(गीति)
कमलोद्भवास व्यासें, प्रश्नियलें वृत्त तें मुकुंदेचें ।
दुर्वृत्तें वागे जी, शापी रुक्मांगदास दुर्वाचें ॥१॥
म्हणती विधी तयाला, ऐक पुढें वृत्त हें मुकुंदेचें ।
सांगे कथा भृगू तो, ऐक म्हणे सोमकांत या साचें ॥२॥
कामानळेंच अबला पेटुन प्रबला तनू तिची पोळे ।
अशनें पानें न रुचे, प्रियकर ध्यानीं मनीं तिच्या खेळे ॥३॥
एकान्त अशा जागीं, विपिनीं बैसे तिथेंच ये झोंप ।
कामातुर ती पाहुन, इंद्र धरी भीमनंदना रुप ॥४॥
भोगी सुखें मुकुंदा, त्यायोगें गर्भ राहिला तीस ।
नवमास पूर्ण होतां, सुंदरसा पुत्र जाहला तीस ॥५॥
सतिच्या दुर्वृत्ताची, दास नसे त्या मुनीस व्यासा ती ।
वाचक्नवी मुनीतें, पुत्राचें जातकर्मही करिती ॥६॥
हर्षेयुक्त मुनी तें, पुत्रासी नाम देति गृत्समद ।
वर्षे पांच तयाला, होतां मौंजी करुन द्विज वेद ॥७॥
(शार्दूलविक्रीडित)
पुत्राला पठनास तात शिकवी आरंभ वेदां करी ।
वेदोक्तें सुरसा पुराण वचसा मंत्रांत त्याही परी ।
ऐसा मंत्र तयास देत वरदें वांच्छीत वांच्छा पुरी ।
होवो हा वर देतसे पुढति त्या आब्दें बहू तीं पुरीं ॥८॥
शक्राच्यापरि तो प्रताप तनुनें कांतींत कामापरी ।
स्कंदाच्या परि तो पराक्रम गुरु धीमंतही त्यापरी ।
दानीं शूर असा, बली परि असे राजा गुणांनीं असा ।
नामें माघध देश अह मघध हें नामेंच राजा असा ॥९॥
त्याची या सदनीं असे म्रुत-तिथी श्राद्धास सांगे द्विज ।
आले अत्रि वशिष्ठ गाधिज मुनी आदी करुनी द्विज ।
त्यामध्यें दिधलें अमंत्रण नृपें वाचक्नवीच्या सुतां ।
ऐसे थोर मुनी बसून करिती शास्त्रीय ती वाच्यता ॥१०॥
मध्यें गृत्समदें मदें करुन तो बोले बहू कूशल ।
धिक्कारें वदले तयास मुनि ते अत्री-मुखींचें शल ।
झाला जन्म नसे मुनीकडुन रे रुक्मांगदापासुन ।
झाला यास्तव तूं सुत नसें वीर्यें ऋषीपासुन ॥११॥
यासाठीं अमुची तुझी कशि बरें होईल मैत्री तरी ।
जावें यास्तव तूं निघून अपुले येथून आतां घरीं ।
ऐसें भाषण ऐकुनी तदुपरी कोपोन अग्नीपरी ।
भासे त्या मुनिंसी तिथून पळती कित्येक गेले घरीं ॥१२॥
(गीति)
क्रोधें थरथर कांपत, बोले मुनिंना तिथेंच गृत्समद ।
रुक्मांगद वीर्याचा, ठरलों नाहीं तरीच गृत्समद ॥१३॥
शापुन भस्म करीं मी, ऐसें बोलून तो जिथें माता ।
गेला संनिध तेथें, क्रोधानें तीस जाहला वदतां ॥१४॥
दुष्टे माझा जन्मचि, कोणापासून सांग आतांच ।
सांगें सत्य मला गे, नाहीं तर भस्म होय कीं साच ॥१५॥
पुत्राचें भाषण हें, ऐकुन कांपे करांस जोडुन ।
सांगे वृत्त मुकुंदा, झालेलें सर्व तें करी कथन ॥१६॥
ऐकुन शाप वदे कीं, दुष्टे तूं पापकर्म फल भोगीं ।
कंटक बदरी होई, फलशी तरि तूं कुणा न उपयोगी ॥१७॥
ऐकुन शाप मुकुंदा, रागानें काय बोलते त्याला ।
जरि मी पापी असलें, माता म्हणुनी तरीच पूज्य तुला ॥१८॥
अपमानुनी मला तूं, शाप दिला म्हणुन मी तुला शापी ।
तुजसम कठोरहृदयी, जन्मे जो सूत दुःख हें ओपी ॥१९॥
प्रत्यय यावा म्हणुनी, त्रैलोक्या पीडिता असा क्रूर ।
राक्षस निपजो मुलगा, घेई शापास या वदे उपर ॥२०॥
शापित परस्परें तीं, शक्राचा पुत्र हा असे साच ।
झाली विहायवाणी, कथिती व्यासांस ते विधी साच ॥२१॥
कंटक बदरी झाली, गृत्समदें शापितां असे माता ।
गेला तपास तेव्हां, लज्जितसा जाहला असे चित्ता ॥२२॥