कुलस्वामी माझा त्रिभुवनपती, वेंकटपती;
सदाही सद्भावें सुरमुनि महाभक्त जपती. ।
तुझ्या पायां मी या सतत नमितों, दीनशरण,
प्रभू, पंचक्लेशात्मक भवनिधीमाजि तरणा. ॥१
त्यजोनी वैकुंठा, भुजगगिरिमाथां विलससी,
तथापि त्रैलोक्यीं भरुनि, विभु, संपूर्ण अससी, ।
जनाच्या उद्धारा प्रकटुनि महीमाजि विभवा.
महामाया तूझी अकळ विबुधेंद्रा विधिभवां. ॥२
महालक्ष्मी तूझ्या हृदयकमळीं नित्य निवसे.
तिला विश्रामातें अणिक दुसरें स्थान न वसे. ।
प्रिया तूझ्या ठायीं अचपळ गुणें साचचि रमे,
जिला ब्रह्मेंद्रांच्या सदनिं पळ तेंही न करमे. ॥३
तळींचा जो होता फणिपति महातल्प घडला,
स्वरूपें शैलाच्या तव पदतळीं शीघ्र जडला. ।
नदीस्वामी तीर्थभिध निकट देवोनि विरजा.
हरीते लोकांच्या सकळ कलिसंभावित रजा. ॥४
सदा जे वैकुंठीं हरिजन तुझे मुक्त वसती.
महाद्रीच्या शृंगीं तरुउपलभावें निवसती, ।
तुझ्या संगीं ज्यांतें सतत रमणें, श्रीप्रियकरा,
तयां कंठे कैसें तुजविण पदीं भक्तनिकरा. ॥५
तुझ्या ज्या वीभूती असति अणिमाद्यष्ट, महती,
वसोनी प्राकारीं करिति भजकांच्या श्रमदती. ।
महापीयूषाचा निधि सरस नैवेद्य्पद वी
स्वयें अंगीकारी, सकलजनसौभाग्यपदवी. ॥६
तुझ्या चारी मुक्ती विभुसदन दारींच वसती;
तुझ्या सेवे येती जन सुजन त्यांलाच पुसती ।
ध्वजस्तंभाकारें गरुड निवसे सन्मुख, हरी,
जनाच्या तापातें क्षण न लगतां जो परिहरी. ॥७
महानंदाचा हा कळस झळके गोपुरवरी,
तुझ्या सद्भक्तांतें क्षणिं निरखितां त्यांप्रति वरी. ।
सदा प्राकारत्वें प्रणव घडला साच दिसतो
दिठीं लाहे ज्यातें अमृतमय त्यालाच दिसतो. ॥८
पहा श्वेतद्वीपें धवळ रचिल्या पर्वतशिळा;
नुरे तैं पापाचा मळ निरखितां कुत्सितशिळा. ।
निधी नौही झाले नव दिवस नौरात्र, बरवे,
तदा ब्रह्मा देवांसहित मुनिसंघेंचि मिरवे. ॥९
वनें, पुष्पें, वल्ली, फळ, जळ, असे दिव्य शिखरीं.
सुरीं नाना रूपें धरुनि असिजे हे श्रुति खरी. ।
चहूं वेदीं तूझी अमित महिमा वर्णित दिसे.
पुराणां शास्त्रांतें तुजविण दुजा ठाव न दिसे. ॥१०
रमाकाम्ता तूझी अचळगुनसंपत्ति वदतां
गणाधीशा झाली म्हणती अमळा एकरदता. ।
फणींद्राची जिव्हा चिरुनि धडली दोनि तुकडे.
विधाता चौं तोंडें गणुनि बसला येकिचकडे ॥११
रथोत्साहीं तूझ्या विधिहर करें वेत्रधर ते
सदा सेवेमध्ये असति, विभु, संलग्न पुरते. ।
सुरेंद्राच्या कोटी नमिति मुकुटाचे वर मणी. ॥१२
अनंतब्रह्मांडोदरगत जनां उत्सव घडे,
समस्तांचे दैवें, प्रभु, तव कृपाद्वार उघडे. ।
जगाच्या कल्याणास्तव निघसि तूं दिव्य वहनीं,
सुधासारें दृष्टी भरति वरदायाच अहनी. ॥१३
रथीं जेव्हां, देवा, वळघसि, महावैभवधरा,
विलोकीलोकांहीं अतिशय घडे पीडित धरा. ।
सुरां, मर्त्यां, नागां, मिसळण पडे याच दिवशीं
तदा सानें मोठे म्हणुनि कवणा कोण गिंवसी ? ॥१४
सहस्त्राक्षाचींही नयनकमळें तैं न पुरती; ।
तदा दो नेत्रांच्या लघुतर नरां कै निरखवे ?
न माये ब्रह्मांडीं किति म्हणुनि तैं या हरिखवे. ॥१५
सुरेंद्राच्या वामा वरुषति शिरीं दिव्य सुमनें.
महानंदें गाती चरित भजनी नित्य सुमनें. ।
महावाद्यांचेही गजर सुरगंधर्व करिती.
नटी नाट्यारंभीं अभिनय कळायुक्त धरिती. ॥१६
अशा पुण्योत्साहीं भजति नियमें भक्त तुजला.
यथाशक्ती पूजा करिति; तुळसीपुष्पसुजळां ।
समर्पोनी तूतें, नमिति चरणीं ते तव पदीं.
महामोदें क्रीडा करिति तुजसीं त्यक्तविपदी. ॥१७
महानंदाचा तूं जलधि, सुरशाखी निजजनां;
समस्तांच्या चित्ता करिसि अति उत्साह भजना ।
फळाचा दाता तूं; तव पदिं जया काम निवसे,
तयाच्या हस्तीं तें परम पद संपूर्ण गिंवसे. ॥१८
महायात्रे येथें मिळति धरणीमाजि जितुके
नरांचे नारींचे गण सधन येवोनि तितुके. ।
विचित्रें ते लेणीं विविध वसनें भाषण तसें
समस्तांच्या चित्ता कुतुक परभारें करितसे. ॥१९
ध्वनी वाजेंत्राच्या विलसति पताका, ध्वज किती.
ध्वनी वाजेत्रांच्या सुरपति निशाणासि जिकिती. ।
विमानांच्या दाटी कुतुक निरखूं पाहति सती,
सुरांगंधर्वांच्या अतुळ विभवें ज्या विलसती. ॥२०
त्रयर्स्त्रिशत्कोटी जगतिस वसे तीर्थगणना.
प्रसिद्धत्वें अन्यें न सरति कदा लेखगुणना. ।
समस्तें ते येथें अहिगिरिस सौख्यें निवसती.
स्वपापाच्या नाशा विचरुनि सुमोदें विलसती. ॥२१
समाधी ये स्थानीं सहजचि सुषुप्ती मन लयें
तपें होती येथें करुनि वसतां दिव्य निलयें ।
महापापें तेही घडति सुकृतें भोगसमुदा
घडे, देवा, तूझ्या भुजगशिखरीं कारण मुदा. ॥२२
महाशापें कैसा अजगर घडे तुंबर मुनी ?
पडे शैलीं, दैवें त्रिदिव वलघे तूज नमुने. ।
पहा मोठे मोठे ऋषिवर गुहेंमाजि वसती,
स्वरूपें जे मध्यंदिनइनसमत्वें विलसती. ॥२३
विधि प्रार्थी तूतें, त्रिभुवनविभूतें, सुविनयें
रचीतों मी सारें जग; तदपि मातें यश नये. ।
वृथा जातो माझा श्रम, सकळ ते व्यर्थ मरतां
न जाती मुक्तीतें तव भजन तें नानुसरतां. ॥२४
तयांतें मुक्तीची करिसि घटना स्वल्प सुकृतें,
तदा होती माझीं नियत अवघीं सार्थंक कृतें. ।
अशा या दीनोक्ती परिसुनि, कृपापूर्ण वचनें
तया आज्ञा केली, विधि करित जा लोकरचने. ॥२५
असे माझ्या येथें धरणिवरि हा पन्नगगिरी;
वसेम मीही साक्षात्करुनि बरवी पुण्यनगरी. ।
स्वभावें जे येती नर, तरति पाहोनि मजला.
पदा जाती माझ्या नियत कथितों व्यक्त तुजला. ॥२६
किती पूर्वीं त्वांही त्रिभुवननुता भक्त घडिले !
गिरिशृंगीं आले सकळ निजधामा दवडिले. ।
नसे इच्छा ह्यांतें, तुजविण, निजानंद भुवनीं. ।
प्रभू, वैकुंठींची अभिलषिति हे पुण्य अवनी. ॥२७
स्वजन्मातें कैसे सुर सकळ धिक्कार करिती ?
जरी दीर्घायुष्यें धरिति, अति संपत्ति वरिती. ।
अम्हां नाहीं कैसें जनन घडालें या कलियुगीं
महीपृष्ठीं ? व्यर्थ प्रळय अनुभोगूं प्रतियुगीं. ॥२८
असोनी आम्हांतें वदनकमळीं लंबरसना,
प्रसादाचा यीणें तरि निरखिला काय रस ? ना. ।
नये यीतें; आम्हां कधिं करिल हे मुक्त तरि मा ? ॥२९
असोनी हें नेत्रें शिखिवरसिखंडाक्षसम तें ।
न होती आम्हांतें म्हणति कधिंही सौख्यसम ते.
सुरेज्याच्या वारीं वरि सुमनवर्षें वरखिला. ॥३०
अम्ही स्वर्गीं भोगूं सुख, असुख, संपत्ति. दिस ते
वृथा गेले कैसे ? विषयरसिकां फार दिसते, ।
जवादी, कस्तूरी, घसृनरस, संयुक्त स्नपना
न देखों कीं आम्ही. वर म्हणवितों काय अपणा ? ॥३१
अम्ही नाहीं झालों तृणलघु तरी, काद्रवनगीं.
वृथा वाहूं वोझें मणिखचित जांबूनदनगीं ।
सदा सद्भक्तांच्या पदकमळकिंजल्करजसा
न वाहोनी नेला त्रिदिवपदिंचा जन्म रजसा ॥३२
अम्ही नाहीं प्यालों, मुख असुनि, पादामृतरसा.
कसे सोसूं आतां भवरुज महाघोरतरसा ? ।
‘ हरी, गोविंदा, ’ हें वदुनि करताळी न पिटिली.
जिणों नेणों कैशी जनिमृति अविद्याभ्रपटलीं ? ॥३३
अशा पश्चात्तापें तळमळिति, देवा, अमर ते.
बरे कीं त्यांहोनी तव निकटिंचे दीन नर ते. ।
तुझ्या सन्मूर्तींतें निरखिति सदां दृष्टि भरुनी.
सुरांतें स्वर्गींच्या जिणिति विभवें हास्य करुनी. ॥३४
धरा माथांची ते त्यजुनि, वरि आला फणिपती.
वराहातें शंका प्रबळ गमली तैं, सुरपती. ।
पुन्हा गेली पृथ्वी अधर जरि पाताळभुवनीं,
महा लागे तेव्हां श्रम मजचि, हे भूमिअवनीं. ॥३५
तदां ये श्रीशैलीं; धरणि धरिली अंकफळ कीं.
तुझ्या या सेजारीं बसुनि जग केलें सफळ कीं. ।
तुझ्या तीर्थीं न्हाती, निरखिति तया लोक नयनीं,
तुम्हां ऐसें तेही पहुडति सुखें शेषशयनीं. ॥३६
तुला पाहूं आला मदन अहिशैलीं, प्रभुवरा;
स्वरूपाच्या दर्पे बहुत चढला त्यासि तिवरा ।
तुझ्या रूपा लाजे. त्यजुनि निजदेहा, सुरपती,
अनंगत्वें हिंडे अझुणिवरि लोकीं रतिपती. ॥३७
तुझ्या सौंदर्याची त्रिभुवनिं तुला एक न दिसे.
महालक्ष्मी झाली पदकमळभृंगी मज दिसे. ।
नखीं चंद्रज्योत्स्ना अमित निरखी भ्रांतमनसें.
महानन्दें लोधे; किमपि तिज देहीं स्मरु नसे. ॥३८
पदीं शोभा रातोत्पलदळ तसी कोमलपणें.
दिसे नाना चिन्हें ध्वज, कुलिश, रेखादि टिपणें. ।
प्रवाळाभाटांचा, प्रपद लसती कूर्मसम ते;
नये लोकीं कांहीं अणिक दुसरें यासि समते. ॥३९
बरें घोंटे नीलोत्पलसदृश ते ही विलसती,
स्मराचे तूणाभें अति मृदुल जंघा निवसती. ।
रणन्मंजीरश्री मुनिजन हृदब्जा विकसवी;
जणों सब्दोधें तें मन नियत ठायींच बसवी. ॥४०
उरू केळी दंडोपम; वर नितंबें युत कटी.
महामोलाचा हा पट तदुपरी पीत तकटी. ।
क्कणत्कांचीदामा अमल मणियुक्ता मिरविसी.
तयाची ते शोभा दिसत अमितोदार रविसी. ॥४१
वटाच्या पत्रांची उदर समता, मार्दव, धरी.
सुनिम्नत्वें नाभीर्हद अमृतकूपासि अधरी. ।
सुरोमाळी काळी दिसत बरवी भृंगपटली
विकासें कंजाच्या मज गमत आतांचि सुटली. ॥४२
त्रिरेखा त्या रम्या, त्रिजगउदरीं सीमसरिता
तसी वाटे मातें, त्रिभुवनपती; ध्यान करितां ।
विशालत्वें वक्षस्थळ अवगणी फार गगना. ।
धरी ताराकारें अति धवल त्या मौक्तिकगणा. ॥४३
भुनाचार्ही शाखा विलसति जशा कल्पतरुच्या.
स्वदीप्तीनें केल्या मरकतमणीच्या हतरुच्या. ।
सनाळें तैसीं तें विलसति बरीं पाणिकमळें,
स्वभक्तांतें देती अभयवरदानें सुविमळें. ॥४४
करें एके संज्ञा क्षिंतितळचि वैकुंठ, म्हणुनी.
दुजा दावी भक्तां कटिसम भवाब्धीस करुनी. ।
पुन्हां दों हस्तांनीं धरि अमल दोनी अरिदरी.
त्रिलोकाचीं दु:खें परिहरुनि, घे दीन पदरीं. ॥४५
अनर्घ्यां रत्नांची जडित दृशमुद्रांगदकडीं.
कृता नाना शोभा स्वतनुवरि भागें वरकडीं. ।
पहा, श्रीवत्साचें परम धरिलें भूषण कसें,
जसें फुल्लांभोजीं अणिक दुसरें पद्म विकसे ॥४६
हृदंभोजीं पादांबुज द्विजवराचें विलसलें,
म्हणोनी लक्ष्मीतें पद अचळ तेथें गिंवसलें. ।
वसे जेथें नित्योत्सवयुत सती प्रेमभरितां.
त्यजी चांचल्यातें निधिस मिळतां जेंवि सरिता. ॥४७
त्रिरेखा ते कंठीं जलजवर शोभा वरितसे.
स्वदोर्दंडें लक्ष्मी सदृढ परिरंभें धरितसे. ।
तसा या बंधूच्या सतत निकटीं कौस्तुभ वसे.
सुधाब्धीच्या बाळां वसतिस दुजा ठाव न दिसे. ॥४८
मुखाची तों शोभा मदनशत वोंवाळुनि बरी. ।
सहस्त्राचीं दीपें नियत कुरवंडीस विवरी. ।
म्हणों ये तैं कैसा सम तरि शशी पूर्णवदना, ।
समस्ता शोभेच्या विमलसुखसंपत्तिसदना ? ४९
मुखीं शोभे मंदस्मित; नयन कारुण्य विभवें. ।
कळा चंद्रीं ऐशा नसति म्हणुनी तो अभिभवे. ।
कलंकी तत्रापी करिल समता आस्यकमळा. ।
घडेना, कंजाक्षा सुचति नुपमा आणिक मला. ५०
सुवृत्ताकारें तें परम मुखपंकेरुह दिसे ।
जगीं शोभा कोणी चुबुकवर या साम्य न दिसे. ।
नये त्याही बिंबा तव अधरबिंबासि समता. ।
रदीं कुंद, ज्योत्स्ना, धरि उपमितां ते असमता. ५१
दधि, क्षीरा, मुक्ता, मणि, शशि, सुधा, शंख, धवला, ।
जिणे तूझी मंदस्मितरुचि न कीजेचि नवला. ॥
तिळांच्या पुष्पांची जड असम नासासि उपमा; ।
कळी चांप्याचीही अघड शुकतुंडा अनुपमा. ॥५२
पुराणीं वाखाणी मुनिनयनपद्मासि समता. ।
मला मानेना तें. कमलउपमा ते असमता. ।
तुझ्या नेत्रा भासावरुनि, जड पंकेरुह कसें ? ।
जगीं रूढे इंदीवर म्हणुनि तोषेंचि विकसे. ॥५३
कटाक्षस्नेहें जे अमितजनसंताप निवटी, ।
दिठी, देवा, तूझी सुजनहृदयीं ज्ञानदिवटी. ।
प्रकाशी ऐशी हे अमित महिमा यीसि समता ।
घडेना पद्माची, म्हणुनि न वदें मी अभिमता ॥५४
तुझीं हीं भ्रूयुग्में स्मरधनु असें जे उपमिती ।
कवींतें मी मानी जडमति; नसे त्यां अनुमिती. ।
स्मराच्या मातेतें तुज निरखितां मोह पडिला
मनीं सौंदर्याचा मद अमित होता, विघडला, ॥५५
विशाळा या भाळीं मृगमदटिळा भूषित दिसे.
यया लोकीं यातें अणिक उपमा साच न दिसे. ।
मुखेंदू हा तूझा अमल असतां, श्रीप्रियकरा,
कळंकत्वें शोभे तिलक जनिता तोषनिकरा. ॥५६
बरे माथांचे हे कुरळ अळिमाळा कृति, पहा.
मुखाब्जीं हे तूझ्या विलसति, रमा मानअपहा.
श्रुतीं सद्रत्नांचीं मकरनिभ तें कुंडलयुगें;
प्रभा गल्लद्वंद्वीं प्रकट करिएती तें अनुयुगें. ॥५७
किरीटज्योत्स्ना ते अमित शशिसूर्यासम गमे.
विचित्रां रत्नांनीं जडित रचिलें काय निगमें. ।
समस्तां वेदांतीं अति अमल जें तत्व विलसे,
मिसें या माथांचे मुकुट घडुनी फारचि लसे. ॥५८
प्रभा देहीं नीळी गगनजलदाभें प्रकटली,
तमाळाची इंद्रोपलकुमुदभा जेंवि नटली; ।
तथापी जे साजे मणिपदकदीप्ती सुललिता,
घनीं जैशी शोभे परम चपला ते प्रचलिता. ॥५९
समस्तां सौंदर्या, विभु, तव वपू आस्पद असे.
विलोकूं प्रत्यक्षें कथिति सुरवागीश्वर असें. ।
तुझ्या नाना क्रीडा करिती जगसंमोहन, परी
अरूपी तूं रूपा धरिसि नट तैसा बहुपरी ॥६०
तुझ्या कोणा कांहीं कळल, न घडे, अंत सुरसा;
पहावें तों मायारहित दिससी रम्य अरसा. ।
तुझ्या ठायीं बिंबें सकळ प्रतिबिंबें विजग हें;
महादशीं जैसें नगर अथ रज्जू भुजग हें. ॥६१
असें, देवा, तूझें स्वरुप अपरिछिन्न विलसे.
तयातें नेणोनी जन जनुभवी दु:खवळसे. ।
तसा मीही देवा भ्रमुनि तव मायागुणवशें,
अनंता जन्मांचे श्रम फळचि घेवोनि, जि, वसें. ॥६२
तुझ्या दासाचा मी न करुनि कसा संग फसलों;
तुझ्या अज्ञानें मीं जनिमरण भोगीत बसलों. ।
अविद्याक्लेशांतें अनुभवितसें नित्य नवसे. ।
ययां कष्टें मातें किमपि तरिही सौख्य न वसे. ॥६३
पुढें आतां, देवा, किति दिवस ऐसेंचि असिजे ?
प्रमोहाच्या तापें तनु निरयकुंडीं बहु सिजे. ।
कृपा तूझी व्हावी तरिच सुटका होइल मला.
न लिंपे अज्ञानोद्भव असुखलेशा कलिमला ॥६४
दयाळू दीनांच्या म्हणुनि स्वपदीं ब्रीद घरिसी;
प्रतिज्ञा हे केव्हां तरि प्रभुवरा साच करिसी ? ।
महापापी आहे. मजहुनि जगीं कोण दुसरा,
जयाच्या अर्थीं तूं करिसि निजवात्सल्यपसरा ? ॥६५
महास्वामी पूर्वीं मजहुनि महापापनिपुणा,
मिसें स्वल्पें त्यातें पर पद दिल्हें तुल्य आपणा. ।
प्रभूजी, माझा कां विसर न कळे आजि पडला ?
न कां मद्भाग्याचा अझुणिवरि ठेवा उघडला ? ॥६६
स्वभक्तांसाठीं तूं कळकळिसि, त्यां कष्ट पडतां;
स्वकर्माच्या भोगें अतितर तयां दु:ख घडतां. ।
त्यजोनी वैकुंठा पळसि लवलांहे क्षितितळा
खगेंद्राच्या खांदीं बसुनि अथवा जासि सुतळा. ॥६७
गजेंद्रासाठीं तूं झडकरुनि आलासि, वरदा.
स्वचक्रें नक्राच्या विदळण करोनी मुखरदा, ।
विमानीं वाहोनी निजपुरिस नेला, प्रभु, तरी
भवाब्धीच्या लोटीं घडसि सुजना तूं सुखतरी. ॥६८
ध्रुवा, बाळासाठीं परम पद निर्माण करुनि,
तया दिल्हें, देवा, अचळ अति वात्सल्य धरुनि. ।
पदा नेली दुष्टा स्तनविषरसा पीउनि बकी
पवित्रा ते केली परम असतां पापझुबकी ॥६९
हरी, तां पांचाळी निरखुनि सभेमाजि उघडी
न लागे तों येसी सजुनि वसनें तें पळघडी. ।
असी तूझी दासीं असुनि, सुरनाथा, अतिदया
उपेक्षावें दीना मज उचित कीं, दिव्यउदया ? ॥७०
लयोदी भक्तार्थीं धरुनि झषरूपें, नरहरी,
हयास्याचा केला वध विहित, जो कां श्रुति हरी. ।
महाबोधें सत्यव्रत नृपतिं तारोनि, सुखदा,
उपेक्षानें मातें ? जगिं घडल हांसें खदखदां ॥७१
समुद्रीं देवांहीं मंथन करितां मंदरगिरी
स्वपृष्ठीं वाहोनि बससि फिरतां तो गिरिंगिरी; ।
अशा कूर्मा तूला नमन. अमृता पाजुनि सुरां
दिल्ही दैत्यें शांतें, कपटयुवती होउनि सुरा. ॥७२
धरा नेली दैत्यें बळ करूनि पाताळ विवरीं,
महाकष्टें ध्यानीं धरुनि विधि तूझें पद वरी; ।
तदा तूं, कंजाक्षा, धरुनि महती सूकरतनू,
वधोनी दुष्टातें क्षिति वसविली तूंचि अतनू. ॥७३
सुभक्ता प्रल्हादास्तव प्रकट खांबांत घडसी,
नृसिंहाकारें तूं कडकडुनि दाढा रगडिसेसे. ।
हिरण्याच्या पोटा चिरुनि निजजनूवरि खळा
बरें केलें देवा, रडति दिनरात्रीं खळखळां. ॥७४
बळीच्या द्वारीं तूं सजुनि बटुवेषें सुरहिता
स्वयें भिक्षा घ्यावी विहित तुज; आशाविरहिता. ।
तयाची पातालीं स्थिति करुनि तद्वार धरिसि,
स्वभक्ताचें ऐसें प्रकट यश लोकांत करिसि. ॥७५
पुरा क्षत्रीं झाले धरणिवरि उन्मत्त विभवें
नव्हे त्यांचें दर्पक्षयकरण शक्रें विधिभवें. ।
तदा धर्मात्मा तूं परशुधर होतां भृगुपती ।
क्षया नेले राजे. बुध विबुध चित्तांत खुपती ॥७६
पित्याच्या आज्ञेनें सहज फिरतां दंडकवनीं,
मिसें या सीतेच्या वधुनि दशतुंडासि अवनीं; ।
तदा केली भाराविरहि; असी कीर्ति पडली
वसे, रामा, लोकीं त्रिभुवनशिरीं हीं प्रकटली. ॥७७
सुरांच्या त्रातारा, क्षितिवरि महाराज्य करितां,
प्रजा सार्या तूझ्या विहरति सदानंद भरितां; ।
समस्तांतें लोभें भरण करुनी, मोक्षपदवी
दिली सर्वां लोकां. श्रुति स्मृति मुखें हेंचि वदवी. ॥७८
महादैत्येंद्रांहीं वसुमतिस राजेश्वरकळीं
स्वसामर्थ्यें होतां, धरणि अति भारें कळकळी. ।
विधी प्रार्थीं तूतें तप करुनि गोब्राह्मणहिता
म्हणे, ‘ धर्मा रक्षीं, वधुनि तमरुपासि अहितां. ’ ॥७९
तदा पृथ्वीपृष्ठीं अवतरुनि तूं, यादवपती,
सुरांचीं सत्कार्यें करुनि रिझवीला सुरपती. ।
स्वकीर्तीच्या नावा रचुनि दिधल्या फार सुजना.
न जावें त्यां लागे भवनिधि तरायासि विजना. ॥८०
तुझी बाळक्रीडा त्रिभुवनजना मोहित करीं;
वसोनी नंदाच्या सदनिं करिसी जे हितकरी. ।
यशोदा आनंदांबुधिं तुज निरीक्षोनि सतता
निमग्ना ते झाली, चरितरसकल्लोलवितता. ॥८१
प्रभू, तूं गोपाळांसह विचरतां गोधनगणीं,
तदा केला दैत्यक्षय अमित; त्या कोण विगणी ? ।
महेंद्रांच्या दर्पा हरुनि धरिला पर्वत करीं.
व्रजाचा कैवारी म्हणविसि महोत्पातनिकरीं. ॥८२
फणी काळा होता दिनकरसुतानिम्नसलिलीं
असेव्या ते झाली अतितर विषोद्गारकलिलीं ।
तयातें दंडोनी अमृतमय केली सुसरिता; ।
अशा लोकीं लीला तुजविण जगीं कोण करिता ? ॥८३
दवाग्नी भक्षावा, कवण असलें हें बळ धरी ? ॥
नसे लोकीं कोणी तुजसह विरोधें छळ धरी. ॥
महाराजे कंसादिक अमित तूझ्या करतळीं ।
विनाशा पावोनी, रणिं पहुडले या क्षितितळीं. ॥८४
कुरुक्षेत्रीं केलें कुरुमथन तां पांडवमिसें,
न दे धर्मा जो कां खळ गिळुनि सद्राज्य अमिसें. ।
सुगीता पार्थातें परम उपदेशासि करुनि,
महापीयूषाची जगिं विरचिली वृष्टि भरुनि ॥८५
क्षितींद्राच्या कन्या हरुनि निजतेजें भुजबळें
समस्तेंही केलीं हतमद महाक्षत्रिय बळें. ।
प्रियेच्या संतोषा सुरतरुसि या मृत्युभुवनीं
प्रतिष्ठा केली, ता जिणुनि सुरवर्गा गृहवनीं. ॥८६
उदारा त्वद्गाथा श्रवण करितां सज्जनवरीं
बसावें वैकुंठीं, म्हणति मन आश्चर्य न वरी ।
जडें, मूढें, तेहीं अमित तरती पामर तरी
पहा, झाली दीना कलिमलजलीं पावन तरी. ॥८७
अहिंसाधर्मातें कलियुगजनां बोध करुनी,
महापाखंडातें मिरविसि परा बुद्धि वरुनी ।
तदां तूझ्या बुद्धाकृतिस भजती लोक समुदें.
न जाणों ये त्यांतें नियत तव मायाच भ्रमु दे ॥८८
महापापें झाला. कलिमय जगीं रूढ, सदया;
नसे तेव्हां लोकीं सुजनसुपथाचार, सुदया; ।
तदा म्लेंच्छप्रायें नर वसति, त्यां पापनिरतां
स्वयें कल्कीरूपें वधिसिल पुढें काळ सरतां. ॥८९
जधीं होतो धर्मक्षय, पथविधीचा बिघडतो,
हरी तेव्हां तेव्हां धरिसि अवतारा उघड तो. ।
पुन्हां स्थापी धर्मा नियतचि. अधर्मक्षयकरी
असी लीला तूझी त्रिजगकलुषा पावन करी. ॥९०
अनंता योगांच्या असति महिमानंतपरिच्या.
अनंतत्वें मूर्ती प्रकटति तुझ्या दिव्य हरिच्या. ।
तयांचीं चारित्रें श्रुतिस वदवेनात तितुकीं
गुणाढ्या जें झालीं कवण कवणासीं मग तुकी ? ॥९१
असा तूं या लोकीं अति महिम, देवा, विलसितां,
जगीं ख्याती तूझ्या हरि करितसे रक्षण सता. ।
पुन्हा कां हे चिंता अमित मज ? जाता, परिहरी.
त्वरें आतां, देवा, विमळ सुख देई नरहरी. ॥९२
सुरांच्या संताना, सुरभि निज दीना तरण कां.
दरिद्रांतें चिंतामणि असुनि, नोहे हरण कां ? ।
विपत्तीअज्ञानोद्भव पर्हरीं पंच कलुषें.
महाकष्टें, दुष्टें, जड, निवटि विज्ञानकुलिशें. ॥९३
तुझी माया आतां करुनि उपसंहार, मजला,
प्रभू, दे सद्भिक्षा; परम पुरुषा, याचित तुला ।
सुवैराग्यें चित्तें तवपदजनी संगति घडो.
तुझ्या भक्तिप्रेमें निजजननसंताप विघडो. ॥९४
तुझ्या रूपीं अंत:करण रत हो काम घसरो.
भवभ्रांतीचा हा परम वळसा सर्वहि सरो. ।
मुरो पायीं माझें मन नमन तूंतें सुरपती -
पतीतोद्धारा तूं गरुडागिरिवासा यदुपती. ॥९५
समस्ता सृष्टीचा नियत करिता, तूंचि धरिता
प्रभू, नाना माया स्रजिसि अति आश्चर्यभरिता. ।
परार्द्धांतीं सारे करुनि निजरूपांत विलया,
चिदानंदा, एका, उरसि जगदानंद लिलया ॥९६
महाभूतीं, भूतीं, प्रकृतिपुरुषीं, तत्वनिवहीं,
तुझ्या ठायीं सवीं प्रकटुनि असावेंचि प्रवहीं. ।
समस्तां जीवांच्या हृदयिं वससी तूं, चितिमया.
तुझीं स्तोत्रें आम्हां करवति किती, जी, श्रुतिमया ? ॥९७
क्षमा कीजे मी जें तुज अमित वाचाळ वदलों.
तुझ्या निंदाव्याजें जरि असन चित्तांत मुदलों, ।
प्रसन्ना दृष्टीनें परम करुणेनें निरखिजे;
जसा देखे मातें मनिंच अपल्या पारम खिजे. ॥९८
क्षमापूर्णा, तूर्णा करुनि करुणा तूं करिं धरीं.
मदीया दैन्यातें परिहरुनि धन्वा करिधरीं. ।
कृपाळा, गोपाळा, दशरथसुता, नंदकुमारा,
असीं नामें वाचे वदर्वि अति दुर्लभ्य अमरां. ॥९९
मुकुंदा, गोविंदा, प्रतिपद असी नामलतिका
मुखीं राहो; गावो तव चरितगाथा महतिका. ।
गुणढ्या, सर्वाढ्या, परम पद सौवर्ण मुखरी
तटीं झालें मातें विदित कथिता वेदमुखरीं. ॥१००
असों द्यावीं आतां, विभु, मजवरी पूर्ण ममता.
विचित्रा या भूतीं मज घडविजे सर्वसमता. ।
महाशांतीचा तूं वर वरद होई निज जना. ।
कृपेनें तूं लावीं निजचरणकल्हार भजना. ॥१
शतश्लोकीं माळा विरचुनि पदें मुक्त समते
पदीं पुण्यश्लोकार्पण करितसें सद्गुरुमतें. ।
प्रसादत्वें यीचें ग्रहण करितां सज्जनवरीं
हरीच्या आज्ञेनें वरिल पुरुषा मुक्तिनवरी. ॥२
मनीं ज्याला आहे त्रिविध पुरुषार्थीं अभिरुचि,
अनायासें पावा, न करुनि महाकष्ट करुचि. ।
सुवाग्रत्नज्योत्स्ना लखलखीत जिव्हाग्रपरळीं.
स्वसंतोषें नीराजन करुनि भावें अविरळीं. ॥३
अहो वाक्पुष्पांजुळि हरिपदाब्जीं क्षितितळीं. ।
घडावें धन्यत्वें सकळ सुजनामाजि विभवें,
तदां तुम्हां बाधा कधिसहि नव्हे या कलिभवें ॥४
हरीच्या भक्तांतें कधिं अशुभवार्ताचि न घडे,
सदा ऐकों कानीं श्रुतिगदित हे बोल उघडे. ।
यशा आयुष्याची धनकनकअन्नें विपुलता;
असो कन्यापुत्रां सहित वितता संततिलता. ॥५
रणीं लाभे त्यातें जय भय न बाधी नृपकुळीं.
असावें तद्वश्यें सकुळ; घडती साच अकुळीं. ।
रिपूंच्या नाशार्थीं पठण करितां, षड्रिपुंसही
जिणे, ऐशी याची अतुळ महिमा हे श्रुतिसही. ॥६
अहो या स्त्रोत्राची वदवल किती दिव्य करणी ?
समस्तां श्लोकीं हे अतिमुखर शोभे शिखरिणी. ।
गुणज्ञानीं घ्यावी तरिच गिंवसे सुद्रुचि यिची.
अभक्तां, मूढांतें, असुखफल देणार रुयिची. ॥७
हा श्रीवेंकटराजसुस्तव असे. सद्भक्ततोषा करी.
दे सज्ञान, विरक्ति, भक्ति, सुजना आनंदरत्नाकरीं ।
ठेवी, नित्य महोत्सवें म्हणुनियां देवाचिये सन्निधी.
सायंप्रात पढोनि नित्य मिळवा त्या अष्टसिद्धी निधी. ॥८
योगी, निरंजन, रमापति, वेंकटेशा ।
स्तोत्रें स्तवोनि भवबंधकरी विनाशा ।
प्रार्थी समस्त सुजनां मम दोष, देवा, ।
टाकोनि सन्निध करा विभु वासुदेवा ॥१०९
इति श्रीमन्निरंजनमाधवयोगीविरचितं श्रीमद्वेंकटेशस्तोत्रम् ।