मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
प्रश्नमालिका

प्रश्नमालिका

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । ॐ तत्सत् ।
“ ॐनमो जी श्रीगुरुवर्या, । अज्ञानतम:सूर्या, । कृतनतजनकार्या, । बोधरूपा. ॥१॥
आत्मलाभा विघ्न करिती । ऐशी जे अनाद्यविद्याभ्रांति, । तीतें परिहरी, गणपति, । अनुग्रह तुझा. ॥२॥
तुझी करुणा, सरस्वती, । होय प्रसन्न जयाप्रति, । तो मान पावे त्रिजगती । गीष्पति सम. ॥३॥
चरणीं ठेवितां शिर । भक्तांसि होसी सुखकर; । अन्वर्थ नाम हें शंकर साजे तुज. ॥४॥
त्रिविधतापें तांतलें । मन व्याकुळ जालें; । कृपामृतवर्षें केवळ । निववावें, जी. ॥५॥
संशयवागुरांतें छेदीं, । मोहपर्वत भेदीं, । मातें बैसवीं आत्मपदीं, । कृपासिंधु. ” ॥६॥
ऐशी करूनि विनवाणी, । शिष्यें मस्तक ठेवितां चरणीं, । गुरु म्हणती, “ आयणी । सांगैं तुझी. ॥७॥
जो तुझ्या मनीं विचार, । तो प्रकट करीं साचार; ” । तंव येरू जोडूनि कर । विनविता जाला. ॥८॥
“ ( १ ) बंध तो कवण, । ( २ ) मोक्ष किल्लॅंक्षण, । ( ३ ) अविद्येची खूण, । ( ४ ) कैशी ते विद्या ? ॥९॥
( ५ - ७ ) जागृत्स्वप्नसुषुप्ती । आणि ( ८ ) तुर्या जे म्हणती, । हें अवस्थाचतुष्टय मजप्रति । निरोपावें. ॥१०॥
( ९ - ११ ) अन्नप्राणमनोमय, । ( १२ - १३ ) विज्ञानमयानंदमय, । हें कोशपंचक गुरुरायें । निरोपिजे. ॥११॥
( १४ ) कूटस्थ तो कवण, । ( १५ ) जीवाचें काय लक्षण, । आणि ( १६ ) क्षेत्रज्ञ म्हणणें । कवणासि पां ? ॥१२॥
( १७ ) साक्षी कवण म्हणावा, । ( १८ ) अंयर्यामी केंवि जाणावा, । हाही भाव निरोपावा, । स्वामी, मज. ॥१३॥
( १९ ) कैसा तो प्रत्यगात्मा, ॥ ( २० ) कवण्या गुणें परमात्मा, । ( २१ ) उपाधिरहित आत्मा, । ( २२ ) माया कैसी ? ॥१४॥
ऐसे बावीस प्रश्न बरवे, । कृपाघन, निरोपावे; । श्रवणमात्रें अघवे । संदेह निरसती. ॥१५॥
आश्रितरक्षणीं चतुरु । सन्मुख जोडला कल्पतरु; । तरि भागावया, अयि, दरु । धरावा कां ? ॥१६॥
तूं भक्तजनचिंतामणि, । म्हणौनि हे सलगीची विनवणी । केली; आतां शिराणी । पुरवीं माझी. ” ॥१७॥
एवं ऐकोनि शिष्यवचन । श्रीगुरु जाले प्रसन्न. । म्हणती, “ होऊनि सावधान । परिसा; सांगों. ॥१८॥
उघडूनि श्रुत्यर्थमांदुस, । देऊं ज्ञानरत्नसुप्रकाश; । जेणें अज्ञानकडवस । फिटैल तुझें. ॥१९॥
आत्मा निर्मल, निस्संग; । तया अनात्मदेहादिकांचे धर्म । आपुले ठायीं आरोपिजती भ्रमें, । पैं. ॥२०॥
देहेंद्रियादिकांचे धर्म । आपुले ठायीं आरोपिजती भ्रमें, । हेंचि बंधनाचें वर्म । फुडें जाणें. ॥२१॥
मी श्याम, मी गौर; । मी श्रोता, मी बधिर; । ऐसा जो अभिमान दृढतर, । तोचि ( १ ) बंध. ॥२२॥
ऐशिया अभिमानाची निवृत्ति, । बोधें होय जे आत्मप्रतीति, । जे कल्पनेची शांति, । तो ( २ ) मोक्ष जाण. ॥२३॥
निर्विकार आत्मस्वरूपीं । संसार सत्यत्वें आरोपी, । मीतूंपणातें स्थापी । अज्ञान जें, ॥२४॥
