शांत हो श्रीगुरु दत्ता । मम चिंता शमली आता ॥धृ॥
तू केवळ माता जनिता सर्वथा तु हितकर्ता । तु आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तुची आता ॥
भयकर्ता तु भयहर्ता । दंडधर्ता तु परिपाता । तुजवाचुनी नच दुजी वार्ता ।
तु आर्ता आश्रायदत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरु नाथा । जरी दंडा धरिसी यथार्था । तरी आम्ही गाऊनी गाथा ।
तव चरणी नमवु माथा । तु तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करु धावा ।
सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा माता ॥२॥
तु नटसा होऊनी कोपी । दंडिताही आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि ।
आम्हावरी नच संतापी । गच्छत: स्खलन कापी । असे मानोनी नच हो कोपी ।
तिज कृपा लेशा ओपी । आम्हावरी तु भगवंता ॥३॥
तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडता । संभाळुनी मार्गावरता ।
आणिता न दुजा माता ॥ निज निरुपदा आणुनी चित्ता । तु पतित पावन दत्ता ।
वळे आता आम्हा वरता । करुणीधन तु गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्हीं हे घारदार ॥
तव पदी अर्पू असार । संसार हित हा भार । परि हरिसी करुणा सिंधो दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश ना बाधो । वासुदेव पार्थित दत्ता ॥५॥