(गीति)
नारद म्हणे नृपा हें, वृत्त पुढें सांगतों सुर-प्रभुचें ।
गौतम तोषित केला, आळविती देव कीं सुधावाचें ॥१॥
इंद्रास हांक मारुनि, देठांतुन काढिला असे त्यांनीं ।
केला उपाय जो तो, देवांनीं कळविला तयें स्थानीं ॥२॥
येतां बाह्य प्रदेशीं, अंगाची घाण येत देवांस ।
नमितां तया सुरांनीं नाकें धरिलीं न सोसवे वास ॥३॥
इंद्रें स्नान करुनी केला संकल्प मंत्र जपण्याचा ।
देतों षडक्षरी गुरु, मंत्र असा तो गणेशनामाचा ॥४॥
मंत्रप्रभाव मोठा, भग्नें गेलीं तया स्थळीं नेत्र ।
झाला दिव्य शरीरीं, इंद्रानें वर्णिला असे मंत्र ॥५॥
जें पापकर्म केलें, फळलें मजला खरोखरी योग्य ।
परपत्नि-संग पापी, तो होतो भोगण्यास कीं योग्य ॥६॥
गौतम महातपस्वी, शांत असे फार फार चित्तांत ।
केलें नाहीं माझें, भस्म वदे इंद्र देव-वृंदांत ॥७॥
माझे कल्याणाचा, सांगें तुम्हांस यत्न तो केला ।
यास्तव सहस्त्रनेत्रीं, युक्त असा देह तेधवां झाला ॥८॥