तें संसारासि कारण; । तेंचि ( ३ ) अविद्या जाण. । नावेक न धरी प्राण । विद्योदयीं. ॥२५॥
जें वेदांतविचारसत्यज्ञान, । तया ( ४ ) विद्या ऐसें नामाभिधान; । तेणें निरसे अज्ञान । स्वकार्येसीं. ॥२६॥
ते विद्या द्विविध । परोक्षापरोक्षभेदें; । तें द्वैविध्य तुज विशद । करूनि सांगो. ॥२७॥
वेदांतशास्त्रविचारें । ब्रह्म एक असे निर्धारें, । ऐसा जो बोध साचार, । ते परोक्षविद्या. ॥२८॥
सर्वनिषेधमुखें श्रुति । जयातें प्रतिपादिती, । तें ब्रह्म मी; हे प्रतीति, । अपरोक्षविद्या. ॥२९॥
ऐशी हे विद्या विपायें । जया गुरुमुखें अपैती होय, । तयाचा देहाभिमान जाय । विरोनियां. ॥३०॥
मनोबुद्धिचित्तअहंकार । आणि इंद्रियें द्विप्रकार । स्वस्वदेवतानुग्रहें, बाxx, । ववरती. ॥३१॥
ऐशीं चतुर्दश करणें । इहीं शब्दादि विषय घेणें, । तें जाण ( ५ ) जागरण । आत्मयाचें. ॥३२॥
नसती शब्दादि विषय, । तद्वासनायुक्त चित्तचतुष्टय, । तेणें विषयग्रहण होय । तें ( ६ ) स्वप्न. ॥३३॥
मनादिकें चार्‍ही । दडती स्वकारणांभीतरीं, । तंव ते अवस्था चतुरीं । ( ७ ) सुषुप्ति म्हणिजे. ॥३४॥
जे अवस्थांचे भावाभाव । त्यांसि साक्षित्वें असे बरवें, । स्वयें भावाभावरहित सदैव । तें तुर्य चैतन्य. ॥३५॥
त्या सर्वसाक्षिदशेतें । ( ८ ) तुर्या म्हणती संत. । साक्ष्यभावें तियेतें । उन्मनी म्हणिये. ॥३६॥
चौं देहांचें विवरण । जाणावेम पंचकोशलक्षण; । मग यया विलक्षण । आत्मा जाणवे. ॥३७॥
पंचीकृतभूतकार्य । स्थूळ देह हा अन्नमय; । अन्नरसें होय । म्हणौनियां. ॥३८॥
मायबापें भक्षितां अन्न । शुक्रशोणित होय तेणें; । तें दोनी एकवटतां जाण, । संभवे हा. ॥३९॥
त्वचा, मांस, रुधिर, । मेद, मज्जा, अस्थिनिकर, । इहीं षट्कोशीं जालें शरीर । ( ९ ) अन्नमय हें. ॥४०॥
आणि प्राणापान, । व्यान, उदान, समान, । हे जाले रजोंशेंकरून । पंचभूतांचे. ॥४१॥
प्राण हृदयौनि नासा वरी, । संचरे अपान अधोद्वारीं, । व्यान वायु सर्व शरीरीं । संचरे, गा. ॥४२॥
अन्नोदकांतें समान । पाववी अवयवां समान. । उत्क्रमणवायु उदान । जाण, बापा. ॥४३॥
उपप्राणपंचक । शरीरीं वर्णिती कितेक. । त्यांचा व्यापारही सम्यक । निरोपूं तुज. ॥४४॥
नाग करीं ढेंकर; । कूर्म तो उन्मीलनकर; । शिंका अयेती, कृकर; । देवदत्त, जांभई; ॥४५॥
धनंजय तो पोषण । करी देहाचें जाण; । ऐसे दशविध प्राण । वर्तती देहीं. ॥४६॥
एवं प्राणदशक । मिळतां कर्मेंद्रियपंचक । होय ( १० ) प्राणमय कोश देख, । बुद्धिवंता. ॥४७॥
नाना संकल्प उठवी, । विषय घे इंद्रियांकरवीं, । अहंममता वाढवी । देहगेहीं; ॥४८॥
ऐसें तें, गा, मन । ज्ञानेंद्रियेंसहित जाण, । होय ( ११ ) मनोमय कोश, विचक्षण - । चूडामणि. ॥४९॥
भूतसत्वांशजनितें । ज्ञानेंद्रियें समस्तें । तत्सहिता बुद्धि जे निश्चित, । ते ( १२ ) विज्ञानमय कोश. ॥५०॥
