मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
रामसुतात्मज

रामसुतात्मज

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


शैलजापतीसूत वंदुनी । शोभला दिसे रत्नभूषणीं. ।
वंदिली त्वरें ब्रह्मकूमरी, । सकल भूषणें बाणलीं बरीं. ॥१
श्रीगुरू तुझी नेणवे सिमा. । वर्णितां तुतें नास्ति ऊपमा. ।
संतजी सखे भक्त हे जनीं । चातकापरी लुब्ध निर्गुणीं. ॥२
कुरुपतीसभे श्रेष्ठ बैसला. । दुष्ट सर्वही मंत्र योजिला. ।
वचन भूपती बोलिला सभे, । ऐकतां प्रभू राहिले उभे. ॥३
नमिति मस्तकें, बोलती, गिरा, । भूपती, तुम्हां मान्य तें करा. ।
सुयोधनाप्रती भूप बोलिले. । सर्वही सभे श्रेष्ठ बैसले. ॥४
कुरुपती म्हणे, “ धर्म आणवा,  । बंधु तो सखा शीघ्र भेटवा. ।
बैसलों जीवीं सर्व वैभवा, । बंधु तो सखा शीघ्र भेटवा. ” ॥५
‘ धर्म भूपती भेटवा मला ’ । बोलतां क्षणीं कंठ दाटला. ।
लोचनीं किती पूर चालिला. । “ जाय, रे सख्या, आनिं बंधुला. ॥६
ऐशियेपरी राजउत्तरें । वीदुरें बरें मानिलें खरें. ।
बैसला रथीं चालिला त्वरें, । अश्व तांतडी वागवी बरे. ॥७
सन्निधें पुढें पातला पुरी. । येत देखिला पंडुकूमरीं. ।
पैल तो रथीं कोण येतुसे ? । वाटतो सखा आमुचा असे. ॥८
विदुर सन्निधी पातला सभा. । बंधु धर्मजी राहिला उभा. ।
हास्यआननें बंधु भेटले. । सर्वही सभे स्वस्थ बैसले ॥९
धर्मजी म्हणे, “ काय गौतमी । आळसी तया प्रात्प आश्रमीं ? ।
ते परी ऑजी बीज तुमचें । थोर हे जगीं भाग्य आमुचें. ॥१०
सर्वही सुखें ? ” धर्मजी पुसे . । “ स्नेहे तूमचां क्षेमची असे. ” ।
करुनियां पुजा धर्म सादरें, । मंदसा वदे विदुर उत्तरें. ॥११
“ सुयाधनें तुम्हां मूळ धाडिलें. । भेटिचे बहू आर्त लागलें. ।
‘ ध्रर्मजी सखा, बंधु, भेटवा. । लागली, ’ म्हणे, ‘ खंति या जिवा. ’ ” ॥१२
हास्यमूख धर्मराज काय शब्द बोलिला,
उत्तरेसि सूर्यराज आजि अस्त पावला; ।
आमतीचिं चंद्रमा उडूगणीं विराजाल;
क्षारता त्यजून आजि सिंधु गोड वाटला ! ॥१३
सुयोगधनासि आजि काय करुणा विराजलीं ?
वज्रधार तीव्र काय नम्रतेस पावली ?।
धरूनि हेतु कोणता तुम्हांसि मूळ धाडिलें ?
पूर्व सौख्य लोचनीं तुम्हींच सर्व पाहिलें. ” ॥१४
धर्मजीप्रती म्हणे विदूर, “ काय बोलणें
पूर्व वर्म, दुष्टकर्म ? सर्व दु:ख त्यागणें. ।
समान शत्रुमित्र तूज, सोमवंशभूषणा,
डाव, घाव, हाव, भाव हे न आणिजे मना. ॥१५
धर्मजी. तुम्हांसि कर्म इच्छितांचि अंतरीं,
ते क्षणींच कर्म त्यासि लागलें चराचरीं. ।
पूर्व दु:ख तीतुकें अनंत सुख मानणें;
सुयोधनासि कोण हेत त्यासि आजि शोधणें. ॥१६
मला मनांत वाटतें, सुयोधनासि भेटणें.
भाव कीं कुभाव, माव कोण हेत जाणणें, ।
सुबुद्धि कीं कुबुद्धि, काय कर्म त्यासि अंतरीं,
क्षीरनीर नीवडीत राजहंस ज्यापरी. ॥१७
भुपासमूर बोलतां कुरूपतीस देखिलें,
बाष्पयुक्त कंठ, नीर लोचनासि दाटलें. ।
त्यजूनि मूनि सर्वही वनांत राहिले जसे,
ते गती कुरुपतीस आजि बाणली असे. ” ॥१८
नकूलसाहदेवभीमकीरिटींसि धर्मजी
म्हणे, “ करा विचार सारबुद्धि हेत काय, जी ? ।
वदे विदूर वाक्य, त्यासि काय बुद्धि सांगणें, ?
ज्यासि जो गमेल भाव त्याचि रीति बोलणें. ’’॥१९
ते क्षणींच कीरिटी उठोनि राहिला उभा.
ऊठती बहूत, हो, परंतु बैसली सभा. ।
करांजुळी करून काय बंधुजीस उत्तरें
विबूधनाथश्रीगुरूपरीस नीतिचीं बरें. ॥२०
“ कल्पिलें जनासि देत कल्पवृक्ष, आजि तो
सादरेम करूनि अन्न हिंगणासि मागतो. ।
तेपरीचि सागरें वदोनि मंद उत्तरें,
तयासि काय देइंजे लघू अनाथ थिल्लरें ? ॥२१
जनां निमित्य या घनें भुमीस तोय सांडणें;
घडे तयासि तोय काय रांजणासि मागणें ? ।
भारती मतीमुढासि काय अर्थ पूसती ?
बंधुजी, सभेसि आज तेचि रीति भासती. ” ॥२२
अथानंतरें कीरिटी गौरवीला. । पुढें जाउं भेटीसि हा नेम केला. ।
बरीं भोजनें ते दिशीं सर्व झालीं; । दुजे वासरीं सर्व सेना निघाली. ॥२३
तदा काय पांचालसूता दुतीतें । म्हणे ? “ जाय, गे, अर्जुनाचे सभेतें. ।
नमस्कार जाऊन सांगें तयातें. । समाचार साकल्य तूं सांग त्यातें. ॥२४
निशीचे भरीं वोखटें स्वप्न म्यां, वो, । असे देखिलें, तें नये सांगतां, वो. ।
‘ अकस्मात, गे, आंगणां दूत आला. । म्हणे तो मला, ‘ चाल वेगीं सभेला. ’ ॥२५
‘ करीं त्यासि मी ग्लांति नानापरी, वो. । धरी तों करें वेणिला नीकरें, वो. ।
‘ सखे, ओढितां भूषणें तूटिजीलीं. । ग्रिवेचीं, सखे, फार मुक्तें गळालीं, ॥२६
‘ सभेमाजि ओढोनि नेलें, सखे गे, । दिनासारिखी एकली मी उभी गे. ।
‘ सभेचा वदे भूपती काय तेथे ? । ‘ करा नगन पांचाळराजात्मजेतें. ’ ॥२७
‘ उठे राजबंधू; धरी अंबरातें, । सखे, अंतरीं मी स्मरें माधवातें. ’ ।
असें स्वप्न म्यां देखिलें घोर रात्रीं. । उठें घाबरी, तों, सखे, कंप गात्रीं. ॥२८
त्वरें जाय, गे सुंदरी, वातवेगें. । करी शांति नानापरी बुद्धिरंगें. ।
नये भेटिसी जाउं दुर्योधनाचे. । अकस्मात तें विघ्न येऊन संचे. ” ॥२९
त्वरेनें दुती वातवेगें निघाली, । पुढें अर्जुनाचे सभेमाजि गेली. ।
सभेसन्मुखें शीघ्र बद्धांजली ते । दुती द्रौपदीची उभी राहिली ते. ॥३०
म्हणे, “ जी, प्रभो, आजि राजांगनेनें । नमस्कार सांगीतला थोर मानें. ।
निशीमध्य निद्राभरें स्वप्न तें, हो, । असे देखिलें, तें नये सांगतां, हो. ॥३१
‘ अकस्मात हो आंगणां दूत आला । म्हणे, ‘ चाल पांचालसूते, सभेला. ’ ।
‘ धरी दीर्घ वेणी, तितें ने सभेला. । हरी चीर तेव्हां स्मरें माधवाला. ’ ॥३२
प्रभो, कौरवाधीशभेटी न जावें,. । मुखें आपुले धर्मजीतें म्हणावें. ।
उठे कीरिटी, पातला वीर्यसिम्धु । सभे, श्रेष्ठ भद्रासनीं धर्म बंधु. ॥३३
नमस्कार केला प्रभूलागिं मानें. । म्हणे, “ देखिलें स्वप्न राजांगनेनें. ।
‘ न जावें, प्रभू राजभेटीस तेथें, ’ । दुती धाडिली शीघ्र सांगावयातें. ” ॥३४
बंधुउत्तरें ऐकतां बरीं, । धर्मजी वदे भारता परी. ।
“ देव नेणती अंगनामतें । मान्य ते तया वीषयीं रते. ॥३५
अंगनामतें कोण भूपती ? । काय त ए, सख्या, बुद्धि मानिती ? ।
अंगनामतें दु:ख पावले. । अंगनामतें सर्व नाडले. ॥३६
सदा असत्य बोलणें, किमर्थ शब्द मानणें,
कला अपार दावणें, नरोत्तमासि मोहणें, ।
अनेक अर्थ बोलणें, विशेष मंद हांसणें,
स्वहीत अर्थ रोधणें, अनर्थ पूर्ण मांडणें, ॥३७
ठाणमाण चालणें, सखेद मंद बोलणें,
करूनि पाप आदरें, अपार पुण्य वेंचणें, ।
करी तपासि विघ्न, हो, करूनि हेमभूषणें,
महंत संत त्यांसि, हो अनंतबाण विंधणें. ॥३८
प्रिया, हे रिती, बंधुराया, विचारा. । यमाची पुरी प्राप्त ते मुख्य दारा. ।
सख्या, वैभवें राजभेटीस जावें । सुखी बंधुराया प्रभूतें करावें. ॥३९
दुती येउनी शीघ्र राजांगनेला । म्हणे, “ जावयाचा, सखे, नेम केला. ।
तुझीं उत्तरें सर्व म्या कीरिटीतें, । मृगांकानने, सर्व सांगीतली तें. ॥४०
पतिव्रते, पराक्रमें कुरूप धर्म भूषती
चालिला त्वरीत, गे, सहीतसैन्यसंपती. ।
सनात, बुद्ध सर्वही चमू अपार चालिले.
कंजरीटलोचने, बिदीसि थाट दाटले. ॥४१
रथीं तुरंगं रंगले; अभंग भार चालिले,
अनेक ऊठती ध्वनी; तुरें गजांसि किंकिणी; ।
निशान, छत्र साजिरें, सुवर्णद्म्ड चामरें
प्रभूवरी विराजलीं, दिनेश पूर्ण साजली. ” ॥४२
सांगतां दुती मात आंगणीं । द्रौपदी सती शंकली मनीं. ।
पातले पुढें दूत सांगती, । “ अंबुजानने, बैस, वो, रथीं. ॥४३
धर्मजी, नकूल, साहदेव, भीम, कीरिटी,
प्रतापमल्ल हस्तनापुरास चालले हटी. ।
करा त्वरा, चला, उशीर वेळ फार जाहली. ”
बैसली रथीं जशी विद्युल्लता विराजली. ॥४४
रथारूढ होवोनियां पंकजाक्षी । त्वरें वाजती शै....जेथें मृगाक्षी. ।
पुरी पातली त्या कुरूनायकाची. । तुरें वाजती भीम नानापरीचीं. ॥४५
पुढें कौरवाधीश भेटीस आला, । म्हणे, “ क्षेम दे, धर्मजी, बांधवाला. ” ।
पदीं देखिलें भूप सूयोधनाला, । अती आदरें धर्म भेटीस आला. ॥४६
भेटले भुपाळ बंधु धर्मजीस आदरें.
दुष्ट पापरूप काय बोलताति उत्तरें. ।
“ करीत वृष्टि पीयुषाचि मेघराज पातला.
सूमनेंसहीत आहि कल्पवृक्ष देखिला. ” ॥४७
मानसांत पाप, बाह्यभक्ति फार बोलणें.
पतंगरंग साजिरा परंतु जाय जीवनें. ।
तेपरी सुयोधनें बहूत भाव दाविला.
सहीतबंधु धर्मजीव भूवनासि आणिला. ॥४८
भीष्म, द्रोण, हो, भेटती बरे; । भूपती पिता, मातु, सोयरे. ।
कर्ण भूपती शीघ्र पातला. । धर्मजी सखा बंधु भेटला. ॥४९
होति भोजनें ते दिशीं बरीं. । कर्म योजिलें कौरवीं विरीं. ।
त्या खळीं दुजे वासरीं प्रिती । आणिले सभे धर्म भूपती. ॥५०
हेममंडपीं बैसली सभा. । जडित पूतळ्या, फांकती प्रभा. ।
स्वस्थ बैसले सर्व भूपती; । श्रेष्ठ वीर हे शीघ्र पावती. ॥५१
पातला वनराजसा, रविसूत हा विरकेसरी.
मुक्तमंडित, छत्रराजित चामरें ढळती वरी. ।
खङ्ग, पट्टिश, खेटकें, शुल, तोमरें, धरिलीं करीं,
बैसला विरभार मंडित कुंडलीं किरीटीं शिरीं. ॥५२
पालखीवरि छत्रराजित, वीजिती किति चामरें,
चालला विर मंडितें करिं खेटकें आणि तोमरें. ।
जान्हवीसुत देखिल्यावरि राहिले नृपती उभे
पातला विर भीष्म मंडित बैसती नृपती सभे. ॥५३
छत्र, चामर, पालखी, रवि पूर्ण मंडित पातला.
वीरनायक खङ्गमंडित राजभार विराजला. ।
बंधुभूपतिसूतसज्जनिं पंडुकूमरिं वंदिला.
द्रोण येउनियां सभे कुरुनाथसन्निध बैसला. ॥५४
सभे, भूप जेथें, कृपाचार्य आला. । प्रभूनें तयातें नमस्कार केला. ।
भुपा सन्मुखें बैसला आदरेंसीं. । त्वरें बैसले सर्व राजे सभेसी. ॥५५
नृपतीसभे स्वस्थ भूपती । मंदसा वदे धर्मजीप्रती. ।
वेळ, रे सख्या, केंवि कर्मणें ? । वाटतें मला द्यूत खेळणें. ॥५६
धर्मजी म्हणे, “ शीघ्र आणणें. । मान्य जें तुम्हां, तेंचि खेळणें. ” ।
बोलतां प्रभू, द्यूत आणिलें; । जडितमाणकें तेज फांकलें. ॥५७
बैसला नृपाल धर्म पाट नीट सांवरी,
रक्तपीतपाचनीलरंगि सार त्यावरी; ।
सन्निधीचि दाट थाटली नटोनि अंतरीं.
सर्व धर्मजीस काय बोलताति उत्तरीं. ॥५८
“ प्रभु, वाउगें काय खेळोनि यानें ? । करूं नेम कांहीं, दिसे खेळ जेणें. ” ।
म्हणे, ‘ जी, बरें, ’ धर्म सूयोधनातें । प्रिती आदरेम दीधली भाष्य त्यातें. ॥५९
त्यावरी सुयोधनें त्वरीत वेग मांडिला;
कुमंगलें करोनि कर्म डावघाव इच्छिला. ।
जीतले अपार देश, राज्य, पूर, पाटणें,
रथी, तुरंग कुंजरांसहीत, मांदुसा, धनें, ॥६०
निशाण, सूर्यपर्ण, छत्र, वाद्य, दास, दूतिका,
अपार द्रव्य, माणिकेंजडीत हेमशीबिका. ।
सुखासनें, सुवर्णदंड, चामरें विराजलीं,
सुयोधनें समस्त वस्तुमात्र तेहि जिंतिली. ॥६१
जिंकिले नकूल, सहदेव, भीम, कीरिटी,
धर्म, द्रौपदी सती, सभाग्य, केसरीकटी, ।
जिंतिलें समस्त. लोक विस्मयास पावले,
सभा तटस्थ सर्वही, उगेच मौन राहिले. ॥६२
यावरी त्वरीत कौरवेश हास्यउत्तरीं
बोलिला सभेसि, काय आठवूनि अम्तरीं. ।
जिंतिलें समस्त, आण भाष्य पूर्ण घेतली.
पांडवें सभेसि आज दीनरूप देखिलीं. ॥६३
बंधुजी, त्वरीत जाय भूवनासि आदरें.
द्रूपदात्मजेसि सर्व सांग मंद उत्तरें. ।
मंडपा त्वरीत देवि कंजरीटलोचना
नयेल, तैं बळें धरूनि आणिं अंबुजानना. ॥६४
भूपती नमूनि, बंधु भूवनासि चालिला.
देखिला दुरून जेंवि यमदूत पातला. ।
किंनिमित्त पैल आजि पापसिंधु येतसे,
विचार सार काळ तो; कठीण वेळ जातसे. ॥६५
‘ नेणवे सभेसि आजि काय, बाइ, वर्तलें.
अनाथनाथ, श्रीगुरूमुकुंदजीस मानलें ! ।
धरूनि हेत पैल काय देवरासि धाडिलें ? ’
शंकली मनांत नीर लोचनांसि चालिलें. ॥६६
सन्निधीचि वैरिबंधु सन्मुखेंचि आदरें
वंदुनी, वदे तिशीं सुमंदवानि उत्तरें. ।
“ पतिव्रते सभेसि द्यूत, आज भूप खेळले.
हारिलें समस्त हीनदीनरूप बैसले. ॥६७
सुयोधनासहीत भीष्म, द्रोण, कर्ण भूपती
बसले समस्त वीरराज. सांगणें किती. ।
कृष्णसारलोचने, त्वरीत चाल मंडपा.
झने उशीर लाविशी. स्थीर हेत टाकिं कां. ॥६८
भूपती सभे आणवीतसे. । पंकजानने, चाल, राजसे. ।
वेळ कायसा लाविला असे ? । भूपती बहू कोपला दिसे. ” ॥६९
काय बोलिली देवराप्रती ? । “ धन्य, हो, सिमा तूमची क्षिती ! ।
देवरा, तुम्हां लोक हांसती. । बैसले सभे सर्व भूपती. ॥ ७०
येकली सभे निंद्य नायका. । जाणतां तुम्ही, पुण्यदायका. ।
भूप देखती तूमची सिमा. । लाज, हो प्रभू, तूमची तुम्हां. ॥७१
बोलतां कशी भीड वाटली. । आजि, देवरा, होय माउली. ।
जनक होइं, रे, आजि, देवरा. । चूलता, सखा, बंधु, सोयरा. ॥७२
नेतसां सभे कोण उत्तरें ? । याविशीं, प्रभो, मारणें बरें. ।
येकली सभे कंजलोचना, । भूपती कसें मानलें मना ? ॥७३
जान्हवीसुतासहीत कर्ण, द्रोण, भूपती
बैसले नृपाळ, हो, अनेक वीर भारती. ।
असे सभेसि बंधुचे वधूस काय मान्यता ?
काढिला विचार सार आजि हेतु कोणता ? ॥७४
सखया, शिकवा भुपतीसि निती सकळांहि मिळोनि करा विनती.
असे कर्ण कृपाळु, कृपानिधि भीष्म, जयांसि असे मनिं हे सुमती.
स्वये जाणति भूत, भविष्य बरें; बरवी कथिती भुपतीसि निती.
पद झाडिन केशिं, ” म्हणे अबला, “ करुणावचनें करुं ग्लांति किती ? ” ॥७५
धरि चंद्रमुखी चरणांबुज, तैं कुटिलें कवळूनि तिची कबरी,
गज उन्मत पद्मलता जशि ने, मृगलोचनि नेत तयेचिपरी. ।
नयनीं निर दु:खित, सिंहकटी म्हणे ‘ राजसख्या, हळु वेणि धरीं. ’
दिसे अंतकरीति, नसे करुणा, विवरून विचार धरीं पदरीं. ॥७६॥
किति मंडित वेणि विराजित वीगलित, प्रभु, हें भुषणें गळलीं.
ग्रिववेष्टित पाचि, प्रवाळ, निळें, विरराजकरें सकळें तुटलीं. ।
उभे, आणि तुम्हां कुरुनाथजिची, गळती वसनें, प्रभु, हें चळलीं.
रति येक तरी धरिं भीड बरी. कशि येकसरी भुलिहे पडली ? ॥७७
मुक्तपाचिनीळरत्नपुष्पराजमाळिका -
मणी महीस सांडिले तुटोनि, भूमिपाळका ।
वदे; परंतु पापरूप मंडपासि पातला
उभी करून द्रौपदी, नमून भूप, बैसला. ॥७८
अंधकार या निमित्त दीर्घरोप दामिनी
प्रकाशरूप साजिरी, अमूप तेज तें घनीं; ।
मंडपांत तेपरी सभेसि कंजलोचनी;
फांकले अनंत किर्ण तेजदीप्त कामिनी. ॥७९
ग्रिवा करून खालती उभी कुरंगलोचना.
झांकिलें तनूस हेमकांति, अंगभूषणां. ।
वांकली, मनांत तीसि कंप फार पातला,
मनीं त्वरीत सोइरा मुकुंदराज चिंतिला. ॥८०
सुंदरीस्वरूपरूप पाहतांचि भूपती
भले मनासि आंवरून, माधवास चिंतिती. ।
पाहती पतीत येक पापरूप आदरें;
व्यथा मिनध्वजें तयांसि फार लाविली शरें. ॥८१
किती बोलती, ‘ कोण लावण्य ईचें ? । उणें ईपुढें रत्न दुग्धार्णवींचें. ।
सुता साजिरी येक हीमालयाची; । शचीतें नये साम्यता द्रौपदीची. ॥८२
चतुवर्ग दारेसि हा याव कैंचा ? । पहा, ईपुढें कोण लेखा रतीचा ? ।
महीकन्यकेहूनि सौंदर्य भारी; । पुढें काय खद्योत या भूपनारी. ’ ॥८३
वदे कौरवाधीश, “ कर्णा, भुपाळा, । पहा, हो, इची कोण लावण्यलीळा. ।
कशी वोतिली पूतळी मन्मथाची. । तनू गौर, लाला कळा हाटकाची. ॥८४
भुजंगापरी दीर्घवेणी सखीची; । मनोरम्य लावण्य या भ्रूलताची; ।
महामुक्तमंडीत नासा विराजे; । इचे नेत्र देखोनियां पद्म लाजे. ॥८५
अधर चांगले रंगले किती. । दशनदीप्तिचे कीर्ण फांकती. ।
विरॉजलीं कशीं कर्णभूषणें. । शोभलीं शिरीं मुक्तसूमनें. ॥८६
कर्ण शोभले रत्नभूषणीं. । जोडिले हिरे हेमकोंदणीं. ।
थाटलीं ग्रिवे मुक्तमाणिकें, । बांधिलीं किती दीप्तिदायकें. ॥८७
हृदयीं भुवणें किति रम्यपणें दिसे तेज दुणें पदकावलितें.
कुचकुंभ कसे, दृढ बिल्व जसे; वरि वाळि असे शरमुक्रमणी. ।
भुजदंड कसे, गजशुंड तसे; करि दाटि तसें बहु तेज चुडां.
पहॉ पाणितळें अरुणें अमलें; भुलवी सकळै इचि कोण कळा ? ॥८८
दिसे सिंहकटी, कटिसूत्र कटीं, वरि रम्य धटी परिधान असे.
पदिंची भुषणे किति रम्यपणें; भुपराव मनें किति मोहियले. ।
... ... ... ... ... ... ... ... ... ... ...
... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ॥८९
भूपती सभे हेंचि बोलला. । “ भूपहो, मुखें वीनवा इला. ।
‘ भूपती मनीं हेत, कामिनी, । भूपते गृहीं होय गेहिनी. ’ ॥९०
भूपतिप्रिये वीनती करा, । भूपसुंदरी वीनवा गिरा. ।
भूपहो, म्हणा, ‘ अंबुजानने, । भूपती वरीं, कंजलोचने. ’ ॥९१
म्हणे भीष्म तो, “ ऐक, राया भुपाळा. । वृथा बोलसी पाप हें, भूमिपाळा - ।
भुपा, आणिली कां सभे राजबाळा ? । कुडी वासना सांडिं वेगीं, नृपाळा. ॥९२
असेंचि रावणें कुडे महीसुतेसि इच्छिलें,
अपार राज्य, भारता, कुळासहित आटलें. ।
श्रिरामचंद्रनायका अपार दु:ख पावली,
तसीच विघ्न द्रौपदी सती सभेसि आणिली. ॥९३
कुबुद्धिहेतु चंद्रमा गुरूवधूसि रातला,
जेणें जगांत निंद्य हो कलंक त्यासि लागला. ।
बळें निशुंभशुंभनाम दैत्य फार मातला,
अनादि, आदि खेचरीकरेंचि मृत्यु पावला. ॥९४
सुता साजिरी रत्न हीमालयाचें; । तियेच्या मुळें भस्म जालंधराचें. ।
कुडें कर्म इंद्रें अहल्येसि केलें, । नृपाळा भगांकीत सर्वांग झालें. ॥९५
कुडी बुद्धि भस्मासुरालागिं होतां । जळाली तनू हस्त ठेवोनि माथां. ।
नृपाळा, सुखें सोडि राजांगनेला. । वृथा आणिली बंधुजाया सभेला. ॥९६
रवीतुषार तेपरी तुरंग रंगले किती ?
अनेक रूप, साजिरे, समीरतुल्य धांवती; ।
तसेच हस्ति मस्त, हो, मदेंकरूनि डुलुती.
गिरीसमान भार फार हस्तिबंध, भूपती. ॥९७
अनूज, सूत पाठिसीं, बलाढ्य वीर पाइंचे,
कृतांतहेर जेपरी अपार वीर पाइंचे; ।
हिरेजडीत भूषणें, असंख्य सैन्य, संपती;
तूजसीं समान कोण भूप मेदिनीप्रती ? ॥९८
स्वरूपरूप पद्मिनीपरीस, कंजलोचनी,
गुणें सभाग्य, सुंदरी, असोनि तूज कामिनी; ।
अपार राज्य भोगिं हें समस्त, भूमिपाळका,
सभेसि काय आणिली बलाढ्यबुंधुनायका ? ॥९९
कुबुद्धि सार हे नव्हे; कुलांगनेसि इच्छितां.
अपार दु:ख पाहले; करीं विचार, भारता; ।
निधीसमान संपती, परंतु सर्व नासती,
पतंगरंग मानवीं, भुपा, नयेल मागुती. ॥१००
सांगतों बरें, भूमिपालका. । सोडिं हे सती, बंधुनायका. ।
येकली सभे काय हे सती । राहिली उभी ? सोडिं, भूपती. ” ॥१
बोलिला किती नीतिउत्तरें, । “ भूपती, नव्हे सर्वथा बरें. ।
पापसिंधुचे बैसुनी तिरीं । काळझेंप हे कोण सांवरी ? ॥२
येकली सभे कंजलोचना; । भूपती, कसें मानलें मना ? ।
बंधुअंगना माउलीपरी, । भूपती, मनीं बुद्धि हे धरीं. ” ॥३
कृपाचार्य, भीष्मादि द्रोणा नृपानें । नृपालासि सांगीतली बुद्धि मानें. ।
सिमा सांडिली, क्रोध अद्भूत आला. । वदे काय वज्रापरीं शब्द त्यांला ? ॥४
“ जरा तुम्हांसि पातली, म्हणोनि बुद्धि मंदली.
नव्हे स्वहीत बोलणें अपत्यबुद्धि ठाकली. ।
पुसों तुम्हांसि ते दिसीं स्वहीतबुद्धि सांगणें,
सकाम सर्व वित्पती, तुम्हांस काय पूसणें ? ॥५
न ये तुम्हांसि बोलतां सभेसि काय जल्पतां ?
जयासि मंद भारती, तयासि काय योग्यता ? ।
गुणें बहूत आगळे, परंतु आणि मूर्खता.
ठाकिला विचारसार हेत आजि कोणता ? ॥६
जरी चाड बैसावयाची सभेसी, । तरी लाविजे आपुल्या लोचनांसि. ।
कळों सर्व चातुर्य आलें मनाला, । उठोनी तर्‍ही जा सुखें मंदिराला. ॥” ७
वदे भूपती शब्दसंधान रोषें. । सभे दु:ख भीष्मासि झालें विशेषें. ।
तदा बोलती “ कौरवेशा, विचारीं. । दुराशा तुझी हेच वीशानसारी ( ? ). ॥८
प्रभू, हें तुझें पूर्ण प्रालब्ध जैसें, । पुढें संचलें दीर्घ संचीत तैसें. ।
क्रिया हे तयासारिखी दीसताहे, । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे. ॥९
विचारीं मनीं हे विशें कोण ज्याले ? । नृपाळा, मदें मातले ते निमाले. ” ।
वदोनी सभे बैसला पुण्यराशी. । दुरात्मे तदा येक झाले त्वरेसीं. ॥११०
“ आतां खंजनलोचने, त्वरित ये तूं; बैस अंकावरी.
पाहें भाग्य तुझें समस्त अवघें, हे संपदा, सुंदरी. ।
आहे कोण दुजा समान मजसीं ? हें तूं बरें जाणसी.
टाकीं पांडवआस , हेत मनिंचा, कां, गे, वृथा शीणसी ? ॥११
त्यजितों सकला अबला भुवनीं । मृगलोचनि ज्या जुनिवा, सजणी. ।
करिं रत्नप्रवाळनिळां भुषणें. । सुखि नांद घरीं वरि येकमनें. ॥१२
केसरीकटीस पूर्ण शब्दबाण लागले.
पती सभेसि भूपती उगेचि मौन्य देखिले. ।
कर्ण, द्रोण, भीष्मराज मंदमूख बैसले.
भूपतीअनूजसूत यमरूप भासले. ॥१३
घृतेंकरूनि शिंपितां प्रचंड ज्वाळ पेटली,
फणींद्रनाथकामिनी विशाळ जेंवि कोपली, ।
तयेपरी नितंबिनी सभेसि दिव्य दामिनी
बोलली भुपास काय कंजरीटलोचनी ? ॥१४
“ सूर्यसूत, भूपती, तुम्हांसि नीति मानली.
महींत कोणिं, भूपहो, सती सभेसि आणिली ? ।
तथापि कोण वाक्य हें पतीत ? बुद्धि टाकिली.
शीकवा भुनायकास काळवेळ पातली. ॥१५
जान्हवीसुता, वीनती तुम्हां. । शीकवा बरी बुद्धि अंधमा. ।
अधमें कशी भीड सांडिली ? । पापरूप कां बुद्धि ठाकिली ? ॥१६
प्रभूस व्याधि लागली, अखंड होत पाचवा;
विवेकवैद्यराज बुद्धिऔषधींसि मेळवा. ।
मुखांत रोग, जल्पतो, भल्यासि भूप दाखवा.
सभे समस्त भूपती कुरूपतीसि वांचवा. ॥१७
कुरूपतीसि ठाकिली भविष्यभूतभावना,
म्हणोनि वर्तणूक हे सभेसि बंधुअंगना. ।
प्रभूस भूत लागलें, त्वरीत झाडणी करा. ।
करा बहूत यत्न, यासि सर्व भूप सांवरा. ” ॥१८
कर्ण वीर, द्रोण, भीष्मदेव, सर्व भूपती,
तीर्थराज बैसले, परंतु मंद भारती. ।
एकली दिनासमान पापरूप गांजिती.
वाटलें मनासि दु:ख दुष्ट काय बोलती ? ॥१९
“ अरे, कुरूप, पापरूप, दुष्ट भूप, दुर्जना,
अभाग्य, दीनदुर्बळा, पतीत हेत कां मना ? ।
दुष्ट शील, दुर्मती, अनित्य पाप जल्पसी,
लघू अनाथ किंकरा, तुं काय शब्द बोलसी ? ॥१२०
दु:शिला, खळा, दीर्घभारुपा, । कीटका हिना, भारता नृपा, ।
दु:शिला, खळा, धिग्य, रे, जिणें ! । पापसागरा, काय बोलणें ! ॥२१
शर्करा दुरी टाकिली सळें, । मृत्तिका मुखीं घातिली बळें; ।
तेपरी तुतें राज्य भोगितां, । आणिली सभे बंधुभाज तां. ॥२२
मानलें कसें, कूळपावका ? । भोगिसी कसी बंधुनायका ? ।
वाटलें तुतें काय, निष्ठुरा ? । टाकिली कसी वोळखी, खरा ? ॥२३
कुटिल, कामलंपटा, मनासि चोज वाटलें.
द्रौपदीसि आणितां, रे, काय तूज भासलें ? ।
वायसासि प्राप्त केंवि राजहंसनायका ?
तेपरीच द्रौपदी, विचारिं, दु:खदायका. ॥२४
पशू मातला, थोर कामांध झाला, । स्वमातेसि भोगी, नसे लाज त्याला; ।
तयाचेपरी तूं मदें मातलासी; । कशी वोळखी सांडिली, पापराशी ? ॥२५
ऋषीची वधू काय, रे, अंत्यजासी ? । अरे दुर्जना, केंवि शोभेल त्यासी ? ।
असे चंद्रमा शंकराचे कपाळीं, । कसा साजिरा तो दिसे श्वानभाळीं ? ॥२६
गौतमी त्यजी सिंधुतें जरी, । क्षुल्लका नद्या आदरें वरी. ।
पार्वतीपती बाधिजे भुतें, । मंद चंद्रमा सीत मारुतें. ॥२७
सिंहसुंदरी काय जंबुक ? । भेक इच्छिता व्यालनायका ! ।
रत्नमालिका काय, रे खरा ? । काय कस्तुरी ग्रामसूकरा ? ॥२८
वोणवा वनीं शिंपितां घृतें, । पामरा, जरी बाधिजे सितें ।
पूर्णिमा जरी सांडिली बरी, । आदरें अमा चंद्रमा वरी. ॥२९
टाकिजे धरा व्यालनायकें, । सांडिजे जरी वीष त्रिंबकें, ।
साधिजे जरीं सिंह जंबुकें, । टाकिती अही आपुली विखें, ॥१३०
करी खङ्गधारा जरी चूर्ण बोटीं, । जरी वन्हि सोशील हे मेघवृष्टी, ।
जरी अंधकारीं बुडे तेजराशी, । जरी मूषकें भेदिजे कश्यपासी; ॥३१
कुरुपती, जरि हें इतुकें घडे, । तरै तुतें द्रुपदी सति नांतुडे, ।
तुज असे वधु सुंदर येकि, रे. वरि दिस बरवा शुभ अंक, रे. ॥३२
भूपती असे रम्य कामिनी; । दामिनी जशी साजिरी घनीं. ।
कांतिच्या तिच्या फांकती प्रभा, । होय ते तुझी प्राणवल्लभा. ॥३३
सुंदरी स्वयें शोभली असे, । शोणितें सदा चर्चिली दिसे, ।
दशनवेलिच्या फांकती प्रभा, । होय ते तुझी प्राणवल्लभा. ॥३४
नेटकी रूपें कंजलोचना, । घातला तिनें काळ आंकणा, ।
देखतां तितें कंप, रे, नभा, । होय ते तुझी प्राणवल्लभा. ॥३५
पद्मिनीपरी बोधवी मना, । देतसे कशी दु:ख दुर्जना, ।
काळही मनीं शंकितो उभा, । होय ते तुझी प्राणवल्लभा. ॥३६
भक्षिते रजमांसशोणित, मारिते रजनीचरां.
दैत्यदानव, वीर मानव, त्यांसि अंतरिं भेदरा. ।
पामरा तुज तेपरी बरि अंकमंडित साजिरी,
राजवैभव, सूतबांधव, भोगिं संपति सुंदरी. ॥३७
जरा, मृत्यु नाहीं, गदा नाम तीचें. । करी सर्व निर्मूळ, नष्टा, चराचें. ।
तिचें नाम घेतां पडे थोर भ्रांती. । बसो तेचि अंकीं तुझे प्राणहर्ती. ॥३८
कुलांगनेसि इच्छितां सवेग मृत्यु पावसी.
सती सभेसि आणिली रणक्षितीसि लोळसी. ।
कुटीळ नेत्र जे, भरें रणांत गीध भक्षिती.
भुतें, विशाळ श्वापदें वनांत मांस वांटिती. ॥३९
बहू दु:ख गंगासुतालागिं जालें । म्हणे, “ भूपती; फार म्यां सीकवीलें. ।
मदाचेनि गर्वें, प्रभू, नायकेसी. । करें आपल्या लाविलें पावकासी. ॥१४०
बुद्धि हे तुझी वन्हिची खरी, । साह्य बंधु ते मारुतापरी; ।
काम ना वनीं वन्हि पेटला. । सांगतां तुतें कोप वाटला. ॥४१
प्रारब्धरेखा अति दुष्ट आहे. । केलें बरें संचित पूर्ण पाहें. ।
त्या सारिखें, रे, क्रियामाण आतां; । तैं टाकिलें, रे, तुज सीकवीतां. ॥४२
कोपला भुपाळ काळक्रोधरूप बिंबलें,
वमी विशाळ व्याळ काळकूट जेंवि आपुलें. ।
पाहिल्या विशाळ ग्रंथि भ्रूलतांसि सादरें,
बोलिला सभेसि काय द्रौपदीसि उत्तरें ? ॥४३
सुंदरी, अगे, काय तूं सती ? । भोगिसी कसे पांचही पती ? ।
लोक हे तिन्ही नायका किती । देखती, तयां येकची पती. ॥४४
पूर्णता नव्हें येकल्या नरें, । कामुके, तुतें मानले बरे. ।
पांचही पती, साधिती तपें. । कोण, गे, सिमा सांग तूज पें ? ॥४५
व्रत हें कसें मिरविसी जनीं ? । तूजसारिखी कोण पापिणी ? ।
शब्द, गे, तुझे बाण लागले, । विंधिलें बळें पूर्ण भेदिलें. ॥४६
शब्द ते विषापरि वमिसि कसे ? । अणुमात्र कशी तुज भीड नसे ? ।
पतिते, तुझि पाप वदे रसना. । करितां शतखंड नये करुणा. ॥४७
तिळतुल्य तनू करितां निकरें । तुज राखिल कोण ? विचारिं बरें. ।
करितां ताडण तुज दु:ख जरी, । तुज कोण सखा ? खरें सांग तरी. ॥४८
खुडितां पदपाणिपयोधर, गे । कुटिए, मज तों क्षणही नलगे. ।
पति देखत, पापरुपे, तुज, गे, । निकरें मुख तोडुन टाकिन, गे. ॥४९
रक्षिता तुतें कोण सांग तो ? । साम्यता मतें कोण वीर तो ? ।
मारितां तुतें नीकरें करें, । वारिजे मतें कोणत्या विरें ? ॥१५०
पापरूप भारती तयेसि आजि छेदितों,
परंतु बंधुभाज, गे म्हणोनि बीड राखितों. ।
विटंबितों सभेसि तूज सर्व भूप देखतां.
बळेंकरून कोण, गे, भुपाळ, सांग, वारिता ? ॥५१
सभे श्रेष्ठ भद्रासनीं स्वामि तूझे । कसे बैसले, गे, सभे बंधु माझे ? ।
कृपाचार्य, गे, भीष्मद्रोणादिकांचा । श्रुती नाम राजा; नव्हे पाड त्यांचा. ॥५२
तुझें चैल घेतां सभे देखतां, गे, । तुतें देखती नग्न हे भूपती. गे. ।
तुझें गुह्य, गे, विश्व देखेल आतां. । तुला कोण, गे, रक्षिता, सोडवीता ? ॥५३
वदे भूपती दुष्ट, काळस्वरूपी; । वमी वीष जैसा अही दीर्घकोपोई. ।
करी अंबरीं गर्जना मेघ जैसा, । कुरूनाथ बोले सभेमाजि तैसा. ॥५४
अथानंतरें काय दु:शासनातें । म्हणे ? “ रे, करीं नग्न दोषाचरीतें. ।
सभेमाजि बोलों सरे पापसिंधू । त्वरेनें तसा ऊठिला राजबंधू. ॥५५
भुजंगापरी दीर्घ वेणीस कोपें । करें नीकरें वेष्टिलें पापरूपें.
दुजा पाणि घाली निरीमोचनातें । किती होतसे दु:ख साधू जनांतें ! ॥५६
अथानंतरें ते करी स्तोत्र बाळा । मुकुदा, हरी, माधवा मघनीळा, ।
कृपाळा घन श्याम, गोविंद, शारी, । चिदानंदआनंदकंदा मुरारी, ॥५७
गोपिवल्लभ माधवा, हरि, यादवा, मधुसुदना,
अच्युता, उपइंद्र, ईश्वर, कामिनीमनमोहना, ।
नंदनंदन, इंद्ररक्षण, श्रीहरी अरिमर्दना,
पूतनांतक, अंतकांतक, दासतारक वामना, ॥५८
शामजी, सखया, हरी, सभे सर्व अंतक बसले.
केशरी असतां शिरीं अरिं गांजिलें त्वरे धाव रे,
चतूर, सुंदर, डोळसा, क्षण येक टाकुनि पाव, रे. ॥५९
पद्मिणीपति, कर्णिकातिरवासिनी, यदुनायके,
श्यामले, मुरुमर्दने, कुळदैवते, वरदायके, ।
सांवळे, मुरलीधरे, कमळानने, जनव्यापके,
गांजिलें मज दुर्जनीं सभे येकली, सुखदायके. ॥१६०
ये त्वरें, यदुनायका, करुणानिधी; मज सोडवीं.
श्यामसुंदर रूपडें समयीं असे ऑजी दाखवीं; ।
ये हरी, धरिली निरी, न दिसे उरी, जगजीवना.
भक्तवत्सल हे ब्रिदें तुझिं कायसीं मधुसूदना ? ॥६१
चिद्रुपा हरि, चिद्घना, चरणाबुजें तुझिं चिंतिती,
देव, फणिवर, यक्ष, चारणलोक मुनिवर वंदिती. ।
जयजया जगव्यापका, नतपालका ऑजि ये हरी.
पाव सत्वर सिंधुजापति; सर्वथा न उरे उरी. ॥६२
अनाथनाथ, बंधुजी, झणीं विलंब लाविसी.
उशीर फार जाहला, हरी, मला न पावसी. ।
जळीं गजेंद्र गांजितां, हरी, त्वरीत सोडिला.
द्रौपदीसि गांजितां, रे, काय लोभ आटला ? ॥६३
दयाळ देवराव, दीवबंधुराज, सोयरा.
इला समीर जीवनीं भरूनि तेज आंवरा. ।
फोडिला विनाळ स्तंभ, भक्तराज रक्षिला.
द्रौपदीसि गांजितां, रे, काय लोभ आटला ? ॥६४
मयोरपिच्छभूषणा, त्वरीत पाव, यादवा.
कृपाळु कृष्णबंधुजी, रे, पाव, पाव, माधवा. ।
मागतांचि क्षीर त्यास क्षीरसिंधु दीधला,
द्रौपदीसि गांजितां, रे, काय लोभ आटला ? ॥६५
मुकुंद, देव, वासुदेव, ज्यासि नाम चांगलें;
परंतु दीन येकलें सभेसि काय टाकिलें ? ।
धुरूसि राज्य दीधलें, विचार तूज मानला.
द्रौपदीसि गाजितां, रे, काय लोभ आटला ? ॥६६
पंकजानना, सुंदरा, हरी, । धांव, रे, सख्या; गांजिती अरी. ।
सर्वही सभे दुष्ट बैसले. । आजि तूं त्वरें पाव, माउले. ॥६७
चिंतिती सदा द्रौपदी सती, । मानसीं तुझ्या ‘ पावणें किती ? ’ ।
हें जरी, हरी, मानलें तुतें, । सोडवी तरी कोण आमुतें ? ॥६८
छळीती, हरी, बाळकें माउलीतें, । न वाटे परी सीण तीच्या मनातें. ।
कदापी नव्हे माय निष्ठूरहेतू; । मुकुंदा तसी माउली आमुचि तूं. ॥६९
राज्यसौख्यसंपतीसि रातलासि, वामना ?
गुंतलासि भोगितां, रे, कंजरीटलोचना ? ।
नश्वरासि, ईश्वरा, तुं लुब्धलासि काय, रे ?
अनाथनाथ, दीनबंधु, नाम वेर्थ जाय, रे. ॥१७०
विधीनिमित्य मत्स्यवेशिं दैत्यनाथ शोधिला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
तळासि जाय मेदिनी, रे, कूर्मवेश घेतला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७१
शूकरावतारिं हेमनाम दैत्य मर्दिला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
भक्तभारतानिमित्य नारसिंह पातला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७२
भक्तराजद्वारपालहेतु तूज मानला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
बहुत वेळ हा भुगोळ सर्व दान दीधला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७३
श्रिराम पूर्ण ब्रह्म सर्वदेवबंध सोडिला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
मुकुंदराज आठवा सभेसि आजि चिंतिला.
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७४
बौध्य अवतार बंधु द्वारकेसि राहिला;
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
नि:ष्कळंक देवराव, लोभ सर्व टाकिला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७५
शीणलें परंतु श्याम कामिनीसि गुंतला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
कल्पवृक्षराज, आजि लोभसिंधु आटला,
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ॥७६
लागला उशीर तूज, कोण भक्त भेटला ?
द्रौपदीनिमित्य तूज फार शीण वाटला. ।
दिना समान येकली सभेसि, भूप कोपला,
कोणते कळेसि आजि देवराव गुंतला ? ॥७७
विधी, वरूण, इंद्र, चंद्र, ध्याइलासि शंकरें.
फणींद्र, हे मुनींद्र तूज चिंतिताति सादरें. ।
सिमा श्रुतीसि नाकळे, रे, ‘ नेति नेति ; उत्तरें,
सांवळ्या, त्वरीत पाव द्रौपदीसि आदरें. ॥७८
उदार, धीर माधवा, गणील कोण वैभवा ?
व्रजांगनांत खेळणें, लिलाविलास, यादवा. ।
गोपिनाथ, पूर्ण ब्रह्म गोपवेश खेळणें;
गांजिलें सभेसि आजि द्रौपदीसि पावणें. ॥७९
कोणत्या वनांत आजि कामधेनु गुंतली ?
अझुनी नयेचि देव, कारुणेश, माउली. ।
दुष्ट, बंधुराज, पापरूप चैल घेतसे,
धांव, पाव, माधवा; कठीण वेळ जातसे. ॥१८०
करी स्तोत्र नानापरे हाटकांगी. । घन:श्याम तो चालिला लागवेगीं. ।
खगेशासि सांगे, “ त्वरें चाल तेथें, । असे पंकजाक्षी सभेमाजि जेथें. ” ॥८१
नभीं सूटला वायु पक्षद्वयांचा, । रजें दाटला प्रांत अष्टां दिशांचा. ।
मनोवेगे तो टाकिला दूर मागें. । सभे पातला कान्हया लागवेगें. ॥८२
तिनें देखिली मूर्ति दामोदराची; । भुमी होतसे वृष्टि त्या लोचनांची. ।
म्हणे, “ नाभि, गे, पातलों. ” द्रौपदीतें. । करें मान्हयें पूसिलें लोचनांतें. ॥८३
मुगुटमंडित माणिकें रवितेजराजित शोभलीं.
रेखिला मृगनाभि सुंदर, श्यामता किती बिंबली. ।
भ्रुकुटि शोभति कार्मकापरि, सरळ नासिक साजिरें,
कमळलोचन, दशनराजित अधर, आनन गोजिरें. ॥८४
श्रवणिं डोलति कुंडलें मकराकृती विजुचेपरी;
मालिका नवरत्नराजित, केयुरें भुजिं साजिरीं, ।
मुद्रिका वरि कंकणें, बरि ऊटिचर्चन केशरें,
शंख, अंबुज, चक्र, पट्टिश; पीतअंबर साजिरें. ॥८५
जडितमणिकमेखळा कटिं शोभती लघुकिंकिणी.
आंदु नेपुरवांकिराजित ऊठती मधुरा ध्वनी. ।
गरुडवाहन, पंकजानन, पावला द्रुपदीप्रती.
जान्हवीसुत, भास्करात्मज, द्रोण देखति श्रीपती. ॥८६
द्रौपदी म्हणे, “ बंधुकेसरी, । सांवळ्या, बहू गांजिती अरी. ।
काय, रे हरी, लोभ टाकिला ? कोणता तुतें छंद लागला ? ॥८७
भक्तवत्सला, दु:खवारणा, । कोण हे रिती, आणिजे मना. ” ।
बोलतां कसा कंठ दाटला. । लोचनीं किती पूर चालिला. ॥८८
बोलिला हरी, “ माय, ऊगली. । कौरवांसि, गे, ठालली भुली. ।
भस्म हे पुढें होति सर्व, गे. । मातले म्दें पापरूप, गे. ” ॥८९
धरेना पुढें क्रोध दुर्योधनातें. । वदे काय निष्ठूर दु:शासनातें ? ।
“ त्वरेनें हरीं, रे, इच्या अंबरातें, । करीं नग्न वेगीं, सख्या, पापिणीतें. ” ॥९०
असें बोलतां भूप संतापकोपें, । तसें चैल्य आंसूडिलें, पापरूपें. ।
किती होतसे दु:ख साधूजनांला । स्मरोनी हरी, लाविती लोचनांला. ॥९१
तसें चैल्य आंसूडितां लागवेगीं, । दुजें देखिलें हेमरंगी सुरंगी. ।
सभे मानिलें चोज तेव्हां भुपानें । म्हणे, “ काय कौसाल केलें सतीनें ? ” ॥९२
वदे मारती त्या सभेच्या जनांसी. । “ पहा बुद्धि पांचाळराजात्मजेसी. ।
परी कर्मरेखा कदापी टळेना. । दिसे घेतल्या चैल्य हें नग्न जाणा. ॥९३
दु:ख्ह सज्जनांसि, सूख दुर्जनांसि वाटलें.
त्वरीत बंधुनायकें विशाळ वस्त्र वोढिलें. ।
तीसरें सुनीळरंग, पीतबिंधु, साजिरें.
सभा तटस्थ सर्वही, समस्त भूप सादरें. ॥९४
कूपला भुपाळबंधु, चैल्य पाणिनीकरें
बळेंकरूनि आंसुडीत पीतरंग अंबरें.
श्वेत, पीत, अरुणें, विचित्ररंग दूसरीं.
रक्तपीतपाचबिंदु सर्व भूमि साजिरी. ॥९५
शुभ्र त्यांत पाचबिंदु, सर्वरंग शोभती.
श्यामरंग, रक्तबिंदु, सर्व भूप देखती. ।
मेघवर्ण एक त्यांत हेमतंतु भूमिका.
अनंतरंग नेसली, हो, पंचराजनायका. ॥९६
भृंगसूत, हेमतंतु, रंग सर्व साजिरा;
विद्युल्लता नभांत जेंवि. तेंवि तेज अंबरा; ।
छिटें अपार द्वीपिंचीं अनंतरंग बिंबलीं,
लीहिलें दशावतार, द्रौपदीसि शोभलीं. ॥९७
क्षिरोदकांत पाचबिंदु, राजहंस शोभले,
मत्स्यकच्छशूकरावतार ज्यांत बिंबले, ।
नारसिंहवामनादि जामदग्नि सादरें,
राम, कृष्ण पूर्ण ब्रह्म, वेद, दिव्य अंबरें. ॥९८
गाई, गोकुळ, गोठणें वरि बरीं ते नेसली सुंदरी,
गोपी, गोंवळ, गोपनाथ, बरवा तीं अंबरें साजिरीं. ।
वेली, वृक्ष विशाळ्म अंबुजवनें वापीतडागोदरीं,
रंगीं अंबर रंगलें वरि दिसे ब्रह्मांड नानापरी. ॥९९
काळा, सोनसळा, तसा वरि बरा जो हीरवा पालवीं,
ज्यातें मिश्रिततंतु हाटक, दुजा रंगीं कसा माधवी ? ।
मूगा, सोनसळा, तसा वरि बरा जो हीरवा पालवीं,
ज्यातें पल्लविं माणिकें जडियलीं; तें कोण जाणे किती ? ॥२००
किती येक तें चित्रिलीं चित्रकारें; । किती येक तें हंसरंगें मयोरें; ।
कितेकांवरी भार गोळांगुळांचे; । किती येक थोंवे वरी पक्षियांचे; ॥१
कितेकांवरी पक्षि नानाविलासी; । किती येक तें हरिनी पाडसेसी; ।
कितेकांवरी ते सभा वासवाची; । मनोबुद्धि विस्मीत दुर्योधनाची. ॥२
आले द्राविड, गौड, कोंकण, कळा, कोल्हार, कसिंबरी,
आंगे, वंग, कलिंग, गुर्जर, गया, गांधार, कासीपुरी, ।
मारु, माधव, माळिवा, मधुमती, वैदर्भ, वैराटिका,
येती मागध, बागलाण, कनुजा, वैराट, कर्नाटिका. ॥३
मलेबार, बंगाल मंजूबुटीचीं; । खुरासान, नेमाड, जाळंधरींचीं, ।
महीपाळका, उत्तमें कैकटींचीं, । बळेंहार, तैलंगणें, बर्बरींचीं. ॥४
वाळुकासि धूम्रगोड ब्रह्म, चीन, सोरटें,
कळावपारदेश हेमतंतु चैल्य चोखटें. ।
सभे गिरीसहीत भोट, वैन देश पातला.
नंदनादिदानदेश पारिजात देखिला. ॥५
द्राविडादि मूलतान, वत्रमूख देसिंचीं
सीत वाढि चंद्रसेन कंजनाक्षि राजिचीं. ।
दक्षणेसहित सर्व देश दिव्य अंबरीं,
पातळें विशाळ पूर सिंधुलोट जेपरी. ॥६
अतळ वीतळ सुतळ तळातळ रसतळहि तळें,
तगटि आकुश रत्नराजित सदटणें सरपातळें. ।
भुवन भूवन मेरु मंजुळ कनकमंडित अंबरें
नेसली द्रुपदात्मजा. कुरुनाथ देखत सादरें. ॥७
त्वरें पापलीं अंशुकें द्वारकेचीं. । असंभाव्य तें दिव्य मायापुरीचीं. ।
अयोध्यापुरी ते रघुनायकाची. । असंख्यातरंगें छिटें वंदरींचीं. ॥८
प्रतिष्ठान, पद्मावती पूर्णरंगें, । त्वरें पातलीं मैथिलीं लागवेगें.
सुरंगीत तें अंबरें पट्टणीचीं. । द्विपें सप्त लावण्य ते शीवकांची. ॥९
सभे लोटला सिंधु दिव्यांबरांचा; । तरों लागला बंधु दुर्योधनाचा. ।
बळेंसीं किती अंबरें राजबंधू ? । किती वोढितां भागला पापसिंधू. ॥२१०
हरी येक अंशूक जों राजभ्राता, । चतुर्भूज तों नेसवी कंसहंता. ।
फिरे मागुता हस्त दुर्योधनाचा ( ? )  । पुढें थाट तो नीट दिव्यांबरांचा. ॥११
गिरीचेपरी ढीग दिव्यांबरांचे, । जसे मातले पूर अंबूनिधीचे. ।
किती वोढितां भागला पापसिंधू. । निमाली सुखश्री, उभा राजबंधू. ॥१२
द्रोणादि भीष्म, शकुनी श्रवणाभिधानी
त्यांतें म्हणे नृप कसा स्वबळाभिमानी. ।
“ हे सुंदरी कपटि, कूठिळ, कंजनाक्षी.
मायाबळें सकळ मोहित पंकजाक्षी. ॥१३
इनें बांधिली दृष्टि आधीं सभेची. । गती राहिली सर्वही लोचनांची. ।
इतें लक्षितां देह कांहीं दिसेना. । इनें गोंविले चक्षु, कांहीं सुचेना. ॥१४
पहा, बंधु माझा बळान्वीत मानें, । तुम्हां देखतां जिंतिला इंद्र जेणें, ।
तया वोढितां अंबरें शीण झाला. । महावीर तो भग्न होऊनि ठेला. ” ॥१५
वदोनि हेंचि उत्तरें त्वरीत बंधु वारिला.
वंदिला भुपाळ; बंधु सन्मुखेंचि बैसला. ।
बंधुपंच भूप धर्मराज दु:ख पावला. ।
निकें म्हणोनि अंतरीं मुकुंदराज चिंतिला. ॥१६
अथानंतरें द्रौपदी भूपतीतें. । म्हणे, “ आणिं, रे, द्यूतकर्मासि येथें. ।
तुवां जिंतिला धर्म कापट्यबुद्धी. । पुन्हा द्यूत खेळों, त्वरें आण आधीं. ” ॥१७
असें बोलतां आणिले द्यूत वेगीं. । भुपाळापुढें मांडिले लागवेगीं. ।
स्मरोनी हरे बैसली हाटकांगी.  । उभा राहिला कान्हया पृष्ठिभागीं. ॥१८
बैसली सभेसि देवि कंजरीटलोचनी.
शोभली नभांत जेंवि दिव्यरूप दामिनी. ।
स्मरोनि देव अंतरीं त्वरीत डाव टाकिला,
सोडवी पतींसि. भूप अंतरास खोंचला. ॥१९
आपणांसि सोडवी त्यजूनी डाव दूसरा.
पाठिंसीं अनाथनाथ, दीनबंधु, सोयरा; ।
म्हणोनि डाव जिंकिला, कळे जनांसि कायसें ?
परंतु काय जाणतील पापरूप वायसें ? ॥२२०
पातला पुढें शकुनि आदरें, । भूपतीप्रती बोलिला बरें. ।
“ कुळॉंगनेसिं, हो, काय खेळणें ? ” । मेडिलें कसें द्यूत दुर्जनें. ॥२१
अथानंतरें तो उठे पापसिंधू. । निघाले सवें सर्वही राजबंधू. ।
असंख्यात वेष्टीत तो वीरमेळा । नृपाळासवें चालिला, लोकपाळा. ॥२२
दिनांचेपरी देखिलें पांडवातें; । दयापूर आला कृपासागरातें. ।
करी लोभ माया जसी बाळकातें, । करें कान्हयें पूसिलें लोचनांतें. ॥२३
धर्मजीप्रती प्रेम नांवरे. । भूपती उभा राहिला त्वरें. ।
स्वजन, सोयर्‍या, सांवळ्या, हरी, । जनक, माउली, आमुची खरी. ॥२४
चिद्धना, हरी, देवनायका, । सगुण, श्यामला, विश्वव्यापका, ।
जय जया जया सिंधुजापती, । वर्णितां तुतें भागल्या श्रुती. ॥२५
हरी, सिंधुजामात, देवा, समर्था, । कृपाळूपणें वारिसी भक्तचिंता. ।
तुझा पार नेणे स्वयें सृष्टिकर्ता. । ब्रिदें साच केलीं तुवां आजि, ताता. ॥२६
कळेना सिमा हे धराधराकातें, । कळेना तुझें रूप वेदा स्मृतीतें, ।
कळेनासि ध्यातां महायोगियांतें, । असा पावसी भक्तभावार्थ जेथें. ॥२७
मुकुंदें किती वारिला, बैसवीला. । समाधानवृत्ती स्वयें नीववीला. ।
चतुर्भूज सर्वोत्तमें धर्मजीतें । कृपाळूपणें बीज सांगीतलें तें. ॥२८
सभापर्विंची हे कथा पूर्ण जाली. । यदूनायकें सर्व संपूर्ण केली. ।
जयामाजि हे कीर्ति नारायणाची । जनां तारिते भीम पाळी भवाची. ॥२९
जैं तो शक वेदफणींद्रतिथी, ऋषिआत्मज तो परिधावि असे,
वर्षा ऋतु, श्रावन शुद्ध बिजे, भृगुवार, मघा उडु पूर्ण वसे, ।
वर यान घटी शरवेद इती उदधीतनयेसिहि जन्म दिसे,
कवि रामसुतात्मज दास नवा रुप पद्मतळातळिं राजितसे. ॥२३०
वसूची पुरी, ती तळीं ग्राम आहे; । जयाचें ‘ तुळा ’ नाम हें शोभताहे. ।
वसे मंडळी सर्वही सज्जनांची. । पहा वस्ति ते रामसूतात्मजाची. ॥३१
जयाचा पिता नाम वीनायकाचें; । यशोदा अभीधान मातेसि साचें. ।
मुळारंभ हा वेद सुंदर्य आहे. । सुरारीरिपूचा गुरू गोत्र पाहें. ॥३२
प्रथम तरि क्षिराब्धी दीधला ज्यासि, पाहें.
सजन मित्रवर्ण हें दुजें नाम आहे. ।
यदुपतिवनितेचा तात ग्रामाभिधानीं.
प्रवर तिन तयाचे साजिरे दिव्य खाणी. ॥३३
कथा वाचितां, ऐकतां दोष जाती. । अघें नाशुनी, सर्व जाती दिगंतीं. ।
असे न्यून तें पूर्ण संतीं करावें. । पदप्रासअर्थीं बरें वीवरावें. ॥२३४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP