मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
उद्धवचिद्धन

संतमालिका - उद्धवचिद्धन

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


ॐनमो सद्गुरु चिद्घन । गणेश सारजा रूप आपण । भक्तमालिका स्मरण । करो ह्मणून आठविले ॥१॥
तरी आठवाचाही आठव । स्वयंप्रकाश गुरुदेव । हें जाणोनिया स्वयमेव । बोले गौरव शब्दांचे ॥२॥
एरव्हीं संपूर्ण अंबरी । मघे वर्षति पृथ्वीवरी । धारा वर्षति त्यांच्या सरी । कैशापरी मोजाव्या ॥३॥
जंव होय नृषा हरण । तंव चातक करी धारापान । तैसे हरिभक्तांचें स्मरण । किंचित् करी यथामती ॥४॥
करितां भक्तांचें स्मरण । स्वयें तद्रूप होई जे आपण ॥जैसें हरिं ब्रीद संपूर्ण । श्रवणीं ऐकोनि बोलतसे ॥५॥
मुळीं ब्रह्मा भक्त थोर । तयालागीं हंस अवतार । सनक, सनंदन, सनत्कुमार, । भक्त अंतरंग हरीचे ॥६॥
आदिनाथ शंकरयोगी, । जो निजपदीं परम सयोगी । गरुड, शेष, निजांगीं । जाले हरिसंगी तन्मय. ॥७॥
लक्ष्मी करी चरणसेवा । वेद सदा वर्णिती देवा, । सोडूनिया अहंभावा, । निरायेवा झोंबती ॥८॥
ब्रह्मनिष्ठ तो नारद, । जयासि कीर्तनीं अगाध बोध, । तैसाचि तो प्रर्‍हाद, । तुंबर हरीसी आवडता ॥९॥
अढळपदीं ध्रुव निश्चळ, । जो कां उत्तानचरणाचा बाळ । जयापासुनि सृष्टी सकळ । ऋषी तोचि कश्यप; ॥१०॥
आदिकवि व्यास, वाल्मिक, । अंतरनिष्ठ, शुक, शौनक । वसिष्ठ, विश्वामित्रादिक, । कपीलादिक, सप्तर्षि; ॥११॥
अगस्ती, भारद्वाज, गौतम, । अत्री, ऋषिश्रेष्ठ परम; । दत्त, दुर्वास आणि सोम; । जनमेजय नृपनाथ; ॥१२॥
विदेही जनक, परीक्षिनी । हरिश्चंद्रसिभ्री चक्रवर्ती, । रुक्मांगद धर्ममूर्ति, । जयाची कीर्ती सत्यनिष्ठ; ॥१३॥
मयूरध्वज श्रियाळ, । अंबरीषादि भूपाळ, । बळीचा जाला द्वारपाळ । स्वयें गोपाळ आपण ॥१४॥
युधिष्ठिरादि धर्ममूर्ति । भक्त प्रेमळ द्रौपदी सती । अनुसूया आणि अरुंधती, । नळदमयंती अहिल्या, ॥१५॥
सावित्री आणि सत्यवती, । सीता, तारा, सरस्वती, । मंदोदरी आणि पार्वती, । वृंदा, भक्तिसेसे तत्पर. ॥१६॥
गणिका बोभायेलि सुकांते । स्मरण घडलें अवचितें । तिसेसे वैकुंठ केलें सरते । निजसुखातें पावली. ॥१७॥
कुब्जा कुरूप दासी, । कामाचारें व्यभिचारासी । गोपिका भोगिती चित्सुखासी, । राजविलासी हरिरूपा ॥१८॥
वेणुनादें तल्लीन गाई । खेळमेळी गोपाळ विदेही । यादव सख्यपणें पाही । हरिपदीं तल्लीन. ॥१९॥
भयभावें तरला कंस, । वैरभावें मोक्ष दैत्यास, । सेवकपणें वानरांस, । जाला वास सच्चित्पदीं. ॥२०॥
भीष्म आणि बिभीषण । हे हरीसी अनन्यशरण, । विदुर भक्तीचें निधान । पृथक वर्ण पूजी हरी. ॥२१॥
देवकी आणि यशोदा । ह्या सदा भजती गोविंदा, । नंद वसुदेव सदा । विष्णुपदा ध्यातसे. ॥२२॥
पराशर पुंडलीक । अक्रूर भक्त सात्विक, । सुदामा सुदेव दारुक । व्याधादिक हरिभक्त ॥२३॥
उद्धव प्रीतिपात्र गहन, । तैसाचि निजसखा अर्जुन । त्यासी उपदेशिलें ब्रह्मज्ञान । गीता व्याख्यान भगवंतें. ॥२४॥
व्यासकृपा संजयासी । गीताश्रवण कुरुवृद्धासी । शिशुपाल करूनि द्वेषासी । हरिरूपासी पावला ॥२५॥
दृढ वैरी राक्षस रावण । स्वरूपीं जाला निमग्न, । कबंध तरले वेधे मन । जे स्मरण करितांचि. ॥२६॥
जडभरत पूर्ण ज्ञानी, । मार्कंडेय श्रेष्ठ मुनि, । जैमिनी कविशिरोमणी, । दास जनीं हनुमंत. ॥२७॥
जयविजय द्वारपाळ, । उपमन्यू ब्राह्मणाचा बाळ ॥दूध मागतां तात्काळ । दिला सकळ क्षीरसिंधू. ॥२८॥
गजेंद्रहस्ती केवळ पशु । नक्रें झोंबितां अतिसायासु । स्वयें येऊनि त्वां परेशु । वैकुंठवासु त्या दोघां. ॥२९॥
भगीरथ भक्तपती । तेणें आणिली भागीरथी, । तारावया त्रिजगती । अगाध कीर्ति जयाची. ॥३०॥
द्विजकुळामाजी चांडाळ । जो बोलिजे अजामीळ, । नारायण स्मरे बाळ । स्मरतां तत्काळ उद्धरला. ॥३१॥
कृतीं, त्रेतीं, द्वापरांत, । पुराणप्रसिद्ध वैष्णवभक्त, ॥आतां झाले कलियुगांत । जगविख्यात, ते ऐका. ॥३२॥
मच्छींद्र, गोरक्ष, गहिनी, । भर्तृहरि पूर्णज्ञानी, । जालंधर महामुनि, । जसवंत, जनीं निजश्रेष्ठ. ॥३३॥
सदानंद, रामानंद, । कबीर, रोहिदास, गोपिचंद, । शंकराचार्य आगाध, । महामुद्रल, भारती. ॥३४॥
पिप्पा आणि जाट धना, । बाजीद पठाण, न्हावी सेना, । बावा आणि नानक सदना, । शाहाहुसेन फकीर, ॥३५॥
सुरदास, नरसी नागर, । हरीसिंग वाणी गुजर, । मुळुकचंद, साळ्या कवीश्वर, । आणि सोनार नरहरी, ॥३६॥
चर्पटी आणि चौरंगी । हरी अगाध प्रसिद्ध जगीं, । मृत्युंजय राजयोगी, । मुधयासंगी परब्रह्म ॥३७॥
चांगदेव, नामदेव, । निवृत्तिदेव, ज्ञानदेव, । हे प्रत्यक्ष देवाधिदेव । सोपानदेव, मुक्ताबाई. ॥३८॥
चैतन्याश्रम हरिहर भारती, । वडबाळ सिद्ध नागेशमूर्ति, । नारायण वेदमूर्ति, । त्रिजगती प्रसिद्ध. ॥३९॥
श्रीधरस्वामि, अच्युताश्रम, । मुकुंदराज भक्तोत्तम, । महामुद्रलभट सप्रेम, । भक्तनिस्सीम, हरीचे. ॥४०॥
जगमित्र नागा, खेचर विसा । गोराकुंभार, बहिरापिसा, । माळी सावता, कमाल कैसा, । आणि परसा भागवत, ॥४१॥
कृष्णंभट याज्ञवल्की, । कृष्णदास मुद्गल, विवेकी, । केशवस्वामी, नामा पाठकीं, । जयासी श्रीमुखें उपदेश. ॥४२॥
परमभक्त चोखामेळ, । जेणें तारिले अंत्यजकुळ, । जोगया, स्वामि गोपाळ । भक्तप्रेमळ कान्हया. ॥४३॥
भानुदास, कूर्मदास, । लोलिंबराज भक्त सुरस, । चांदबोधला, माधवदास, । आणि शेखफरीद, ॥४४॥
एकनाथ, जनार्दन, । मुक्तेश्वर, शाहुसेन, । जयाचेनि स्मरणेंकरून । होती पावन जडजीव. ॥४५॥
नारा, वीठा, गोंदा । नामयाचा सुत महादा, । जयाचेनि संगें गोविंदा, । प्रेम सदा येतसे. ॥४६॥
बापुजी गोसावी महासंत, । निपटनिरंजन जीवन्मुक्त, । साळया रसाळ स्वानंदभरित, प्रेम अद्भुत कीर्तनीं. ॥४७॥
मालोपंत नरहरी, । जयराम शांति निर्विकारी, । नृसिंहसरस्वती मस्करी, । चराचरी हरिभक्त. ॥४८॥
हंसी आणीक कर्माबाई, । राजकन्या मिराबाई, । जनी दासी नामयापायीं, । भक्त नवाई अगाध. ॥४९॥
रेणुकानंदन विठ्याभक्त, । दत्तअनुग्रही दासूपंत, । श्रीपतिदास योगनाथ, । पवाडे प्रसिद्ध जयाचे. ॥५०॥
एकलिंग, मैराळ, सिद्ध; । लिंबराज, शेखमहंमद, दामाजीपंत अगाध, । रोहीदास चर्मक, ॥५१॥
बाया कसाब, जमाल अजगरी, । सजण पठाण, मुकुंद झारेकरी, । राणाई, गोणाई, ममतावा सुंदरी, । गंगाधर, आका, बहिणा ते, ॥५२॥
सुमती आणि कमलाकर, । पद्माकर, शामा कासार, । चिन्मयानंद, बस्वलिंग थोर, । प्रेमळ भक्त हरीचे. ॥५३॥
पूर्णानंद, परमानंद, । भगवंतभट, ब्रह्मानंद, । काशीबा गुरव, आनंदभट अगाध, । आणि सुदेव काईत, ॥५४॥
नरसिम्हमेहता, तुळशीदास, । विठ्ठलपुरंदर, आंतोबा विशेष । कान्होपात्रा पैं नाम तीस । केला वास हरिपदीं. ॥५५॥
जोगा विश्वंभर लीलया, । सच्चिदानंद बाबा, दीक्षित आपया, । भक्तराज पाठक कान्हया, । बंका, दादो पिंजारी, ॥५६॥
लतिबशहा मुसलमान, । रामदास भक्तपूर्ण, । राघवचैतन्य, केशवचैतन्य, । बाबाचैतन्य, तुकोबा. ॥५७॥
केशवराज ज्ञानसागर, । बोधला कुलियुगीं भक्त थोर, । प्रल्हादबाबा, संतोबा पवार । भावार्थपर हरिभक्त. ॥५८॥
गोसावीनंदन, स्वामी वामन, । पंडितराज विख्यात जाण, । गणेशनाथ आणि नारायण । तुकोबाचे निजपुत्र. ॥५९॥
दत्तानुग्रहित परमानंद । तयापासोनि गंभिरानंद । x x x x x x x ब्रह्मानंद निजमूर्ती. ॥६०॥
सच्छिष्य सहजानंद । दत्तानुग्रहित परमानंत । तयाचा भक्त आनंद । पूर्णानंद पूर्णरूप ॥६१॥
चिद्घनांनंद, तन्मयानंद । मुक्तानंद, शिवानंद, । कृष्णानंद, केशवानंद, । अमृतानंद, गुरुदास्य ॥६२॥
अद्वयानंद, उमानंद, । अखंडानंद, परमानंद, । पुंडालकानंद, विश्वानंद । आनंदानंद निजभक्त. ॥६३॥
ऐसे संत भिन्नभिन्न । परि स्वरुपें नारायण । ह्मणोनियां स्मरण । केलें पूर्ण सद्भावें. ॥६४॥
हस्तामल, कविमंगळ, । गोविंदाश्रम नित्य निर्मळ । जगमुनिदास कविकाळ । गोकुळदास पैं आले, ॥६५॥
हेमाडपंत गणेशभक्त । पिशाच्च चैतन्याचे लिखीत । बिभीषण उपदेशी मलुकादास । जो कां बुद्धीपात आणिला. ॥६६॥
भक्तिभावें तपोराज । विद्यानगरी रामदास । कर जोडोनि शामदास । चिंती काज भेटीचे. ॥६७॥
रमावल्लभ निरंतर । काकभट, सादोळकर, । सहजबोध, तिमा जोजार । चिंचवडकर मोरया, ॥६८॥
तिमावड, संतिदास, । महादु, येकनाथ, गोपाळदास, । आकाजी, गोड उदास । चंद्रपुरीं वास जयाचा. ॥६९॥
शिवपंडित, जनपंडित । विद्याधर, रघुनाथपंडित । तान्हाजी अबडकर, अबाभक्त, । मारकीनाथ, लखमाप्पा. ॥७०॥
जैसें सुवर्ण साचार । सुवर्णापासोनि अलंकार । झालिया अनेकीं अनेकाकार । परि ते समग्र सुवर्ण. ॥७१॥
तैसे भक्त भिन्नाभिन्न । परि स्वरूपी एक नारायण । ह्मणोनि तयांचें स्मरण । केलें पूर्ण सद्भावें. ॥७२॥
निर्गुण निराभास । जेथून उद्भवला सर्वप्रकाश । ब्रह्म वैशंपायन ह्मणती ज्यास ॥जो सकळांचा आदिगुरु ॥७३॥
नारायणाचा ब्रह्मा अनुग्रहित । ब्रह्मा अत्री उपदेशित । अत्रीपादप्रसाद । अवधूत दत्तात्रय गहन ॥७४॥
दत्तापासोनि शिवचैतन्य, । गोपाळ, आत्मारामचैतन्य, । तुळसीकृष्न, अद्वैतकृष्ण । चिद्घनचैतन्य, महाराज ॥७५॥
पूर्णचैतन्य, सहजचैतन्य, । तिद्विलासचैतन्य सप्रेम अगाधचैतन्य । महाभक्त, ॥७६॥
अद्वयानंदचैतन्य । नरसिंहचैतन्य । एकलिंगचैतन्य । महाचैतन्य, भक्तराज ॥७७॥
अखंडचैतन्य । कोमळचैतन्य, । विश्वचैतन्य । उल्हासचैतन्य, तत्स्वरूप ॥७८॥
ऐसी अपार भक्तमाळा । जो नित्य घाली हरिचे गळां । तो परम प्रिय गोपाळा । पावे सोहळा भक्तीचा. ॥७९॥
जयांचीं नामें उच्चारितां । भागला शेष त्वरिता । सिणली सरस्वती लिहितां हरिभक्ता न वर्णवे. ॥८०॥
हे भक्तनामावळी । जो नित्य स्मरे प्रात:काळीं । तयाचे पातकांची होय होळी । क्षणमात्रही न लागतां. ॥८१॥
सिद्धी पावती मनोरथ । इच्छिलें तें हरी देत । स्वयें होऊनी नित्य मुक्त । पद शाश्वत पाविजे. ॥८२॥
यालागीं मी हीनदीन । आठवले केले स्मरण । वाचे वदवितां श्रीचिद्घन । झाला निमग्न उद्धव ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP