निरीक्षिले म्यां बहु देव, माये; । ते वंदिती सर्व तुझेचि पाय. ॥
सत्कीर्ति तुझी भुवनांत गाजे, । विष्णुप्रिये, सुंदरि, लोकपूज्ये. ॥१॥
वाणी स्तवों काय सकेल तूला ? । उदार तूझी गुणरत्नमाला. ॥
जे शोभवीती निजकंठदेशीं । ते शोभती सर्व जगीं विलासी. ॥२॥
त्यांच्या घरीं सुंदर रत्नशाला । स्थूणामणींच्या रचिता विशाला; ॥
गजाश्वधेनू, धन, दासदासी । देशील तूझ्या करितां जपासी. ॥३॥
माला गळां शोभति त्याजला, गे, । जो दास तूझ्या चरणासि लागे. ॥
तन्मंदिरीं सर्वसुखा दिवाळी । महाकृपे वर्तत नित्यकाळीं. ॥४॥
हंसी तशी सोज्वळ कीर्ति त्याची । विराजते केवळ मानवाची. ॥
तूझें महाद्वार धरोनि राहे, । महत्तमे, मूर्ति तुझीच पाहे, ॥५॥
तयासि ते बाधिल विष्णुमाया । होयीचना; जे भजताति पायां, ॥
तरोनि जाती भवसागरातें । कटाक्षमात्रें भगवत्पदातें. ॥६॥
तयांसि लाभे अतिरूप जाया, । विमुक्ति नाम्नी, अकलंककाया. ॥
विद्याच तूं त्यांप्रति मोक्षधामीं । आनंददात्री घडतेसि लक्ष्मी. ॥७॥
यथार्थ तूं क्षीरसमुद्रबाळा. । प्रसिद्ध तूझी जगतींत लीला. ॥
नरासि देशी अमरत्व, आयी, । येथें म्हणों ये नवलाव कायी ? ॥८॥
आर्द्रा तुझी दृष्टि, सती, विराजे; । सुधा तिला देखुनि फार लाजे. ॥
जरामृती वारुनि भाविकांच्या । मोक्षासि देसी, अमले, त्रिवाचा. ॥९॥
स्वभक्तिमंता घडसील भद्रा. । नोहे तुझी प्राप्ति तया अभद्रा. ॥
म्हणोनि ध्याती तव पादपद्मा. । पद्मालया केवळ सौख्यसद्मा. ॥१०॥
सरोजनेत्रे, शतपत्रपाणी, । प्रेमामृतें जीवविं विश्वखाणी. ॥
वाखाणिती वेद पुराण लीला, । जिणे तुझा दास बळें कळीला. ॥११॥
रामा अनंता असती सुरांच्या, । न पावती त्वन्महिमेसि साच्या. ॥
त्या किंकरी होउनि पाय तूझे । समर्चितां सौख्य तयां विराजे. ॥१२॥
ऋद्धी घरीं होउनि सर्व दासी, । पद्मोद्धवे, सेविति या पदासी. ॥
तुझ्या पदाब्जीं रतले तयांतें । प्रसन्न होसी, हरिसी भयातें. ॥१३॥
उदार ते पावति शुद्ध बुद्धी, । हरिप्रिये, पावती सर्व सिद्धी. ॥
त्वत्पादपंकेरुहभक्ति ज्यातें, । धन्यत्व ये त्याचि महाकुळातें. ॥१४॥
चौदा परीच्या उपजातिवृत्तें, । संप्रार्थिलें म्यां हरिवल्लभेतें. ॥
इंद्रादिसाम्राज्यपदीं उपेक्षा । मानूनि, तूझी धरिली अपेक्षा. ॥१५॥
उपेंद्राराणी, सकलार्थखाणी, । दयार्णवा, फुल्लसरोजपाणी, ।
प्रसन्न होते जरि सुस्तवासी, । पढोवी भक्तोत्तम तो उपासी. ॥१६॥
बनाजी कवी शीकवी सर्व लोकां, । पढा सुस्तवा, विष्णुपत्नी विलोका. ।
इहामुत्र संपत्ति भोगा अनंता; । मिळा मुक्त होऊनि शेखीं अनंता. ॥१७॥
इति श्रीनिरंजनमाधवयोगीविरचित लक्ष्मीस्तोत्र.