जो देहद्वयासि कारण, । सवेंद्रियोपरमस्थान, । तया आनंदविकारास्तव जाण । ( १३ ) आनंदमय म्हणिजे. ॥५१॥
देहद्वयाधिष्ठान । जें निर्विकार चैतन्य, । तें ( १४ ) कूटस्थसंज्ञ । जाण, बापा. ॥५२॥
जैसें घटावच्छिन्न । असे निर्विकार गगन, । तैसें कूटस्थ चैतन्य । विकाररहित. ॥५३॥
घटगत जळीं जैसें । आकाश प्रतिबिंबित असे. । आणि चंचलही दिसे । उपाधियोगें; ॥५४॥
तेंवि कूटस्थीं कल्पिली, । बुद्धि जे म्हणितली, । तीमाजी प्रतिबिंबली । जे कां चिति, ॥५५॥
तया चिदाभासातें  ।( १५ ) जीव म्हणती संत. । संसारी तो निश्चित । वोळख तूं. ॥५६॥
आणि पंचभौतिक, सविकार, । औट हात शरीर, । हें क्षेम ऐसा निर्धार । शास्त्रीं केला. ॥५७॥
पुण्यपापलक्षणें । धान्यें याचां ठायीं, जाण, । संभवती; यास्तव म्हणणें । क्षेत्र यया. ॥५८॥
ऐशिया क्षेत्रातें । तो जाणें निरुतें, । तो ( १६ ) क्षेत्रज्ञ; ऐसा संकेत । वेदांतींचा. ॥५९॥
जयाचिया सत्तेनें करणें । करिती विषयग्रहण, । परि करीना जो आपण । तो आत्मा साक्षी. ॥६०॥
सूर्याचेनि प्रकाशें । प्राणिजात जैसें । स्वकर्मीं आपैसें । वर्ततसे, ॥६१॥
तयाचेनि पुण्यपापें । भानु जैसा न लिंपे, । तेंवि साक्षी चिद्रूप । अलिप्त सदा. ॥६२॥
जागृत्स्वप्नसुषुप्ती, । इया अवस्था येती, जाती; । परि अनस्यूत असे चिन्मूर्ति, । तो ( १७ ) साक्षी जाण. ॥६३॥
आत्मा तो एकविध । असे स्वत:सिद्ध; । परि जीवेशादि नामभेद । उपाधियोगें. ॥६४॥
आणि ईश्वर वसे सर्वांतरीं । तो मनआदि इंद्रियां नियमन करी; । वर्तवीतसे नाना व्यापारीं । कर्मानुसार; ॥६५॥
तोचि ( १८ ) अंतर्यामी ईश्वर; । शरणागतासि रक्षी निरंतर; । तया जाणतां भवसागर । वोहटे, गा. ॥६६॥
आतां परिसा सावधान । प्रत्यगात्माचें चिन्ह. । शास्त्रसंमत सांगैन । निकियापरी. ॥६७॥
देहींचि आत्मता मानी, । जो कर्तृत्वादिकांचा अभिमानी, । तो बोध कथिला शास्त्रज्ञीं । त्वंपदवाच्यार्थ. ॥६८॥
देह आणि करणें । यांहूनि मी विलक्षण, । साक्षी, ऐसा जो बोध पूर्ण, । तो त्वंपदलक्ष्यार्थ. ॥६९॥
एवं देहादिसाक्षी आत्मा, । बोधरूप ( १९ ) प्रत्यगात्मा. । प्रत्यड्मुखें पातला स्वधामा । म्हणौनियां. ॥७०॥
आतां तत्पदार्थविवरण । सांगूं ( २० ) परमात्मयाचें लक्षण; । जयातें ध्याती योगीजन । सोहंभाव. ॥७१॥
सकळ जगाचें कारण । जें सर्वज्ञत्वादि गुणसंपन्न, । सर्वसाक्षी चैतन्य; । तो तत्पदवाच्यार्थ. ॥७२॥
विविधोपाधिरहित, । विशुद्ध, विश्वातीत, । तें चैतन्य जाण निश्चित । तत्पदलक्षार्थ. ॥७३॥
उभयत्र वाच्यार्थत्याग । करूनि, घेतां लक्ष्यार्थ चांग, । मग अखंडैकरस, अभंग । ( २१ ) आत्मा जाणवे. ॥७४॥
जो स्थूल ना रोड, । साना ना वाड, । तो आनंदकंद, अखंड, । विशुद्ध आत्मा. ॥७५॥
पदार्थशोधनपूर्वक । चिंतिता वाक्यर्थ सम्यक, । देशिकप्रसादें साधक । ब्रह्मचि होय. ॥७६॥
