मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
रुक्मिणीस्वयंवर

रुक्मिणीस्वयंवर

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीकृष्ण तो पूरुष, सर्वसाक्षी,
तच्छक्ति भीमतनया, नवसारसाक्षी; ।
ते दंपती प्रथित कारण या प्रपंचा.
वंदूं तयां सतत जाणुनि निष्प्रपंचां. ॥१
प्रकृतिपुरुष भैमीकृष्ण ते पैं अनादि.
करिति नुति तयांची देव पद्मासनादि. ।
सकळ जगहि, देखा,  त्यांविना आन नाहीं.
निगमगुरुमुखें हें जाणिजे सज्जनांहीं. ॥२
परमेश्वर, ही माया  मानवरूपेंचि भूवरि रमाया ।
येकपणें जे होते  जाले भैमीजनार्दन, अहो, ते. ॥३
पूर्वील सोय धरूनी  भैमी हरितें वरी मनीं स्मरुनी; ।
तेचि कथा परिसावी,  सज्जनहो, फार आवडि असावी. ॥४
पूर्वीं भीमक भूप कुंडिनपुरीं होता यशस्वी, बरा,
मोदें ध्यात हृदंबुजीं सतत जो जाणोनि पीतांबरा, ।
ज्याला नंदन पांच, येक दुहिता, लक्ष्मीपरी सुंदरी.
जाया शुद्धमती, प्रमोदभरिता, साध्वी असे मदिरीं. ॥५
विप्रोत्तमीं गुण अनेक जनार्दनाचे
जे वर्णिले स्वसदनीं, अरिमर्दनाचे; ।
त्यांतें नृपें परिसुनी, ‘ निजकन्यकेला
श्रीकृष्ण कांत, ’ दृढ निश्चय हाचि केला. ॥६
रुक्मी ऐकुनि, वासुदेवसुगुणां, जाणोनि पित्राशया,
बोले दुर्मति, धीट तो न धरुनी कांहीं मनीं संशया. ।
“ आभीरार्भक, चोर, जार, हरि जो सारे जगीं जाणती,
त्याला भूपतिनें सुता जरो दिली, तैं कीर्ति हे कोणती ? ॥७
राजासीं जरि सोयरीक करीती राजे, तरी श्लाघ्यता.
येरांसि करितांचि ते जनपदीं जाईल, जी, योग्यता. ।
आतां जो शिशुपाल भूपति, तया मी आणितों बाहुनी;
कन्यादान करूं; मुहूर्त बरवा नेमा तुम्ही पाहुनी. ॥८
ऐसें बोलुनि मागधादि सकलक्ष्मापालकां, बांधवां,
पत्रें कुंकुममंडितें लिहुनियां तो पाठवी तेधवां. ।
आनंदें सकुटुंब कुंडिनपुरा ते पावले लौकरी.
त्यांतें भेटुनि भीमभूपति भला हा आदरातें करी. ॥९
भैमी अग्रजकृत्य ऐकुनि म्हणे,     “ आतां करूं काय मी ?
कैसा तो हरि पावतो मज, जया ध्याती मनीं संयमी ? ।
माझा आशय कोण जाणवुनियां आणील त्या श्रीधरा ? ”
ऐसें चिंतितसे. उगी चहुंकडे पाहे सुबंबाधरा. ॥१०
तदा पाहुनी आप्त विप्रोत्तमातें, । म्हणे त्यासि “ रक्षीं कृपे आजि मातें. ।
बलावोनि आणावया वासुदेवा, । तुवां शीघ्र आतांचि जावें सुदेवा. ” ॥११
लिहुनि निजउदंता, देउनी पत्र हातीं,
हळुच मग म्हणे ते. “ लोक कोणी पहाती ? ।
झडकरि, सखया, जा. घेउनी ये मुकुंदा.
नमिन तव पदांतें, भेटवीं सौख्यकंदा. ॥१२
“ येतों साधुनि कार्य शीघ्र ” म्हणुनी भैमीप्रति बोलिला.
