मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
वीरेश्वरकृत

वीरेश्वरकृत

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीकृष्नस्वपदातें  ध्याती जे जन, तदीय विपदांतें ।
हरुनी शीघ्र, तयांतें  पाळी, देउनि कृपेचि अभयातें. ॥१
पशुपतगादिक जाती  श्रीहरिचरणासि शरण जरि जाती; ।
त्यांचें संकट हरितो  दीनदयाळू, प्रभू असा हरि तो. ॥२
पूर्वीं वनद्रुमातें  आश्रयुनी, ध्यात भक्तिसुगमातें, ।
होता कपोत बरवा;  त्याची जाया तशीच मंजुरवा. ॥३
तेथें मांसाहारी  आला, हो, भिल्ल, काननविहारी. ।
रुंखावरि दीनातें  पाहे तंव तो कपोतमिथुनातें. ॥४
सोडी श्येनखगातें  त्यावरि, चापींहि योजुनि खगातें. ।
ठाके लक्षहि धरुनी,  दीनपंतगामिषीं स्पृहा धरुनी. ॥५
भ्याला अंत:करणीं  व्याधाची खग कळोनियां करणी. ।
बोले देवा स्मरुनी,  “ तारीं आम्हां, हरी, कृपा करुनी. ॥६
भूवरि भिल्ल, नभीं तो  श्येन असे, त्यांसि पाहुनी भीतो ।
आमुचा जीव. मुरारी,  आतां पाळीं कृपे, धृतदरारी. ॥७
नश्वर देह विकारी,  मोक्षोपायीं तथापि उपकारी. ।
जावो भगवत्स्मरणें,  काळीं न पडो परंतु दुर्मरणें. ॥८
पालन निजदासाचें  करणें जें, तें तुझें बिरुद साचें. ।
त्याची विस्मृति पडली,  यास्तव आम्हांसि गति असी घडली. ॥९
भवभयसागरपोता,  तारीं, कृष्णा, कृपे द्रुत कपोता. ।
आतां प्राण न तगती  क्षणभरि. तुजवीण कोण आन गती ? ॥१०
 दुर्जनवारणहरिनें  दीनखगोक्ती कृपाकरें हरिनें
परिसुनि, संकट सारें  हरिलें येक्या क्षणीं, निगमसारें. ॥११
वोढी चापगुणातें  भिल्ल बळें जैं, तदीय चरणातें ।
डसला भुजंग सहसा;  पडला तो भूवरी अनोकहसा. ॥१२
शबरकरस्थितपत्री  सुटला, तेणेंचि गगनगत पत्री, ।
श्येनाभिध तो वधिला  तैं वानिति ते कपोत सुखनिधिला. ॥१३
आश्रयुनी नीडा या  राहूं अथवा नभांतरिं उडाया ।
होतों भीत, मुकुंदा;  तें भय हरिलें तुवांचि सुखकंदा. ॥१४
एवं श्रीहरिनुतितें  पारावत ते करोनि, शुभमतितें. ।
लावुनि भगवद्भजनीं,  फिरते जाले जनीं तथा विजनीं. ॥१५
ऐसा क्षिप्र करातें  देउनि भक्तांचिया प्रकारातें, ।
भयवारिनिधीं तारी  वीरेश्वरविभु, अनेकअवतारी. ॥१६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP