श्रीकृष्नस्वपदातें ध्याती जे जन, तदीय विपदांतें ।
हरुनी शीघ्र, तयांतें पाळी, देउनि कृपेचि अभयातें. ॥१
पशुपतगादिक जाती श्रीहरिचरणासि शरण जरि जाती; ।
त्यांचें संकट हरितो दीनदयाळू, प्रभू असा हरि तो. ॥२
पूर्वीं वनद्रुमातें आश्रयुनी, ध्यात भक्तिसुगमातें, ।
होता कपोत बरवा; त्याची जाया तशीच मंजुरवा. ॥३
तेथें मांसाहारी आला, हो, भिल्ल, काननविहारी. ।
रुंखावरि दीनातें पाहे तंव तो कपोतमिथुनातें. ॥४
सोडी श्येनखगातें त्यावरि, चापींहि योजुनि खगातें. ।
ठाके लक्षहि धरुनी, दीनपंतगामिषीं स्पृहा धरुनी. ॥५
भ्याला अंत:करणीं व्याधाची खग कळोनियां करणी. ।
बोले देवा स्मरुनी, “ तारीं आम्हां, हरी, कृपा करुनी. ॥६
भूवरि भिल्ल, नभीं तो श्येन असे, त्यांसि पाहुनी भीतो ।
आमुचा जीव. मुरारी, आतां पाळीं कृपे, धृतदरारी. ॥७
नश्वर देह विकारी, मोक्षोपायीं तथापि उपकारी. ।
जावो भगवत्स्मरणें, काळीं न पडो परंतु दुर्मरणें. ॥८
पालन निजदासाचें करणें जें, तें तुझें बिरुद साचें. ।
त्याची विस्मृति पडली, यास्तव आम्हांसि गति असी घडली. ॥९
भवभयसागरपोता, तारीं, कृष्णा, कृपे द्रुत कपोता. ।
आतां प्राण न तगती क्षणभरि. तुजवीण कोण आन गती ? ॥१०
दुर्जनवारणहरिनें दीनखगोक्ती कृपाकरें हरिनें
परिसुनि, संकट सारें हरिलें येक्या क्षणीं, निगमसारें. ॥११
वोढी चापगुणातें भिल्ल बळें जैं, तदीय चरणातें ।
डसला भुजंग सहसा; पडला तो भूवरी अनोकहसा. ॥१२
शबरकरस्थितपत्री सुटला, तेणेंचि गगनगत पत्री, ।
श्येनाभिध तो वधिला तैं वानिति ते कपोत सुखनिधिला. ॥१३
आश्रयुनी नीडा या राहूं अथवा नभांतरिं उडाया ।
होतों भीत, मुकुंदा; तें भय हरिलें तुवांचि सुखकंदा. ॥१४
एवं श्रीहरिनुतितें पारावत ते करोनि, शुभमतितें. ।
लावुनि भगवद्भजनीं, फिरते जाले जनीं तथा विजनीं. ॥१५
ऐसा क्षिप्र करातें देउनि भक्तांचिया प्रकारातें, ।
भयवारिनिधीं तारी वीरेश्वरविभु, अनेकअवतारी. ॥१६