धैर्यें तो मग कांस नीट कसुनी वायूपरी चालिला. ।
वाचे बोलत कृष्णनाम नपवे कांहीं पथीं श्रांतितें.
आला द्वारवतीपुरासि हृदयीं तैं ध्यात चिन्मूर्तितें. ॥१३
हर्म्य, प्रासाद, शाला निरखित नगरीं चालिला तांतडीनें.
गेला श्रीकृष्णगेहा, अळस न करितां, दर्शनीं आवडीनें. ।
तेव्हां शौरी तयातें नमुनि, बसवुनी आसनीं, पूजनातें
भावें नानोपचारी करुनि, सुखवि त्या ब्राह्मणाच्या मनातें. ॥१४
मग पुसे हरि ‘ आगमनाचें । कवण काज, अभीष्ट मनाचें ? ’ ।
विनवि तो द्विज यादवराया, । नतमनोरथपूर्णकरा, या. ॥१५
“ सुमति जे नृपभीमकपुत्रिका । दिधली येक तिनें शुभपत्रिका. ।
समज अर्थ मनीं द्रुत वाचुनी. । तिस रुचे न दुजा तुजवांचुनी. ” ॥१६
करीं घेउनी पत्र वाची मुरारी, । तदा त्यासि रोमांच आंगीं थरारी. ।
मनीं जाणुनी होय ब्झैमी स्वजाया, । करी यत्न तो तीकडे शीघ्र जाया. ॥१७
“ माझा बंध, कुबुद्धि, आणि नृप हे चैद्यादि सारे पुरीं
मातें रक्षिति, निंदिती तुज सदा मोहांध नानापरी. ।
दाटा देउनि जंबुकांसि, ऑपुला ने भाग जैसा हरी,
तैसा शिक्षुनियां नृपांसि मजला नेईं बळें तूं हरी. ॥१८
आप्तांसीं सह अंबिकार्चन करूं बाहेरि मी येतसें.
तूंही त्यासमयींच येइं, न कळे जैसें नृपांला तसें. ।
तैं रक्षोविधिनें वरीं, लगबगें मातें रथीं बैसवीं.
येती भूपति सोडवूं तरि तया शिक्षोनि उल्लासवीं. ” ॥१९
अशी वाचुनी पत्रिका रूक्मिणीची, । मनीं जाणुनी प्रीति योषामणीची, ।
“ नृपां दाखवूं आपुल्या कौतुकातें, ” । म्हणे, तेधवां बाहुनी दारुकातें. ॥२०
“ अगा जावया आजि त्या कुंडिनातें । क्षणामाजि आणीं निजस्यंदनातें. ” ।
शिरीं वंदुनि सूत तो तन्निदेशा, । करी तेंवि तैं येउनी द्वारदेशा. ॥२१
विप्रासवें वळॅंघला हरि तो रथातें, । भैमीचिया पुरवुं सर्व मनोरथातें. ।
आज्ञा विचारुनि सुसारथि योग्य वाहां । हांकी जवें समजुनी प्रभुच्या विवाहा. ॥२२
ते शैव्यादि तुरंग च्यारि बरवे वायूपरी धांवती.
आयासेंविण भीमभूपनगरापाशीं त्वरें पावती. ।
तेव्हां कृष्ण म्हणे मदागमन हें भैमीस सांगावया.
जाईं, भूमिसुरोत्तमा, तुजवरी संतुष्ट ते व्हावया. ॥२३
येरीकडे नृपसुता हरिच्या वियोगें
चिंता करीत असतां, तंव दैवयोगें ।
बाहु स्फुरे, नयनही निजवामभागीं.
मानी मनीं सुखद चिन्हचि तें शुभांगी. ॥२४
देतांचि आज्ञा गरुडध्वजानें । येवोनि सद्मासि तया द्विजानें, ।
भैमीस सारी कथिली प्रवृत्ती; । तोषे तिची ऐकुनि चित्तवृत्ती. ॥२५
गेला रथीं बसुनि एकट चक्रपाणी,
हें ऐकुनी स्वपृतनायुत सीरपाणी ।
आला स्वबंधुनिकटीं. धणि यादवांचा
तोषे मनीं निरखुनी प्रिय जो शिवाचा. ॥२६
तो भीम जाउनि समोर यदूत्तमातें,
विध्युक्त पूजुनि सुहृत्सुखकृत्तमातें, ।
तौर्यत्रिकांसहित आणुनि पत्तनातें,
तेथें तया मिरवुनी, रिझवी जनांतें. ॥२७
तेणें सुंदर मंदिरें वसतिला पैं दावितां पट्टणीं,
बोले कृष्ण, “ यया जनांसि ऑमुच्या होईल, जी, दाटणी. ।
आम्हां ठाव उमालया परिसरीं पूर्वीं असे पाहिला.
ऐसें सांगुनि, येउनी मग पुराबाहेरि तो राहिला. ॥२८
भैमी ते दुसरे दिनीं सुनियमें नाहोनि अंबालया
आली, पाहुनि लोक सर्व म्हणती, ‘ हे होय पद्मालया. ’ ।
चौघे बंधु समागमेंचि तिजला रक्षावया पातले.
कृष्णातें न गणूनियां निजबळें मोहांध ते मातले ! ॥२९
भावें अंबाचर्नातें करुनि, बहुविधें देउनी वायानंतें
विप्रांच्या बायकांला, मग निरखुनियां ते पुढें चिद्घनातें, ।
घाली अंभोजनमाला, वळखुनि बरवें त्याच सर्वोत्तमाला.
तीतेम घेवोनि आला, भ्रमवुनि मग तो सर्व भूपाधमांला. ॥३०
आला भैमीसमेत श्रितसुखद रथीं बैसला कैठभारी.
डंका ठोकोनि, ठेले ‘ जय जय ’ म्हणुनी भृत्य ते शूर भारी. ।
तेथें रुक्मी स्वसेतें तंव न निरखुनी, फार उद्विग्न जाला.
बोले घेवोनि गेला ठकवुनि सहसा केंवि राजाग्रजांला ? ॥३१
जरासंधचैद्यादि राजे प्रतापी । करूं युद्ध आले भले शत्रुतापी. ।
हलीनें, गदें ताडितां बाणजालें । अहो, सैन्य सारें तदा भग्न जालें. ॥३२
राजे होउनि ते पराजित, पुरा गेले महाभीतिनें.
रुक्मी नेणूनि शौर्य, धैर्य हरिचें बोले तदा भ्रांतिनें.
“ या कृष्णासि न जिंकितां स्वनगरा मी सर्वथा जाईना.
भैमीवांचुनि एकलाचि गुरुची मी भेटिही घेइंना. ” ॥३३
ऐशी मौढ्यें प्रतिज्ञा करुनि, मग रथीं बैसुनी, तो निघाला.
आला घालावयाला हरिवरि, महिमा नेणुनी, थोर घाला. ।
ताडी बाणें ललाटीं निरखुनि समरीं गोपिकाकामुकातें.
छेदी शौरी विलासें खरतर विशिखें त्याचिया कार्मुकातें ॥३४
हातीं घेवोनि खङ्ग, द्रुत उतरुनी, धांवतां शौरिपाशीं,
बाणीं खंडोनि खङ्गा, कॅंवळुनि हरिनें बांधुनी त्यासि पाशीं, ।
तच्छीर्षीं पंचचूडा खरतर विशिखें कल्पितां, अग्रजातें
धाकें पाहोनि, भैमी विनवि नमुनियां कांतपादांबुजातें. ॥३५
येणें मनीं न समजोनि तुझ्या प्रभावा,
केले अनेक अपराध, महानुभावा. ।
आतां क्षमा करुनि, सोडुनि बंधनातें,
संतोषवीं सकल आप्तसुहृज्जनांतें. ” ॥३६
“ बापा, बंधन सोयर्‍यांसि करणें नोहें बरें, केशवा.
युक्तायुक्तविवेक टाकुनि, तुवां कीं दाविलें शैशवा. ” ।
ऐसें बोलुनि, सोडुनि नृपसुता, सन्मानुनी, तो हली
सांगे, “ खेद नको करूं, गति अशी दैवें पहा जाहली. ” ॥३७
त्या भैमीसहि बोधुनी बहुपरी, आज्ञापुनी सैनिकां,
श्रीकृष्णासि पुढें करोनि, नगरा तो चालिला, हो, निका. ।
भेरी, दुंदुभि वाजती घनरवें, वाखाणिती भाट ते.
जातां मोदभरें तयांसि गमली थोडीच पैं वाट ते. ॥३८
वार्ता ऐकुनियां पुरस्थ मनुजीं शृंगारिली द्वारका.
तै वैकुंठसमा समस्त विबुधां भासे जनोद्धारका. ।
संलग्नीं नगरीं प्रवेशुनि सुखें आला हरी मंदिरा.
आली तेंवि समागमेंचि सुमुखी ते रुक्मिणी, इंदिरा. ॥३९
गृहास पावतां मुकुंद आणि भीमपुत्रिका,
सतोष शूरपुत्र तो लिहोनि लग्नपत्रिका, ।
सुकुंकुमांकिता, विदर्भभूपतीस तेधवां
ससंप्रदाय पाठवी, समस्त मित्रबांधवां. ॥४०
विलोकितांचि पत्र भीम भूप तुष्ट होउनी
निघे कलत्रपुत्रमित्रबांधवांसि घेउनी. ।
ससैन्य पावला क्षणांत त्याच पुण्यपत्तना.
तसेच सर्व लोकही स्मरोनि त्या चिरंतना. ॥४१
त्यावीर भीमक भूप, सभार्य, यथाविधि नाहुनि, विघ्नहरातें
पूजुनियां, कुलदैवत, मातृगणांप्रति, तेंविच भूमिसुरांतें, ।
भूषवि देउनि दिव्य, सकंचुक, पीतपटादिक भूसुरदारा.
भोजनही करवी; तंव तोषुनि वानिति ते मग त्याच उदारा. ॥४२
तैं दयितेसह तो वसुदेव सनंदन नाहुनि मंगळघोषें,
ऐकुनियां स्वपुरोहित वाक्य करी गणनायकपूजन तोषें. ।
जानुनि शास्त्रविधान, कुलोचित धर्महि, मातृगणार्चन, नांदी ।
सारुनि, जें कुलदैवत त्याप्रति भक्तिपुरस्सर पूजुनि वंदी. ॥४३
भीमनृपें दुसरे दिवसींच यथाविधि पूजुनि यादवराया,
अर्पियली, सहिरन्य जलें स्वसुता द्विजबंधुगणीं सुखदा या. ।
दुंदुभि वाजवुनी त्रिदिवीं सुर वर्षति त्या नगरीं सुमनातें.
नाचति वारवधू, मृदुगानरवें तंव रंजविती सुजनांतें. ॥४४
लग्नाचे बहु सोहळे पुरविले सर्वांसि चारी दिनीं.
साडेही करवोनियां, निरविली त्यां आपुली नंदिनी. ।
तैं मानी कृतकृत्य आपण मनीं तो भीम राजा भला,
बोले तो वसुदेवही, “ स्वसुकृतें सत्संग कीं लाभला. ” ॥४५
ऐसा विवाह जगदादिम दंपतीचा
म्यां वर्णिला निजविलासधृताकृतीचा. ।
हे चिंतितां सुखविती बहुधा मनातें,
वीरेश्वर द्विज म्हणे ‘ परिसा ’ जनांतें. ॥४६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP