गणेशं शारदां चैव गुरुं संतं नमाम्यहम् ।
तेषां प्रसादेन निर्विध्नं श्लोकार्थश्च प्रकाशित: ॥१॥
जय जय गजवदना । नरदेह मूषकवाहना
कंठीं मिरवे नगबंधना । सरळ सोंड एकदंतु. १
भावें स्मरतां श्रीगणेशु । प्रसन्नत्वें दावी प्रकाशु.
ज्ञानामृतउल्हासु । देता होय. २
साबरी नमिली ते सारजा भवानी । जियेतें वंदिती सुर, ऋषी, मुनी,
वेदगर्भा, अमृतसंजीवनी, । वागीश्वरी, विश्वमाता. ३
स्तवन करितां तुष्टली । जेंवि कामधेनु वो रसें वोळली
जिव्हा आपणचि जाहली । ग्रंथार्थ बोलविती. ४
सवेंचि वंदिजे श्रीगुरु । जेणें मस्तकीं ठेविला अभयकरु,
तो पूर्ण भास्करु । गुरुमूर्ति. ५
संत, सज्जन आणि श्रोतां । आणिक न देखिजे गुरूपरता
स्वयें आपणचि वक्ता । काव्यरस. ६
वंदिजे कवीश्वर महाभाव । वाल्मीक, पराशर, वामदेव,
व्यास, वशिष्ट, शुकदेव । हे कवित्ववाक्यें साहाकारी. ७
यांच्यानि वाक्यसाहाकारें । गर्भगीतार्थ निर्धारें
श्लोकार्थ प्राकृत उत्तरें । बोलिजत असे. ८
तें परिसतां ज्ञानाचें महिमान । सुख पावती संतसज्जन
मुमुक्षु प्रविष्टति ज्ञान । श्रवणमात्रें. ९
भारतामध्यें भगवद्गीता । त्याचे मधिनींची हे गर्भगीता
श्रीकृष्णदेवें बोलिली पार्था । तेचि व्यासें विस्तारिली. १०
येथोनि तो श्लोकारंभु केला, । अर्जुन देवासि पुसता जाला
तेथेंचि कथेचा प्रारंभु केला । टीकेकारणें. ११
अर्जुन उवाच.
पार्थु म्हणे गर्भवास, जरा, मरण । प्राणियांसि व्हावया काय कारण ?
हें चुकवावया प्रयत्न । काय ? तों सांगें, जनार्दना ? १२
भगवानुवाच.
देव म्हणे हे मानव अज्ञानी । देखदेखतां पडले संसारबंधनीं,
आशामोहें गुंतलें प्राणी । शरीरा आणि संपत्तीशी. १३
अर्जुन उवाच.
अर्जुन म्हणे श्रीपती ! । आशा, मोहें बंधनीं पडती,
कोणे प्रकारें हे चुकती । तें सांगिजो जी. १४
देवो म्हणे जे आशा, मोहो संडिती । निस्पृहतेंत वर्तती
निष्कर्म कर्मचि देखती । ते कर्मबंधना वेगळे जाणा. १५
अर्जुन उवाच.
धनंजयो म्हणे गा श्रीहरी ! । काम, क्रोध, मोहो या शरीरीं
मनीं मोहो धरूनी निरंतरीं । कैसियापरी तें कर्म चुकेल ? १६
भगवानुवाच.
श्रीहरि म्हणति ब्रह्माग्नीं पाहीं । प्राणिंयां कर्मीं न लिंपे कांहीं
मन होय निर्मळ देहीं । त्यासि पुनजर्न्म नाहीं. १७
अर्जुन उवाच.
अर्जुन बोले वचनीं । अशुचिशुचिव्रतें आचरोनी
संकल्पविकल्प धरी मनीं । तरी कैसेपरी कर्म नाशेल. १८
भगवानुवाच.
गोविंदे म्हणति श्रीगुरुचिंतनीं वसती । सर्वज्ञ कर्मापासोनि मुक्त होती,
संकल्पविकल्प तत्वता नाशती । मग पुनर्जन्म कैचे. १९
नाना शास्त्र वेदाभ्यास करी, । नाना देवांसी पुजी जर्हीं,
आत्मज्ञानेविण भक्ति करी । त्याचें सर्व कर्म निष्फळ. २०
अनेक क्रियेतें आपदोनी । दान देती सुवर्ण आणि मेदिनी,
परि आत्मज्ञानावांचूनि । मुक्ति नाहीं सर्वथा. २१
कोटी यज्ञ आचरला । गज गोदानें, अश्वशाळा
आत्मज्ञानीं अंतरला । श्रीगुरुप्रसादेविण मुक्ति नाहीं. २२
नाना आचारें शुचि । जटा वाढवी, केश डोइशी,
कर्म, धर्म, इंद्रियें शुची । परि मोक्ष नाहीं आत्मज्ञानेविण. २३
ध्यानधारणीं तत्परु, । मनोनिग्रहीं निर्धारु,
देहदंडणीं नेघे आहारु, । कंदाहारें मोक्ष नाहीं सर्वथा. २४
करी तीर्थयात्रा, भूप्रदक्षिण, । त्रिकाळस्नान, भस्मलेपन,
वल्कलें आणि चर्म परिधान, । आत्मज्ञानेंविण मोक्ष नाहीं. २५
नेमेसी केलिया यज्ञाच्या कोटी; । देव पूजिताहे कंठीं,
सेवी वनें उपवनें दरकुटी । आत्मज्ञानेंविण मोक्षु नाहीं. २६
नग्न असोनि वाचा मौन धरी, । पंचाग्निसाधनें देहदंडन करी
गीत, वाद्य, नृत्य करी परी । तत्वज्ञानेविण मोक्ष नाहीं. २७
हे समस्त बुद्धि मज्जाविकारु । जंव तत्वज्ञानीं नाहीं निर्धारु,
आत्मज्ञानें बुद्धि नव्हतां स्थिरु, । तंव चित्तासि विश्रांति न घडे. २८
श्रीगुरुप्रसादें अभ्यंतर निर्मल जालें, । देहोंद्रियांसी जिंतिलें,
त्याणें मन शुद्धत्व पावलें । काटी तयें काय कारण, २९
अर्जुन उवाच.
अर्जुन म्हणे, अभ्यंतर होय शुद्ध कैसें ? । मनासी सदा अज्ञानपिसें
तो मळ कैसेयानीं निरसे ? । तो उपावो सांगें कृष्णाजी. ३०
भगवानुवाच.
देव म्हणती गा पांडवा । श्रीगुरुवाक्य मनीं धरावा,
ज्ञानाग्नी अखंड चेतवावा । तरी जन्म बंधनापासोनि वेगळा होय. ३१
अर्जुन उवाच.
अर्जुन म्हणे देवा परियेसीं । कर्माकर्म हीं दोन्हीं वीजें प्राणियांसि
या बंधनावेगळा कोणें प्रकारेसी । होइजे तें सांगावें. ३२
भगवानुवाच.
तंव देव म्हणे परियेसीं । ज्ञानयोगें सर्व कर्माकर्म होय आपेसी
योगाभ्यासें शुद्धकरीं आत्मयासी । तेणें अबीज होये. ३३
ऐसा जो योगी सहजानंदु । तयासी नाहीं जन्ममृत्यूचा संबंधु
तयासी नाठवे विधिनिषेधु । तो योगी अबीज जाला. ३४
हे गर्भगीता गीतेचें सार । प्रत्यक्ष मोक्षमंदिर
गुह्याचें गुह्य साचार । तुज सांगितलें ३५
हा गर्भगीतार्थ संपूर्ण । श्लोकारथ प्राकृतवचन
आनंदनंदनें केलें कथन । श्रीगुरु - प्रसादें. ३६
गर्भगीता संपूर्णास्तु । आत्मतत्वनिरूपणं नाम प्रथमोsध्याय: ।