मनांत ।
त्याचें फल तुला येथ । प्राप्त झालें भूपा हें ॥३४॥
मुनी वदती सोमकांतासी । आतां भिऊं नको मानसी ।
विश्वास ठेवीं मम वाक्यासी । धीर धरीं भूपा हे ॥३५॥
हुंकारितां त्या समयासी । पक्षी सारे सहजेंसी ।
नाहिंसे होती हुंकारेंसी । भूप विलोकी तत्काळ ॥३६॥
आतां पूढिले प्रसंगीं । सूत सांगती ऋषीलागीं ।
तेंचि कथन ये प्रसंगीं । निवेदिती भृगू भूपा ॥३७॥
श्रीगणेशपुराणमहती प्राकृतकाव्यें यथामती ।
मयूर-सुत जनांप्रती । गणेश वदवी त्याचे मुखें ॥३८॥