एवं साक्षात्कार जालिया । मग कैंची, रे, माया ? । शब्दार्थ विचारिलिया, । ते नाहीं ऐसा भाव. ॥७७॥
हे असत् म्हणों, तरि भासे; । सत् म्हणों, तरि नासे; । जरि म्हणों सदसत् असे, । तरि तें विरुद्ध. ॥७८॥
यालागीं अनिर्वचनीया । शास्त्रीं बोलिजे ( २२ ) माया; । जाण निश्चयें, शिष्यराया, । विवेकी तूं. ॥७९॥
केलिया अनेक उपाय । माया नाशिली नवजाय. । ईचा प्रबळ विरोधी होय । विवेकुचि. ॥८०॥
जंववरि विवेक नसे, । तंववरि हे भासे; । विवेक उदैजतां नासे । मिथ्या म्हणूनि. ॥८१॥
कल्पिताचा नाश होणें, । जें अधिष्ठानमात्र उरणें । यावांचूनि होणें, जाणें । असेचिना. ॥८२॥
सर्वाधिष्ठान, निष्कंप, । मायाविनिर्मुक्त, निर्लेप । आत्मा सच्चिदानंदस्वरूप । वर्णिती वेद. ॥८३॥
सत्, चित्, आनंद । ऐशीं हे तीनि पदें; । परि आत्म अनव्हे त्रिविध । येकरूप तो. ॥८४॥
अनृत, जड, दु:खात्मक । प्रपंच हा देख; । याच्या व्यावृत्तीनें सच्चित्सुख । आत्मा प्रतिपादिला. ॥८५॥
प्रपंच अनित्य, कल्पित; । आत्मा काळत्रयीं अबाधित; । येक असे शास्वत, । यास्तव सद्रूप म्हणिजे. ॥८६॥
जग जड हें ज्ञानरहित । नेणे आणिका पैं आपणातें. । जडव्यावृत्तीनें आत्मयातें । म्हणती चिद्रूप. ॥८७॥
सर्व दु:खांचिये समाप्ती । आनंदमय आत्मा प्रतिपादिती; । परि हे तीनि नामें नव्हती । आत्मयाचीं. ॥८८॥
स्वजातीय, विजातीय, स्वगत, । भेदत्रयरहित । परब्रह्म निश्चित । स्वानुभवें तूं. ॥८९॥ तुझे प्रश्न अघवे ।
 सांगीतले तुज बरवे; । आतां मनीं न धरावे । संशय कांहीं. ” ॥९०॥
ऐसें परिसूनि गुरुवचन । शिष्यें केलें साष्टांग नमन. । मग कर जोडूनियां स्तवन । मांडिलें प्रेमें. ॥९१॥
“ अविद्येचिये निदे । वोसणत होतों अहंममशब्दें; । तो मी चेवविला स्वानंदें, । कृपानिधि. ॥९२॥
गेले संशयविपर्यय; । आत्मा  अज, अव्यय, । जाणितला अद्वय; । हा प्रसाद तुझा. ॥९३॥
जयातें वर्णितां, श्रुति । ‘ नेति, नेति’ म्हणौनि मौनावती, । तें ब्रह्मचि मी; ऐशी प्रतीति । आली मज. ॥९४॥
पाहतां कल्पितभूषण । दिसे एकचि सुवर्ण; । तेंवि विलोकितां जग संपूर्ण । परमात्मा असे. ॥९५॥
मीचि परमात्मा, ईश्वर; । मीचि झालों चराचर; । मजविना कांहीं दुसरें । नाहीं वस्तु. ॥९६॥
श्रीगुरुप्रसादें । पावे साधक आत्मपद, । येविषयीं विवाद । कांहीं नाहीं. ॥९७॥
श्रीगुरूचें महिमान । न वर्णवे वचनें; । म्हणौनि मियां नमन । केलें येकभावें. ” ॥९८॥
ऐशी प्रश्नोत्तरमालिका । गुंफिली यथामति, देखा. । समर्पूनि श्रीगुरुपादुकां । पूजूं भावें. ॥९९॥
नाहीं मज पांडित्य, । आणि न कळेचि साहित्य; । संती कृपेनें अगत्य । न्यून तें पूर्ण करावें. ॥१००॥
आश्रित दुबळाचिये प्रस्तीं । वेंचिजे पदरींचें धन श्रीमंतीं, । तेंवि कृपा करावी संतीं, । वीरेश्वर विनवितुसे. ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP