श्रीपार्वतीजानिपदांबुजाता । वंदोनि भावें, श्रितपारिजाता, ।
वाहीन मी वाक्सुममालिकेतें, । संतोषिजे जेंवि दयानिकेतें. ॥१
व्यासादिकीं सरसवाक्यसुवर्णमाला । ज्या अर्पिल्या कविवरीं विबुधोत्तमाला, ।
मी द्रोण नीरस सुमांप्रति अर्पितों, कीं । तो देव सर्वसम, जेंवि पिता स्वतोकीं. ॥२
भोळा शंकर तो भवाब्धिं ऑपुल्या भक्तांसि रक्षी, पहा.
साना थोर, विमूढ, सुज्ञ न म्हणे, संसारसंतापहा. ।
भक्तांचें यश वाढवी त्रिभुवनीं दावोनि लीला जनां,
भावें मी स्मरतों निरंतर तया देवा मनोरंजना. ॥३
पूर्वीं ब्राह्मणपुत्र दुष्ट कपटें होवोनियां दंपती
आले, हो, नळराजपौत्रगृहीणीसद्मासि ते दुर्मती. ।
त्यांचें स्त्रीपुरुषत्व तथ्यचि करी पूजोनि सीमंतिनी;
ऐका ते बरवी कथा निजमनीं श्रीशंकरा चिंतुनी. ॥४
पूर्वीं येक पुरीं, विदर्भविषयीं, दोघे द्विजाती भले
होते; पंडित, शांत, दांतहि, सदाचारें बरें शोभले. ।
नामें विश्रुत वेदमित्र, दुसरा सारस्वत क्ष्मातळीं,
ज्यांची मानसवृत्ति निर्मल सदा तत्वोदकें धूतली. ॥५
वेदमित्रसुत जाण सुमेधा । ईश्वरें दिधलि त्यासि सुमेधा. ।
तो पढोनिहि चतुर्दश विद्या । पावला बहु यशा अनवद्या. ॥६
सारस्वतात्मज पढोनि समस्त विद्या, । तो सामवंतहि भजे मग वेदवेद्या. ।
दोघे द्विजार्भक परस्पर मित्रभावें. । येके स्थळीं वसति, बोलति सुस्वभावें. ॥७
त्यांतें देखुनियां गुरू म्हणति तैं, “ बांनो, द्वितीयाश्रमा,
जाणा, हा तुम्हि योग्य काळ; सदनीं राहोनि कां, गा, श्रमां ? ।
आतां जाउनियां, नृपा रिझवुनी, मागूनि आणा धनें.
आम्ही दुर्विध, वृद्ध, यास्तव असीं सांगीतलीं साधनें. ॥८
पितृमुखोद्गतें मंजुभाषणें । करुनियां सुखें कर्णभूषणें,
नमुनि, चालिले भूपपत्तना, । हृदयिं चिंतुनी त्या चिरंतना. ॥९
क्रमुनि मार्ग ते राजमंदिरा । झटिति पावले, जेथ इंदिरा ।
सकळसिद्धिदा नांदते भली, । शिवकृपे बरी पूर्ण शोभली. ॥१०
प्रतीहारिवाक्यें सभेमाजी जातां, । नमी भूप भावें तदंघ्र्यंबुजाता. ।
तदाबैसवी आसनीं त्या द्विजांला. । म्हणे, “ आजि आम्हां महातोष जाला. ” ॥११
आशीर्वाद वदोनि, सर्व ऑपुला वृत्तांत पैं सांगती.
लग्नार्थ द्विज ते नृपासि विनयें वस्त्रें, धनें मागती. ।
होणारापरि बुद्धि दैवगतिनें जाली कसी ते पहा.
मोहें छद्म मनीं धरोनिच करी तो भूप सल्लप हा. ॥१२
बोले नृपाळ, “ महिषी निषधेश्वराची, । भावें मनीं स्मरुनि मूर्ति महेश्वराची, ।
सीमंतिनी करुनि दंपतिपूजनातें । देते अमूल्य पटबूषणगोधनांतें. ॥१३
तुम्ही दंपती होउनी त्याच देशा । सुखें गेलिया, मानुनी मन्निदेशा, ।
महालाभ होईल, संदेह नाहीं; । तदा तोष वाटेल माझ्या मनाही. ” ॥१४
विदर्भाधीशातें द्विज म्हणति ते मानुनि भया,
“ अशा या दुष्कर्में दुरितचि घडे, जाण, उभयां. ।
न चाले भक्तांसीं कपटलव, जें हेतु नरका.
अयोग्या कार्यार्था धरिल धिंवसा सुज्ञ नर कां ? ” ॥१५
रोषें वदे पुनरपि क्षितिप द्विजांतें.
“ मद्वाक्य नाइकिलिया दमितों प्रजांतें. ।
मातें न लेखुनिहि जाल कृतोपकारा,
दावीन मी द्रुत तुम्हांप्रति आजि कारा. ” ॥१६
भ्याले ब्राह्मण, अंगिकारुनि, तदा ते जाहले दंपती.
तो सारस्वतपुत्र होय महिला, तीचा सुमेधा पती. ।
आज्ञा घेउनि चालिले लगबगें चंद्रांगदाच्या पुरा.
मार्गीं चिंतिति कीं मनोरथ कसा होईल तेथें पुरा. ॥१७
ते भीत भीत हृदयीं तरुण द्विजाती.
मार्ग क्रमोनि निषधेंद्रपुरासि जाती. ।
द्वारस्थ येकहि तदा न तयां निवारी:
आज्ञा तसी नृपतिची प्रतिसोमवारीं. ॥१८
भार्येसवें राजगृहीं सुमेधा । भूदेवसंघीं बसुनी स्वमेधा ।
विद्या प्रसंगें कळवी समस्तां. । ते मानुनी हालविती स्वमस्तां. ॥१९
सीमंतिनी मुनियमें मग दंपतीतें । पूजी, मनीं स्मरुनियां गिरिजापतीतें.
दे अर्व्य, पाद्य, शुभचंदन, पुष्पमाला. । वाटे अपार सुख भूमिसुरोत्तमांला. ॥२०
दावोनि धूप मग दीपहि, भोजनातें । प्रत्येक ते करवुनी रिझवी मनातें. ।
तांबूल, वस्त्र, मणिभूषणनिष्कराशी । अर्पी, नमी सुमति, जोडुनियां करांसी. ॥२१
त्यानंतरें कृत्रिम दंपतीतें । पाहोनि, हांसे; समजे मनीं ते. ।
आवाहुनी हैमवतीशिवांतें । पूजी, नमी तत्पदपल्लवांतें. ॥२२
देवोनि भूषणदुकूलधनांसि, देवी
“ जालें समर्पित ” म्हणे मग “ वामदेवीं. ” ।
दे प्रार्थुनी द्विजवरांसि निरोप जाया.
मानी कृतार्थ ऑपणा मसुधेशजाया. ॥२३
सुमेधा स्वमित्रासवें चालिला, हो.
म्हणे, “ जाहला दैवयोगेंचि लाहो. ।
असत्कर्म केलें, अगा सामवंता;
महादु:ख वाटे मना, बुद्धिवंता. ” ॥२४
ऐसा व्याकुळ वेदमित्रसुत तो चाले पुढें काननी,
तेव्हां सामवती, मराळगमना, घामेजली आननीं. ।
ती, पूर्वस्मृति सर्वही विसरुनी, मानी स्वयें कामिनी,
तो भर्ता ऑपुला यथार्थचि; असा उद्बोध तीच्या मनीं. ॥२५
म्हणे, “ वल्लभा, सोडुनी घोर रानीं । पुढें धांवसी. मी तुझी मुख्य राणी. ।
पहा, येतसें एकली, प्राणनाथा. । मनीं जाण तूं त्वद्विना मी अनाथा. ॥२६
लता पुष्पिता भेटुनीयां द्रुमातें । दिसे हांसते कीं विलोकूनि मातें. ।
घनच्छायकुंजीं त्वरें ये रमाया. । नसे अंतरीं, सांग, का तूज माया ? ॥२७
मंद प्रभंजन कसा यमदेशवासी । योषित्प्रभंजनचि मंद मनोभवासी ।
होवोनियां दृढ सहाय, मदीय देहा । पोळीतसे. तुजविना सुख कोण दे हा ? ॥२८
काळा पिकद्विज विलोहितनेत्र, पापी,
बाल्यीं अरिष्टपरिपालित घोररूपी, ।
उन्मत्त, पावुनि मधु स्वर पंचमाचा,
बोलोनि मान हरितो प्रमदोत्तमांचा. ” ॥२९
तें दीन वाक्य परिसोनि म्हणे स्वमित्रा.
“ कां, गा, वृथा भ्रमसि, मधृदयाब्जमित्रा ? ।
तूं कीं युवा, पुरुष, पंडित, सामवंता;
ऐसा विनोद न करीं बहुबुद्धिमंता. '' ॥३०
'' मी अंगना, सामवती; त्वदीया । भार्या; न वाणि लटिकी मदीया. ।
देवोनि आलिंगनचुंबनांतें । संतोषवीं शीघ्र कृपे मनातें. '' ॥३१
सुमेधा तदा स्त्रीत्व त्याचें परीक्षी. । उरोजांबरा आंसुडोनी निरीक्षी. ।
पृथु, स्निग्ध वक्षोजकुंहद्वयातें । विलोकूनि, पावे मनीं तो भयातें. ॥३२
'' हा हा ! कैसें पूंस्त्व गेलें ययाचें ? । आलें स्त्रीत्व, स्थान जेंही भयाचें ?
केलीं कृत्यें केंवि लोकां कथावीं ? । दुःखांभोधीं कीं बुडालों अथावीं. ॥३३
शिवीं भक्ति सीमंतिनीची कळोनी, । महापाप केलें नृपासीं मिळोनी. ।
तयाचें फळ प्राप्त आतांचि जालें. । विधीनें कसें घातलें मोहजाळें. ॥३४
ऐसें ईश्वरकृत्य. येथ न सुचे कांहीं मना संप्रती.
गेह जाउनियां कथूं सकळही वृत्तांत तातांप्रती. ।
ते ज्ञाते करितील यत्न '' म्हणुनी निर्धार ऐसा करी.
सांगे सामवतीस '' काम पुरवूं, ग्रामासि ये लौकरी. '' ॥३५
ऐसें सामवतीस बोधुनि, पुरा आला सुमेधा भला,
जो निष्काम, शमादिसद्गुणगणें विद्वज्जनीं शोभला. ।
भावें वंदुनियां गुरूप्रति, तया तन्मित्रसारस्वता,
बोले, '' दैवबळें आमांसि फळली ते तूमची निस्वता. '' ॥३६
सांगे तदा त्या सकळा उदंता. । ऐकोनि सारस्वत तो स्वदंतां ।
चावोनि, बोले, '' मज दुमतींनें । केला कसा घात महीपतीनें ? ॥३७
'' आतां जाउनि त्यासि शिक्षिन, '' असें बोलोनियां, बांधवा
संगें घेउनि, पावला नृपसभे तो सत्वरें तेधवां. ।
कोपें कांपत भूपतीप्रति म्हणे, '' मत्पुत्र हा नाशिला.
यातें स्त्री करुनी शिरावीर वृथा कां घेतली, रे, शिला ? ॥३८
तुझा दोष, दुष्टा, किती, रे, वदावा ?
असा काय होता तुझा सांग दावा ? ।
तुतें शापुनी जाळितों आजि पाहा.
खरा बोल माझा, नृपा, जाण पां हा. '' ॥३९
परुषवचन ऐसें ऐकुने भूपतीनें,
नमुनि, विनविलें तैं भीतिसर्वाकृतीनें. ।
'' अविहित घडलें हें कर्म माझ्या अदृष्टें.
द्रुत करिं अनुकंपा, पूर्ण होती त्वदिष्टें. ॥४०
वसुनि या पुरीं सर्वमंगळा । सतत देतसे सर्व मंगळा.
नतजनांप्रती रक्षिते, पहा, । शिवकुटुंबिनी हे भयापहा. ॥४१
मजसवें चला अंबिकालया. । व्यसन तूमचें जातसे लया. '' ॥
वदुनि यापरी त्या द्विजांसवें । त्वरित जाइंजे भूमिवासवें. ॥४२
येवोनि तो नृप करी गिरिजार्चनातें, ।
ठेवोनि तच्चरणवारिरिहीं मनातें. ।
प्रार्थोनियां मग म्हणे, '' द्विजनंदनाला
देवोनि पूंस्त्व, जननी, रिझवीं मनाला. ॥४३
केले म्यां अपराद मूढमतिनें; आतां करावी क्षमा.
त्वत्प्राप्तीकरुनी पहा म्हनविते सर्वंसहा हे क्षमा. ।
तूं सच्चित्सुखरूपिणी, श्रुतिनुता, देवी, जगत्साक्षिणी.
मी दीनाहुनि दीन जाणुनि, कृपे दे चित्त मद्रक्षणीं. '' ॥४४
या रीती करित स्तुति त्रिदिन तो राहे महाभक्तिनें;
तेव्हां तोषुनियां रहस्य कथिलें रायासि चिच्छक्तिनें. ।
'' मद्भक्तें कृत कार्य, तें अनृत पैं नोहेचि, गा भूपती.
हे नांदोत महीसुरात्मज सुखें होवोनि जायापती. ॥४५
सारस्वतासि सुत होइल पुण्यराशी. । आतां तुम्ही सकळ जा निजमंदिरासी. '' ।
ऐसें वदोनि गिरिजा मग गुप्त जालीं. । तोषे अपार तंव भूप; तथा द्विजाली. ॥४६
अपार धन देउनी द्विजवरा पुरा पाठवी.
धरापति घरासि येउनि हरा मनीं आठवी. ।
म्हणे, '' शिव निजाश्रिता भवभयांबुधीं तारितो.
तदीय शुभकीर्तितें त्रिभुवनांत विस्तारितो. '' ॥४७
सुमेधासि देवोनियां कन्यकेला । विवाह द्विजेंद्रें यथाशास्त्र केला.
शिवानुग्रहें त्यासि सत्पुत्र जाला. । मनीं तो स्मरे शंभुपादांबुजाला. ॥४८
ऐसें पवित्र शिवभक्तचरित्र भावें । जे कीर्तिती जन, तयांसि निजप्रभावें ।
सरंक्षितो गिरिश पूर्णकृपे, विलोकीं; । वीरेश्वरप्रभु असा प्रथित त्रिलोकीं. ॥४९