मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
पुंडलीकचरित्र

पुंडलीकचरित्र

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


पायकी करि सुखें पितरांची, । चाड जो न धरुनी इतरांची, ।
देउनी हरि अभीष्ट वरातें । तोषवी सतत त्या नृवरातें. ॥१
पूर्वीं ब्राह्मण पुंडलीक म्हणुनी नामाथिला जो भला,
होता पावनभूमि पंढरपुरी, विद्वद्रणीं शोभला. ।
पूजी दैवतबुद्धिनें स्वपितरां सानंद कालत्रयीं.
मानी तद्वचन प्रमाण अवघ्या कार्यीं, जशी कीं त्रयी. ॥२
कोणी एक दिसीं विधातृसुत तो योगीश, भक्ताग्रणी,
गेला त्या यमुनातटा, हरि असे जेथें उभा गोगणीं. ।
त्यातें कृष्ण पुसे हळूच विनयें, '' आलासि कां, पावना ? ''
तो बोले मग, “ दर्शनार्थ तुझिया आलों, जगज्जीवना. ॥३
पथीं देखिला पुंडलीक, द्विजाती, । जया पाहतां पातकें सर्व जाती. ।
करी मायबापांचिया पूजनातें; । न लेखीच देवा तथा याजनातें. ॥४
तयाची कशी भक्ति ते, देवराया ? । तुवां शीर्घ यावें परीक्षा कराया. ” ।
म्हणे कृष्ण हांसोनि “ आतां चला, हो. । घडे आजि आम्हांसि सत्संगलाहो. ॥५
गोगोपवृंदसमवेत तया मुनीतें । आला पुढें करुनि भीमरथी धुनीतें ।
तीच्या तटीं तरुतळीं हरि, चिद्विलासी, । थोपी स्ववत्सकळपांसि, तथा मुलांसी. ॥६
तो सतोष मुरली मग वाजवी, । मंजुळ ध्वनिभरें नभ गाजवी. ।
लोक तेथिल समस्तहि तेधवां । येउनी द्रुत विलोकिति माधवा. ॥७
नमस्कारुनी सर्व ठेले पुढारीं. । नेसे पंढरीमाजि कोण्ही बिढारीं. ।
न देखोनि त्या पुंडलीकद्विजातें, । वदे तैं ऋषी श्रीखगेशध्वजातें. ॥८
“ पित्याहूनि तो श्रेष्ठ कोणा न मानी । पिता तूं जगाचा स्वभक्ताभिमानी. ।
गृहा जाउनी युक्तिनें, वासुदेवा, । विलोकीं, परीक्षीं तया भूमिदेवा. ” ॥९
मोदें नारदवाक्य ऐकुनि, तदा श्रीकृष्ण गोपांप्रति,
“ गाइ चारित सावधान अवघे येथें असा संप्रति; । ”
ऐसें बोधुनि चालिला ऋषिसवें, तो पावला त्या क्षणीं
विप्राच्या सदनासि, नित्य रत जोसद्भक्तसंरक्षणीं. ॥१०
उभा ठाकला अंगणीं दीनबंधू. । पुढें जाउनी तो ऋषी ज्ञानसिंधू ।
कथी पुंडलीकासि वृत्तांत सारा. । “ विलोकीं ” म्हणे आदरें, “ वेदसारा. ॥११
परब्रह्म जें बोलिजे पैं श्रुतीनें । निराकार, तें या मनुष्याकृतीनें ।
स्वमायाविलासें असे व्यक्त, पाहीं. । तुझ्या भक्तिनें यासि जाली कृपाही. ” ॥१२
“ अगा, मायबापांविना देव नाहीं. । दुजा तो न मानेचि माझ्या मनाही. ।
जगीं मायबापां म्हनोनीच लोकीं । सदा प्रार्थिजे दैवतांतें, विलोकीं. ॥१३
हो ‘ मातृदेव, पितृदेव ’ म्हणौनि वेदीं । कीं बोलिलें. कवण, गा, तुजला निवेदी ? ।
देवर्षि तूं विबुधवंद्यहि, बोधराशी; । मी बाळ काय विनवूं तुज ईश्वरासी ? ” ॥१४
पिता तैं वदे आदरें नदंनातें. । “ हरीला समर्पीं बसूं आसनातें. ।
सुतें टाकिली इष्टका येक भारी. । उभा राहिला तीवरी कैटभारी. ॥१५
म्हणे लोक तैं. “ धीटता काय याची ? । पहा ईट हे पाय घांसावयाची ।
बसूं दीधली निर्भयें या द्विजानें. । अहो, मानिली तुष्टचित्तें अजानें. ” ॥१६
उभा वाड वेळ प्रभू त्या समाजीं. । महाबाहु ठेवी करद्वंद्व माजीं. ।
द्विजें आपुली फार केली उपेक्षा, । तर्‍ही तो धरी दर्शनाची अपेक्षा. ॥१७
सोळा प्रकारें पितृपूजनातें । सारोनि, तो आंवरुनी मनातें, ।
यानंतरें येउनि माधवातें । वंदी, तसा त्या विधिसंभवातें. ॥१८
भावें जोडुनि हात, ठाकुनि उभा, विज्ञापना तैं करी.
“ पूजा श्रीगुरुची करीत असतां आलासि तूं लौकरी. ।
होतां पूजन सर्वही लगबगें आलों तुझ्या संनिधीं.
केला म्यां अपराध; तूं तरि नतत्राता कृपांभोनिधी. ॥१९
जसें सौख्यद प्राणिमात्रासि पाणी, । तसा शत्रुमित्रांसि तूं चक्रपाणी. ।
करावी क्षमा, वंदितों पद्मनाभा. । कृपे आजि मातें निरीक्षीं, घनाभा. ” ॥२०
असें आदरें प्रार्थितां पुंडलीकें, । गुरूपासि, सत्साधनीं निर्व्यलीकें, ।
म्हणे तोषुनी कृष्ण त्या भूसुरातें. । “ अगा, माग; देतों अभीष्टा वरातें. ” ॥२१
“ कृपासागरा, ऐहिकामुष्मिकांची । नसे कामना, देहगेहादिकांची. ।
पुरे पूर्वपुण्येंचि नेत्रांबुजांला । तुझ्या दर्शनाचा महालाभ जाला. ” ॥२२
म्हणे नारद “ ब्राह्मणा, माग कांहीं. । मला तोष वाटे, जगन्नायकाही. ।
जयाच्या प्रसादासि हे देव सारे । सदा वांछिती, तूं न घेसी कसा, रे ? ” ॥२३
मनीं जाणुनी नीट देवाशयातें । वदे आदरें, जोडुनी तो शयांतें. ।
“ मुकुंदा, करीं आपुली मात साची. । उभा तूं जसा येथ, राहीं तसाची. ॥२४
तुझ्या दर्शनें पंडितां, पामरांसी । घडो मुक्ति देहावसानीं नरांसी. ।
वरी नामसंकीर्तनीं बुद्धि राहो. । स्वरूपानुसंधानयोगीं स्थिरा हो. ” ॥२५
“ जैसें तूं वदलासि, तेंवि अवघें होईल येथें पुरीं.
जा आतां जनकासमीप. फळली त्वभक्तिवल्ली पुरी. ” ।
ऐसी ऐकुनि माधवोक्ति मग तो संतुष्ट आला गृहा.
जाला पात्र अपार पूर्वसुकृतें त्या ईश्वरानुग्रहा. ॥२६
मूढांसही देउनि आत्मबोधा । तारी हरी, नासुनि जन्मबंधा. ।
याकारणें विठ्ठल नाम त्याचें । जालें, पहा, हो, त्रिजगत्पित्याचें. ॥२७
भक्तत्राणालागिं ज्या विठ्ठलानें । केला क्षेत्रां वास सद्वत्सलानें, ।
तो पैं कर्ता जंगमस्थावरांचा, । त्राता, स्वामी, तोचि वीरेश्वराचा. ॥२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP