मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
मौनी

मौनी

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


वत्सा, सांगतों मी ज्ञान. । ऐकें शुद्ध करोनि मन, । कळेल निजरूप निर्गुण. । विराग, भक्ति दृढ धरीं. ॥१॥
अरे, तूं सच्चिदानंदसाक्षी । वस्तुत: असाक्षी. ॥ध्रु०॥ उठोनि उष:काळीं लौकरी । आत्मविचार सत्वर करीं. । ऑयुष्यु नरतनूचें निर्धारीं । सरतां पावसी भवदु:ख. ॥२॥
तनूचा साक्षी सच्चिद्धन । आत्मा केवळ तूं निर्गुण. । साक्षित्वाची ही निजखूण । विरे तुझीच तुजमाजी. ॥३॥
आधीं साक्षित्व दृढ करूं, । मग या अभिमानातें हरूं । केवळ निर्विकल्प निर्धारु । तेंचि स्वरूप तुझें. ॥४॥
नव्हेसि देहेंद्रियादि मन, । नव्हेसि नरनारी तूं जाण; । आत्मा साक्षी तूं चिद्घन, । जीवही नसशी, शिष्या, तूं. ॥५॥
त्रयदेहादिक पंचकोश । मिथ्या मायिक हें तव दृश्य; । यांचा द्रष्टा तूं अविनाश । प्रत्यगात्मा, कूटस्थ. ॥६॥
प्रत्यगात्मीं जो अहंकार, । टाज्कोनि तोही जड शेजार, । त्यांचा प्रत्यक् तूं निर्धार । प्रत्यगात्मा अतिशुद्ध. ॥७॥
तुझिया सत्तेनें जगत । सत्यासारिखें भासत; । तूं तर सत्याचें सत्य । म्हणूनि सद्रूप तूंचि. ॥८॥
कधीं मी आहे कीं नाहीं, । अशा न पडसी संशयीं. । अखंड अससी अवस्थात्रयीं । म्हणूनि सद्रूप तूंचि. ॥९॥
असत्य देहासि निरसितां । आत्मा अविनाशी तत्वता, । सर्वही काळीं निर्बाधता । म्हणूनि सद्रूप तूचि. ॥१०॥
तुझिया ज्ञानें ज्ञानमय, । देहेंद्रियादि जडमय, । सर्वही भासती हे चिन्मय । म्हणूनि चिद्रूप तूंचि. ॥११॥
नसतां ज्ञानरूप तूं साचें । देहेंद्रियांत ज्ञान कैंचें ? । करिसी भान सर्व जगाचें । म्हणूनि चिद्रूप तूंचि. ॥१२॥
रमणीपुत्रादिक विषय । धनादि तुझ्याचि करितां प्रिय; । तुज तूं प्रिय हा निर्विषय, । म्हणूनि आनंदरूप. ॥१३॥
बाह्यविषयादि खटपट । याचा काळें येतो वीट. । तुझी तुज प्रीति हे अवीट, । म्हणूनि आनंद तूंचि. ॥१४॥
केवळ आनंदस्वरूप, । निद्रेमाजी तू अरूप, । स्पष्टचि वदसी मी सुखरूप । निजलों होतों निवांत. ॥१५॥
जागृती आणि स्वप्नांतही । जे जे आनंद विषयेंद्रियीं, । ते ते तुझांचि लेशें पाहीं । दिसती सर्वही सुखरूप. ॥१६॥
म्हणसी जागरीं दु:खभान, । तो तर बुद्धिधर्म जाण. । बुद्धि निद्रेमाजी लीन । होतां दु:ख तुज नसे. ॥१७॥
ऐशीं तुझीं स्वरूपें तीन, । सच्चित्सुख हें एकचि जाण, । परस्परें नसती भिन्न; । तूंचि अभिन्न एकत्वें. ॥१८॥
सत्ता केवळ ज्ञानरूप, । ज्ञानचि सत्ता हें स्वरूप, । आनंद तोहि तद्रूप । सच्चिद्रूप जाण तूं. ॥१९॥
सत्तेहूनि ज्ञान भिन्न । म्हणतां, सत्तेसि जडपण । ज्ञानीं नसतां सत्ता जाण । नश्वर ज्ञान होईल तें. ॥२०॥
तसेंचि सत्ताज्ञानांहून । सुखही म्हणतां जरि भिन्न । तरि मग दु:खचि सत्ताज्ञान । स्वरूप नश्वर ठरेल. ॥२१॥
म्हणोनि सुखचि ज्ञानसत्ता; । सत्ताज्ञानचि सुखरूपता; । नसे परस्परें भिन्नता । सच्चित्सुखता एकचि तूं. ॥२२॥
ऐसा त्रयरूपीं तूं एक, । ब्रह्मचि सच्चिद्धनसुख देख. । जग हें नामरूपात्मक । मिथ्या विवर्त जाणावा. ॥२३॥
निद्रेमाजी हें जग नाहीं, । तूं तर साक्षी अससी पाहीं. । म्हणोनि विवर्त तुझे ठायीं । जग हें रज्जुसर्पवत्. ॥२४॥
बुद्धिद्वारा प्रपंचभान, । जागरस्वप्नीं हें विज्ञान; । बुद्धि नसतां तूं निर्वाण, । निर्विकल्प निजज्ञान. ॥२५॥
जैसा सुयांस लोहचुंबक । चळवूनि अकर्ता तो देख, । तेसा आत्मा तूंचि एक । अकर्ता चळवूनि बुद्ध्यादि. ॥२६॥
भ्रामक असे अचळ स्थिति. । अपाप सुया त्या चळती । केवळ संनिधानप्राप्ती; । श्रम काय भ्रामका ? ॥२७॥
तैसा तूंचि सच्चिद्घन, । अलिप्त, साक्षी, विलक्षण. । जड हे तुझ्या आश्रयेंकरून । वर्तती सर्वही देहादि. ॥२८॥
बुद्धींद्रियेंचि नानापरी । वर्तती आपुलालां व्यापारीं; । तूं तर साक्षीभूत निर्धारीं । अससी जैं रविरूप. ॥२९॥
शरीरवाचामनेंकरून । जें जें निपजे पापपुण्य, । त्यांचा साक्षी, अकर्ता भिन्न, । भोक्ता तूं कूटस्थ. ॥३०॥
जडवर्गाचें तुजला ज्ञान । म्हणोनि साक्षी हें अभिधान; । द्रव्यनिरासीं साक्षीपण । विरे तुझेंचि तुजमाजी. ॥३१॥
दृश्यापेक्षां हें द्रष्टृत्व, । साक्षीपेक्षां हें साक्षित्व, । दृश्य नसतां मग द्रष्टृत्व । नाम कैंचें तुजलागीं ? ॥३२॥
दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, । ध्येय, ध्याता, तिसरें ध्यान, । त्रिपुटीरहित तूं चिद्घन; । त्रिपुटी मिथ्या मायिक हे. ॥३३॥
माया दृश्यचि जेथें नाहीं, । कैंचें साक्षी मग नामही ? । केवळ निर्विकल्प अक्षय्ती । पूर्ण ब्रह्मचि तूं जाण. ॥३४॥
ज्ञानाज्ञानातीत ज्ञान, । जाणीवनेणीव रहित जाण; । स्वरूपज्ञप्तिमात्र चिद्घन । भूमानंदचि केवळ तूं. ॥३५॥
ऐसें तुझें स्वरूप जान । कथिलें, शिष्या, हें निर्गुण. । तदाकारें बुद्धि, मन । करूनि राहें सर्वदा. ॥३६॥
सदा एकांतीं रहिवास, । विषवत् विषयसुखाचा त्रास, । करूनि कामक्रोधनाश । स्वरूपीं वृत्तिं स्थिर करीं. ॥३७॥
ज्या ज्या विषयीं मन हें धांवे, । त्या त्या साक्षित्वें निरसावें; । मग तें निवांत स्थिरावें । अभ्यासाचें बळ होतां. ॥३८॥
टाकोनि दृष्याचें चिंतन, । स्वरूपीं स्थिर करोनि मन, । निर्वातींचा दीप जाण । तैसा निवांत राहें तूं. ॥३९॥
उथोनि विरमे पूर्ववृत्ति, । जोंवरि अन्य न उठे चित्तीं । मध्यें निवांत सहजस्थिति, । निर्विकल्प, शिष्या, तूं. ॥४०॥
रात्रंदिवस क्षणानें क्षण । करिजे वृतीरहित मन. । दृढतर स्वरूपीं निमग्न । निर्विकल्प असावें. ॥४१॥
अनंतब्रह्मांडांखालती । अनंतब्रह्मांडांवरती । तूंच शिष्या ब्रह्ममूर्ति । व्यापक सर्वही दशदिशा. ॥४२॥
शिष्या निराकार तूं जाण । व्यापक भरलासि परिपूर्ण; । तुजवांचोनि रितें स्थान । नसे अणुमात्र जगीं. ॥४३॥
सागरीं जळ, गारेसीम जळ, । आंत बाहेर तें केवळ; । तैसें ब्रह्मचि तूं निर्मळ, । शिष्या, जगांतरीं पूर्ण. ॥४४॥
ऐसा वृत्तीचा अभ्यास । करितां नित्य हा निदिध्यास, । मग हें पावून ब्रह्मसुखास । होईल परमानंदरूप. ॥४५॥
परमात्मा तोच कळतां, । सर्वही देहाभिमान गळतां, । जिकडे जाईल मन तत्वतां । तिकडे समाधि अद्वैत. ॥४६॥
अखंड ब्रह्माकार मन । केवळ परमानंदघन; । करोनि स्वानंदीं निमग्न । निवांत राहें निजरूपीं. ॥४७॥
मिथ्या औपाधिक संबंध; । जीवेश्वरांसि कैंचा भेद ? । मी, तूं इत्यादि संवाद; । द्वैत कैंचें अद्वैतीं ? ॥४८॥
मिथ्या बंध आणि मुक्ति । विद्या, अविद्या, माया, शक्ति; । अंत:करणीं या वसती. । सत्वासत्वेंकरून. ॥४९॥
अविद्यावृत्तीनें बंधत्व, । विद्यावृत्तीनें साक्षित्व, । शुद्धसत्वीं हें मुक्तत्व, । परि हे नसेचि निजरूपीं. ॥५०॥
बंधमुक्तीसि कारण, । शिष्या, मनचि; तूं हें जाण. । विद्याविद्येचें उत्थान । काळें मनांत होतसे. ॥५१॥
विद्याअविद्यामायावृत्ति । एकाचि द्रवरूपें भासती; । विवेक करितां निमोनि जाती । परमानंदस्वस्वरूपीं. ॥५२॥
बाधित वृत्या देहाभिमान । करोनि प्रारब्धा आधीन, । सांडोनि कुवासना, हें मन । परमानंदीं लावावें. ॥५३॥
पावोनी स्वानंद सुखास, । हरिगुरुभजनीं उल्हास; । श्रवण, मनन, निदिध्यास । केला करिजे हाचि पुन्हा. ॥५४॥
सद्गुरुरघुनाथाचा दास । मौनी सांगतसे तुज खास, । टाकुनि देहबुद्धीचा ध्यास । स्वरूपीं राहें सुस्थिर. ॥ असे, तूं सच्चिदानंदसाक्षी, । वस्तुत: असाक्षी. ॥५५॥
इति श्रीपत्परमहंसपरिब्राजकाचार्यअद्वैतसच्चिदानंदेंद्रसरस्वतीश्रीरघुनाथाचार्यकिंकरमौनीविरचितो लघुबोध:

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP