राधाकृष्णविलास हा परिसतां बाधा भवाची हरे.
साधा साधन हेंचि, मोक्ष बरवा साधावया मोहरे. ।
मेधा श्रीभगवत्पदाब्जयुगळीं वेधावया हे कथा.
ये धांवोनि शमादि संपति घरा वेधा म्हणे हे कथा. ॥ १
विरह बहु हरीचा वाटला भामिनीला.
प्रतिपळहि निखंदी कामुनी यामिनीला. ।
विषसम विषयांतें मानिते गोपजाया.
“ कवण गति करूं, वो, श्रीहरीकोप जाया ? ॥ २
उदार तो आजि उदास कामा, । जो पूरवी कीं निजदासकामा. ।
बाई, न माझा अपराध कांहीं. । पावे हरी तो जड साधकांही. ॥ ३
मजविना पळही न वसे हरी. । कठिण आजि कसा, वद लौकरी. ।
स्मरशरें खुतलें मन, साजणी. । कवण दाखवि शीघ्न सखा, धणी ? ॥ ४
मृदुलतर तनू हे तापसंपप्त जाली.
गति विरहशिखीची होय कैसी विजाली ? ।
झडकरि मज दावीं देव तो वेणुपाणी.
निढळीं नमिन त्याचे पायिंचे रेणु, पाणी. ॥ ५
मलय फणिविखानें माखिला मंद वारा;
मृदुतर तनु माझी पोळवी तो. निवारा. ।
जलधिमधुनि आला इंदु बंधू विखाचा;
क्षणहि, सखि, न सोसे स्पर्श त्याच्या शिखांचा. ॥ ६
मोडा, बाई, मान त्या कोकिळाची. । दावी गोडी केवढी, वो, किळांची. ।
झुंकारें हे भृंग कां, हो, निघाले ? । घालों आले चोरटे थोर घाले. ॥ ७
हुरहुर बहु वाटे, दु:खसंताप दाटे,
गमति मृदुल कां ते पुष्पशय्या सरांटे. ।
मलयज फणिफेनातुल्य हातें शिवेना.
सुरसिक हरिखेना कां, सखे, भेटि देना ? ” ॥ ८
चतुर सखि म्हणे, “ वो राजसे, राजबाळे,
निरखुनि तुज डोळां नित्य गोपाळ भाळे. ।
न कळत जरि कांहीं चूकि जाली असावी,
सकृप कुपित जाला, लोक आश्चर्य भावी. ” ॥ ९
“ मजवरि बहु, बाई, लोभ त्या श्रीहरीचा.
सतत करितसें मी छंद नानापरीचा. ।
न कळत सलगीनें बोलिलें येक कांहीं.
सुरतसमयीं बोली कीजती बायकांहीं. ॥ १०
‘ हें तूझें पदपद्म पद्मज नमी, पद्मालया तें चुरी,
तो तूं पद्मदलायताक्ष मजसीं सद्मीं न होसी दुरी, ।
या त्रैलोक्यततींत शक्य न कहीं त्वद्रूप लक्षावया,
तो तूं म्यां धरिलासि बाहुयुगळीं. मी धन्य कीं, राजया ? ’ ॥ ११
म्यां केलीं वचनें असीं सरसता. हा काय अन्याय, मा ?
शिक्षाया मज वोपिलें, कटकटा ! यालागिं अन्या यमा ? ।
कां पां मारविलें मला सुमशरीं या घोर मारा करीं ?
जा, सांगा, विनवा: प्रफुल्लित फुलीं कीं तूंचि मारा करीं. ” ॥ १२
दूती म्हणे, “ तूज तुझेचि चाळे । आले फळा. काय वदेन बाळे ? ।
सुधानिधी तो, सखि, तूंत लोली; । तशासही या करिसील बोली. ॥ १३
सकाम लोकां प्रमदा, मदासी । दावूनि, । देती श्रम, दामदासी. ।
निष्काम कीं हा हरि कामनेला. । येणें लया सत्वर काम नेला. ॥ १४
ज्याच्या ध्यानें भान नासे भवाचें, । येतें हाता राज्य चिद्वैभवाचें, ।
तो हा शौरी दाखवी लोकलीला. । बोलें ऐशा त्वां, सखे, मोकलीला. ” ॥ १५
“ माझे हे अपराध लक्ष घडले. सांगा, ‘ करावी क्षमा. ’
मातें भेटविं माधवा स्वहृदयीं कीं तो क्षमेची क्षमा. ।
बोलूं काय हरी अपाय ” म्हणुनी सप्रेम पायां पडे.
“ ऐसा लोभ करीं, सुशोभन हरी जैसा भुजीं सांपडे. ” ॥ १६
दूती म्हणे. “ न करिं खेद. जना, वनातें
धुंडोनि आणिन, सखे, सुजनावनातें. ” ।
जे हिंडती त्यजुनियां मद आणि कामा,
त्यां सांपडे हरि जगांत, न आणिकांना. ॥ १७
चतुर चपळचाली चालिली च्यारि वांवें.
तंव पुनरपि बाहे. “ फार, वो, बोधवावें. ।
नमुनि मृदु वदावें, ‘ म्यां नमस्कार केला.
तव अधरमधूची क्षुत्तृषा राधिकेला. ’ ” ॥ १८
दूती वाक्यविशारदा मग वना आली. जशी शारदा.
देखे दृष्टिस नारदादिवरदा, चित्सारसंभारदा, ।
जो उद्दाम, उदार, दासनिकरीं वृंदावनीं, पारदा
ऐसा खेळत, वारि दानवमदा, जो व्योम सद्वारिदा. ॥ १९
तीरीं तें पुलिनें, जलांत नलिनें लक्षोनि लक्षावधी,
आनंदें फुगली, मनांत उगली घेवोनि सद्भावधी. ।
नाहीं ज्यासि दुभाव, तो हरि उभा, गाभा परंज्योतिचा,
साष्टांगें नमिला. त्रिताप शमला. तो ठाव विश्रांतिचा. ॥ २०
ते पद्माकर, ते सुगंध बरवे, ते वोघ, ते वाहिनी,
ते वल्लद्रुइम, तें प्रफुल्लकुसुमें, ते भा जगन्मोहिनी, ।
ते गानध्वनि, ते मनोज्ञ मुरली, ते गोप, त एं गोधनें,
तें वृंदावन, तो मुकुंद नमिला साष्टांग संबोधनें. ॥ २१
“ जी जी कृष्ण, कृपानिधी, कुवलयश्यामा, जिवाच्या जिवा,
तूं सर्वात्मक, सर्वकारण, जगत्साक्षी, शिवाच्या शिवा. ।
तूतें शेष, अशेष वेद, कथितां मंदावले. मी किती
वानूं पामर ? पार नेणति यती, मौनी. मनीं भाविती. ॥ २२
‘ साक्षाद्ब्रह्म; कृतावतार धरिली लीला तनू मानुषी;
हा भूभार हरावया विचरसी, ’ हें व्यास बोले ऋषी. ।
त्या तूझ्या पदपल्लवास जडल्या या बल्लवी बायका.
कामें भोगिति, भोगिभोगशयना, वामा, रमानायका. ॥ २३
असो. हें किती ? फार बोलूं कशाला ? दयेनें तुझ्या भोगभाग्या विशाला. ।
अशांहीवरी कोप कां तां धरावा ? । तुझ्या त्या जगीं; तूं न त्यांला परावा. ॥ २४
त्यांला तूज अभेदभावचि असे. संसारसंगें पडे
मध्यें अंतर कांहिंसें. मग तुझ्या योगें पुन्हां सांपडे. ।
तूझ्या मुख्य दयेसि पात्र ललना. स्वामी, करावी, क्षमा.
राधा त्वद्विरहानळें हुरपळे. मानी बुडाली क्षमा. ॥ २५
तुझ्या वियोगेंच धृती उडाल्या, । तीच्या मतें भूमि, दिशा बुडाल्या, ।
आकाश हें कोसळलें तुटोनी, । तरी हरी कां नुठसी नटोनी ? ॥ २६
विरहजनित तापें बालिका पालि जाली.
वधुहृदयदरी ते कामबाणीं बुजाली. ।
न पुससि मज कोठें, काय आहे कशी, मा ?
तव सदयपणाची जाहली सर्व सीमा. ॥ २७
जे योषिता भव्य लता विजेची, । ते दीसते चंद्रकळा बिजेची. ।
हळू तरी माळ गळां न सोसी, । नमीन मी कृष्ण, अशी असोसी. ॥ २८
कांहीं न जेवीच, विडी न चावी. । तेथें फुलीं सेज कशी रचावी ? ।
तृषा कृशांगी नमनी त्रिलोकीं; । मृषा नव्हे, तीस तुझीच लोकीं. ॥ २९
परिसुनि परमात्मा, पूर्णलीलावतारी,
हृदयिं धरि तियेतें, जेंवि मूढासि तारी. ।
मग हरि करुणेचा सिंधु, तो दीनबंधू,
कर धरुनि तियेचा ऊठिला रामबंधू. ॥ ३०
तों तेथें सदनांत चंद्रवदना राधा सखीची गती
पाहे; तों निजवामलोचन लवे, बाहू स्फुरों लागती, ।
सारी बोलति शोभन ध्वनि, शुभीं शब्दीं शब्दीं वदे कावळा,
“ वाटे येचि घडी सुलाभ; सखिये, भेटे सखा, सांवळा. ” ॥ ३१
पाहों निघाल्या मग शीघ्र आली. । आलीच त्या, धांवति सर्वकाळीं. ।
आलीढ ज्यांचें मन त्या कृपाळीं, । ‘ पाळीं ’ म्हणोनी नमिती कपाळीं. ॥ ३२
पोरी धांवति, पाहती गजगती, गौळी समानाकृती
सौरीनाम नदींत टाकुनि, निघे शौरी विनोदाकृती. ।
मौळी मंडित गुच्छ, सुस्तबकही चौळीं विराजे बरा.
पौळीं फांकति भा, म्हणोनि उडती गौळी धरा अंबरा. ॥ ३३
हा लागला मोहरिमागमातें, । जो कीं न ठावा निगमागमांतें. ।
आला घरा कृष्ण. “ कृतापराधे, । नको करूं तूं स्मरताप, राधे. ” ॥ ३४
आली राधा मंदिरद्वारकेशा. । पाहे डोळां इंदिरेशा, परेशा. ।
खेदें, मोदें, लोचना बाष्प आलें. । हंसा ऐशी फुंदफुंदोनि चाले. ॥ ३५
येऊनि धांवुनि पुढें विमला करानें
तें बाष्प सर्व पुशिलें कमलावरानें. ।
आश्वासिली, कंवळिली बहुधा तयानें,
ज्याचा प्रभाव कथिजे बहु धातयानें. ॥ ३६
हातीं देउनि हात, तो मग तिच्या आला घरा, मंचका.
राधा जोडुनि पाणिपल्लव म्हणे, “ आम्ही न हो वंचका. ।
कां केला मज राग ? सांग सखया. गेली घडी कल्पसी.
त्यद्योगें तरि कल्पकाळगतिही वाटे मला स्वल्पसी. ॥ ३७
सतत तवकथाब्धीमाजि हे बुद्धि नाहो.
विततविषयजाळीं स्वल्प हे शुद्धि नाहो. ।
प्रतिजनमिंहि आम्हां तूंचि व्हावासि नाहो.
अतिशय तरि ऐशी प्रीति माझ्या मना हो. ॥ ३८
ज्याची कृपा भाग्य समस्त वीते, । ज्याच्या पदा वेदसम स्तवीते, ।
ज्या ईश्वराची अनिवार माया, । त्या चित्स्वरुपीं चमके रमाया. ॥ ३९
स्तवुनि, परिपदाब्जीं स्पर्शिले नेत्र दोनी.
मग उगी सरसाक्षी रम्य वाणी वदोनी. ।
तव हृदयिं हरी तो भेटला नेटपाटें.
झडकरि मग तीनें लाविलीं तैं कपाटें. ॥ ४०
सकळहि व्रजनारी बोलती येकमेकां.
नवल करिति मोठें, लावुनी बोट नाका. ।
हरि धरि यवढी हे प्रीति या राधिकेची,
गुणचरित विधीही तो न वर्णूं शकेची. ॥ ४१
नान तपें करुनि यापरि वासुदेवा
ते इंदिरा करि सनातनपादसेवा. ।
त्या धन्य गोपललना ! हरि ज्यांसि वानी.
आनंदनंदन मनीं अति चोज मानी. ॥ ४२