मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
पंचाक्षरीमाहात्म्य

पंचाक्षरीमाहात्म्य

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीशिवपदजलजातें  आठवितां, दुरित तें सकळ जातें. ।
महिमा शिवदेवाचा  न कळे हृदया. कशी वदे वाचा ? ॥१
समजे गुरूपदिष्टें  शिवमंत्रेम जन शिवस्वरुप दिष्टें; ।
म्हणुनि तयाला जावें  शरण सुभावें, मनीं न लाजावें. ॥२
‘ पंचाक्षर ’ मंत्रातें  जपुनी दाशार्ह नृप, पवित्रातें, ।
पापापासुनि सुटला.  त्याचा भवबंध सर्वही तुटला. ॥३
सूतें ‘ स्कांद ’ पुराणीं  तेचि कथा कथिलिं पावन, पुराणी. ।
रचिली भाषाश्लोकीं.  श्रोतीं अवधारिजे महाश्लोकीं. ॥४
स्वामी तो मथुरेचा,  दाशार्हाभिध नृपोत्तम धुरेचा. ।
रथहयअनेकपाळी  सुभटकदंबहि तसे बहू पाळी. ॥५
जिंकुनि भूपतिनिकरा  निजसामर्थ्येचि, फार घेउनि करा. ।
जेणें भूमिसुरांसी  पूजुनि, दिधली सतोष वसुरासी. ॥६
त्या भूपा, विनतनया,  नेउनि गेहासि, आपुली तनया ।
देऊनि, काशीपतिनें  केलें तैं लग्न सर्वसंमतिनें. ॥७
तो श्वशुरादेशातें  घेउनि, भार्येसह स्वदेशातें ।
येउनि, दे धनदानें  विप्रांला, जेंवि लाजिजे धनदानें. ॥८
मग नृपति बरा रातीं  मंचीं बसतांचि, शंकराराती ।
पाहुनि दुसर्‍या प्रहरीं  निजबाणें त्यासि सत्वर प्रहरी. ॥९
तेव्हां कलावतीतें  बाहे क्रीडूं महा गुणवतीतें. ।
ते विनवी, “ व्रतशीला  मी. न शिवावें तुम्हीं मज तशीला. ॥१०
रोगयुता, जे दीना,   प्रीतिविहीना, वधू गुणविहीना, ।
पुष्पवती त्यागावी;  गर्भवती तेंवि ते न भोगावी. ॥११
मी व्रतयुक्त; नवोढा  भार्या तुमची, तरी न मज वोढा. ।
करितें, हो, नमनातें.  आतां धैर्ये धरा निजमनातें. ॥१२
जे धर्महि, कुल टाकी,  भोगियली ते अखंड कुलटा कीं. ।
संतत वेश्यागमनें  पाप तुवां जोडिलें सरागमनें. ” ॥१३
कामजतापदरातें  पावुनि तो नृप, धरोनि पदरातें, ।
वोढुनि भेटे तिजला.  आशय तीचा तयासि न समजला. ॥१४
अंगस्पर्श सतीचा  होतां, संतप्त देह नृपतीचा ।
जाला, तंव घाबिरला;  सोडुनि तो तीस मानसीं विरला. ॥१५
“ हें देह आधिकारी.  मी भोगाया नव्हेंचि अधिकारी. ” ।
म्हणुनि हळूच भयानें  तीस पुसे यादवेश विनयानें. ॥१६
ते तंव बोले नमुनी.  “ पुर्वीं दुर्वास थोर, सुज्ञ, मुनी
माझ्या पितृभवनाला  आला, जो वंद्य तीनि भुवनांला. ॥१७
तेणें करुणानिधिनें  दिधला मज शैवमंत्र तो विधिनें. ।
जपतां पापें सरलीं.  चित्तीं चिन्मूर्ति सर्वदा स्फुरली. ॥१८
पंचाक्षरीजपानें  जालें परिशुद्ध मानस तपानें. ।
महिमा थोर शिवाचा.  वारी संसारखेद जीवाचा. ” ॥१९
भूप म्हणे, “ उपदेशीं  मंत्रातें तूं यया प्रथित देशीं. ” ।
वंदुनि ते पदकमलां.  बोले, “ तूं कांत होशि देशिक मला. ॥२०
आमुच्या नगराजवळी  राहे गर्गाख्य योगिराज, बळी. ।
तेथें सत्वर जावें,  त्याच्या वचनें रहस्य समजावें. ” ॥२१
तेव्हांचि तीव्रगतिनें  भूप निघाला कलत्रसंगतिनें. ।
पावे तो उटजातें,  पाहे सर्वत्र फुल्ल कुटजांतें. ॥२२
मग वंदुनि मुनिचरणां,  जोदुनि करयुग्म त्या सदाचरणा, ।
सांगे आपुली वार्ता.  “ स्वामी, तारीं ” म्हणे “ भवदवार्ता. ” ॥२३
सन्मुख जोडुनि पाणी  राहे, वाहे दृगंबुजीं पाणी. ।
त्यातें तंव ऋषि पाहे.  बोले, “ कां करिसि खेद, बापा हे ? ॥२४
वदना, आसेचनका,  बाष्पें वायांचि करिशि सेवन कां ? ।
पूजीं नित्य शिवातें. लोकीं न पवसि कदापि ( अ ) शिवातें. ” ॥२५
सांगुनि शिवभजनातें,  संगें घेवोनि त्याच सुजनातें, ।
कालिंदीतीरासी  आला ऋषि तो महा तपोराशी. ॥२६
स्नानहि संध्या करुनी  बसतां सारे, शिवा मनीं स्मरुनी, ।
ऋषि करि उपदेशातें,  राया नेउनि विविक्त देशातें. ॥२७
तो षोडशोपचारीं  पूजुनि गुरुतें, सुमंत्र उच्चारी; ।
देहांतुनि त्या काळीं  निघती अरडत अनेक काकाळी. ॥२८
कांहीं गगनीं उडती,  होउनियां भस्म ते तळीं पडती. ।
पाहुनि अद्भुत, गुरुतें  नमुनि पुसे भूप, दाससुरतरुतें. ॥२९
गर्ग म्हणे तैं, “ दुरितें,  जन्मशतीं जें तुवांचि आचरितें, ।
करटाकारें मिळुनी  गेलीं तें आंजि आघवीं जळुनी. ” ॥३०
गुरुवाक्पीयूषातें  प्राशुनि पावे महीश तोषातें. ।
“ श्रीदेशिकावतारी ”  मानी ऐसें “ जनासि शिव तारी. ” ॥३१
शांतिवधूसंयोगी  येउनि उटजासि गर्ग तो योगी, ।
नृपतिस अनुग्रहातें  करुनि, सुखें पाठवी मग गृहातें. ॥३२
पूजा गुरुची करुनी;  हृदयीं त्याचीं पदांबुजें धरुनी, ।
भार्येसहित स्वपुरा  आला, जाला म्हणोनि काम पुरा. ॥३३
तेणें गुणाकरानें  धरिली कांता करीं निजकरांनें. ।
जैशी चंदनपुतळी,  शीतळ तनुतें तशीच जाणितली. ॥३४
मग शंकरगुरुभजनीं  होउनि तत्पर, वसे नृप स्वजनीं. ।
ऐसी सुकथा कथिली  सूतें, हे बादरायणें ग्रथिली. ॥३५
जे जन शिवमंत्रातें  जपती नतरक्षणस्वतंत्रातें, ।
ते शिवरूप. तयांतें  वीरेश्वरकवि नमी सहृदयांतें. ॥ ३६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP