शिवाला शक्त्यैक्यें सकळ विभुताशक्ति उघडे;
नसे शक्ती तेव्हां किमपि करणें कार्य न घडे;
असी तूं आराध्या विधिहरिहरेंद्रां भगवती;
प्रणम्या स्तोत्रां ते अकृतसुकृता कोठुनि गती ? १
तुझ्या पादाब्जींचा नमुनि लघु रेणू धरि विधी;
तयाचां सामर्थ्यें रचित भुवनें तो निरवधी;
हरी पाळी त्यांतें दशशतशिरीं तो अहि धरी,
हरक्रोधवेशें भुवनभसितोद्धूलन करी. २
अविद्यांचा अंत:करणतमसूर्योदय करी;
जडला चैतन्येम ग्रथितमकरंदस्रुतिझरी;
दरिद्राला चिंतामणिगुण; भवाब्धी बुडतयां
वराहाची दंष्ट्रा मुरहरिणि उद्धारिणि तयां. ३
विना तूं सर्वांचा अभयवर हस्तीं विलसती;
न होसी तूं तैसी अभयवरहस्ती भगवती.
भयातें टाळाया, अभिलषित वांछाधिकफळा,
शरण्ये,. लोकातें तव चरनिं हे अद्भुत कळा. ४
तुला ध्यातां विष्णु, प्रणतजनसौभाग्यजननी,
स्वयें नारी जाला; सुमुखि, शिवचित्तासि हरुनी.
तसा वंदी भावें मदन अतनुत्वें तव पदा,
मुनींचां हृत्पद्मीं रिघुनि करि मोहाकुळ तदा. ५
धनू तें पुष्पांचें, भ्रमर सित, पंचेषु विलसे,
वसंतें सामंतें,मलयपवनाचा रथ दिसे;
तथापि, श्रीमाता, अनुपमकृपापांग मदना
तुझा जाला, तेणें त्रिभुवनजयी; सौख्यसदना. ६
रणत्करि कांची, करिणिशिशुकुंभ स्तनतटी,
कटी सिंहा ऐसी, शशिमुखि, शरच्चंद्र मुकुटीं;
धनुर्बाणें, पाशांकुश धरुनि हस्ताब्जनिकरीं
पुढें राहो माझा त्रिपुरहरपुंसी शुभकरी. ७
सुधासिंधूमध्यें सुरतरुवनीं वेष्टित मही
मणिद्वीपीं शोभा उपविपिनिं चिम्तामणिगृहीं
शिवाकारीं मंचीं परशिवपलंगीं, सुखकरी,
तुला धन्य ध्याती, अनुपमचिदानंदलहरी ! ८
मही मूळाधारीं, उदक मणिपूरीं, हुतवहें
स्थिति स्वाधिष्ठानीं, हृदिं पवन, आकाश वरि हें;
मना भ्रूमध्यस्था, कमळपथ भेदूनि अससी,
सहस्त्रारांभोजीं विजनिं पतिसंगें विहरसी. ९
सुधाधारासारें चरणकमलांतर्निगलितें
शिरीरा सिंचोनी, उतरसि पुन्हा षट्कमळ तें.
स्वभूमीतें येसी भुजगतनुसाम्यें त्रिवलयें
स्वरूपें तूं निद्रा करिसि कुळकुंडीं, जननिये. १०
शिवा ऊर्ध्वं चारी, शिवयुज्वति पंचाध, विमळे,
प्रभिन्ने शंभूचां नवप्रकृतिमूळात्मकदळे,
त्रिचत्वारिंशास्त्रें वसुदळ पुढें तद्विगुणितें
त्रिवृत्तें भूगेहन्यवनहिपूर्णा चरणे ते. ११
तुझ्या सौंदर्याची, जननि, उपमा या त्रिभुवनीं
कवींद्रां ब्रह्मेंद्रां, अवचनिय, पैं कल्पित मनीं.
पहाया सोत्कंठा सुरवधु मनीं इच्छिति, भवीं
तपाला दु:प्राप्या अससि, शिवसापुज्यपदवी. १२
नराला वृद्धत्वें नयनिं न सिसे, इंद्रिय जडें.
कृपापांगीं, अंबे, अवचट तुझ्या तो जरि पडे,
स्मराभासें त्याला युवति शत धांवोनि धारिती,
सुटे वेणी, नग्न, प्रगट कुचकांचीहि गळती. १३
धरे षट्पंचाशत्, द्वय अधिक पन्नास उदकीं,
द्विषष्ठी अग्नीचे, पवनकर चौपन्न वरि कीं,
नभीं छत्तीसद्वे, भृकुटिगत चौकट बरवे
मयूख; श्री, त्यांचे उपरि तव पादाब्ज मिरवे. १४
शरच्चंद्राभासा, हिमकरजटाजूटनिकरा,
वराभीती चिन्हें, स्फटिकगुटिकापुस्तकधरा,
अशा ध्यानें कोण्ही, जननि, तुज येकेहि दिवसीं
न वंदी; त्यालागीं मधुर कविता होइल कसी ? १५
कवींद्रांचे चित्तीं, कमळवनिं बालार्कसदृशा,
दुजे ध्याती कोण्ही अरुणकिरणा रम्य सुदृशा;
तयाला वाग्देवीचपळतर श्रृंगारलहरी
मुखाब्जें सत्काव्यें प्रकटति बुधा रंजनकरीं. १६
जनित्र्या वाणीचां शशिमणिशरणचंद्रविमळा,
वशिन्यंद्या शक्तीसह, जननि, जो ध्यात तुजला,
करी सत्काव्यें तो मधुमधुकर पद्येम नवरसें,
प्रसादें वाग्देवीवदनकमळामोदसुर सें, १७
तुझी देहच्छाया तरुनरविसाहस्त्रकिरणा
महीआकाशांतीं खचिर निरखी जो द्युतिगुणा,
स्त्रिया वश्यां त्याला बहु हरिणसंत्रस्तनयना,
सहोर्वश्या वश्या, किति किति ग गीर्वानललना ? ॥१८
मुखाकारीं बिंदू, करुनि कुच ते बिंदुयुगळा,
हकारार्धें ध्यातो, भगवति, तुझी मन्मथकळा,
त्वरेनें संमोहें युवति द्वश त्यालागिं सुभगा;
त्रिलोकीलाही तो भ्रमवि रविचन्द्रस्तनयुगा. १९
झरे अंगांगींचे स्रवति किरणें अमृतरसें;
तुला ध्यातां चित्तीं, हिमकरशिळाकांतिसदृशे,
क्षणें तो सर्पांचें विष उतरि, जैसा गरुड कीं;
ज्वरार्ताला दृष्टी सुखकरि सुधाधारच निकी. २०
जशी विद्युल्लेखा रविशशिशिखीं साम्य विलसे,
षडधाराहूनी दशशतदळीं जाऊनि वसे;
कळा ते कामाख्या बहुलतर तेजात्मक मुनी
पहाति स्वानंदें स्वमतिपरमाल्हादजननी. २१
‘ भवानी ! दासातें वितर, करुणे, त्वत्पद मला, ’
असी वांछाअ स्तोत्रीम धरुनि हृदयीं ध्यात तुजला;
तयाला तें देसी निजपद, भवानीत्व सदया,
मुकुंदब्रह्मेंद्रास्फुटमुकुटिं आरार्तिक जया. २२
शिवाच्या वामांगा हरुनि हृदयीं तृप्ति न दिसे,
दुजा अर्धांगाचें परिहरण इच्छा मनिं वसे;
तथा, श्री, त्वद्रूपी प्रकट अरुणाभा त्रिनयना,
स्तनाढ्यें आनम्रा शशिशकलउत्तंसितघना. २३
स्रजी ब्रह्मा, पाळी हरि, सकळ रुद्र क्षय करी,
तिरस्कारें त्यांचे स्वतनु लपवी ईश्वर बरी;
गुणातीतें तेव्हां गुणजनन पैं रक्षुनि शिवें,
तव भ्रभंगाज्ञे विलसत यथापूर्वचि नवें. २४
तुझे पादांभोजीं विधिविहित जो पूजन करी,
तिन्ही देवां पूजा सहज घडली यास्तव बरी;
सदा ते त्वत्पादोद्वहनमणिपीठोज्वलतटीं
रहाती सान्निध्यें नतमुकुटबद्धांजलिपुटीं. २५
विधी पावे मृत्यु, मधुरिपु विरामासि, पुढती
विनाशातें पावे यम, धनपती आणि निरृती.
स्वनेत्रा माहेंद्री उघडुनि पुनर्मीलन करी,
महासंहारीं या तव पति लसे ब्रह्मशिखरीं. २६
मुखें बोलूं तो तो जप; नियममुद्रा करचळें;
प्रदक्षीणा भूमिक्रमण, हवनीं भोजन वळे;
निजा ते साष्टांगप्रणति तुज आत्मार्पणमती;
पुजेचे पर्यायप्रकर सहजें हे विलसती. २७
यथेच्छा श्री दीनाप्रति अनुदिनी जीं वितरिती,
सुगंधें, सौंदर्ये कुसुमनिकरां तुच्छ करिती,
असीं पादांभोजें, सुरतरुसमूहात्मसुखदे,
बुडो तेथें जीवभ्रमर मम षष्ठेंद्रियपदें. २८
जरामृत्युत्रासें सुरवर सुधापान करिती,
तथापी पीयूषा पिउनि विधिइंद्रादि मरती,
विष क्रूर ग्रासी शिव परम हाळाहळसिमा
न सामर्थ्ये त्याचे; जननि, तव सौभाग्यमहिमा. २९
किरीट व्रहृयाचा चुकवुनि पुढें विष्णुमुगुटा
कठोरा उल्लंघीं, अडखळसि देवेंद्रमुगुटा;
प्रणामातें घ्यावें शिव निकट आले “ झडकरी
चलावें सामोरां ” वदति वचनें सेवक बरीं. ३०
सुतंत्रीं चौसष्टीं रचुनि भुवनीं सिद्धि सकळा,
न येकेकें सिद्धी म्हणवुनि हटें शंभु उगला;
पुन्हा त्वत्प्रीतीनें सकळपुरुर्षाथप्रद जनां
स्वतंत्र, श्री, तूझें क्षिति अवतरे सिद्धिघटना. ३१
हकाराद्या विद्या परम अनवद्या त्रिजगतीं,
‘ शिव: शक्ति: काम: क्षिति ’ म्हणुनि मंत्राक्षरगती;
त्रिकूटांतीं, माये, सकळजगदुत्पत्ति मिरवे,
तियेतें हल्लेखा भजति तव देहाकृति, शिवे. ३२
त्रिबीजें कामादि प्रथम, पुढती पंचदशिका,
महामंत्रें ध्याती निरवधि महाभोगरसिका,
जपी माळा चिंतामणिरचित आक्षांत जनिते,
शिवाग्नीचे ठायीं हवन करिती गोधृतशतें. ३३
स्वदेहें तूं शंभू, रविशशिकुचालंकृतवती,
तशा साभिप्रायें शिव वदत मीं शक्ति निगुती.
पवित्रे, तूं तस्मात्परशिवपराशक्ति अससी,
महायोगानंदें उभयतनुसाम्यें विलससी. ३४
मनाकाश स्वांगें अससि पवनाग्नीजळमही;
तुझ्या ठायीं याचा उघड परिणाम, क्रमणही;
स्वकीया रूपाचें सदन परिणाम स्थिरचरीं,
चिदानंदाकारें धरिसि, शिवकांते, शुभकरी. ३५
तुझ्या आज्ञाचक्रीं रविशशिप्रभाही, शशि ( मु ) खी;
शिवा वंदूं तेथें तुजसहित, मंदस्मितमुखी.
असें ध्यातां भक्ती रविशशिहुताशात्मविमळा,
निरालोक्या लोकां अससि भुवनीं तैजसकळा. ३६
विशुद्धीं त्वच्चक्रीं स्फटिकसदृशा व्योमजनका
नमूं शंभू तेथें तव सह समानव्यसनिका.
शशीतुल्या रश्मीं उभयतनुसंभावित जनीं
विधूतांतर्मोहा समुदितचकोरीव भुवनीं. ३७
प्रबोधाचें पंकेरुह हृदयिं सौरभ्य विलसे,
भजों हंसद्वंद्वे मिथुन मुनिहद्गोचर असे;
जयालापें अष्टादशगुणितविद्यावितरणी
गुणप्राप्ती दोषां त्यजुनि जळ घे दुग्ध वरुनी. ३८
स्फुरे नानारत्नाभरणिं धनु माहेंद्रचि जसें;
जयाचे शक्तीनें द्रुत हरति मोहांधतमसें;
दशार्णाब्जस्था त्या नमुनि जलदश्यातमनुला,
सुधा सिंची जो कीं जन सकळ काळाग्नि पडिला. ३९
तुझे स्वाधिष्ठानी शुचि कमळिं संवर्त विलसे;
तया संवर्तातें स्तवुं सुसमया भक्तिसुरसें;
जयाचे क्रोधाग्नी सकळ भुवनें शीघ्र जळती,
दयार्द्रा दृष्टीनें निवविसि जनां, शीतळवती. ४०
तवाधारीं शंभू तुजसहित लास्यार्थ विनटे,
नमूं त्याला प्रीती, नवरसमहातांडवनटे.
उभ्याभ्यामेताभ्यामुभयविधिमुद्दिश्य दयया
सनाथाभ्यां जज्ञे जनकजननीमज्जगदिदम्. ४१
किरीटीं माणिक्योज्वळ तपन बारा झळकती,
जयाचे छायेचां स्फुट शशिकळा पैं मिरवती.
स्तवी जो तद्ध्यानें उदित भुवनी कौतुक जनां,
सुरेंद्राचें कीं हें धनु म्हणति संबद्धधिषणा. ४२
हरू माझ्या मोहा लघु तुळुनि इंदीवरवना,
सुगंधें सुस्निग्धें तव कबरिभारो भति घना;
सुगंधप्राप्तीला सहज सुरवृक्षादिकुसुमें
स्वयें येती स्पर्शास्तव कबरिभारीं तव, उभे. ४३
करू मत्कल्याणा मुखकमलसौंदर्यलहरी,
प्रवाह स्रोत्राचा सम सरळ सीमंतशिखरी.
स्फुरे जो सिंदूर प्रबळकबरीभारतिमिरीं
जसे बालार्काचे किरण निगडीबद्ध चिकुरीं. ४४
स्वभावें जी वक्रा, भ्रमरसम केशावळि दिसे,
रुळे वक्त्रांभोजीं, ललित तव वक्त्रेंदु विलसे.
हॅंसे अन्योन्यातें रदजनितकिंजल्कसमता
सुगंधें त्या मत्तभ्रमर शिवचक्षू निजहिता ४५
ललाटीं लावण्य स्फुरत सम चंद्रार्ध भुवनीं,
दुजा तो अर्धेदो, उभय उफराटें मिळवुनी,
सुधालेपें खंडद्वय करुनि एकत्र जडला,
जसा दैदीप्यश्री सकळ शशि राके उगवला. ४६
भ्रूवाभंगें भंगे भुवनभय तें भ्रूस्मरधनू,
चिला तो नेत्रांचा भ्रमरकुळपंक्तीसम तनू.
करें दक्षेंहूनी इतर करिं घ्याया धरि मनीं,
न लाहे मघ्यांत स्वमुषिस प्रकोष्ठीं कवळुनी. ४७
दिनाचा कर्ता तो दिनकर तुझा नेत्र उजवा,
निशी डाव्या नेत्रीं समुदय करी चंद्र बरवा,
तृतीया दृष्टीनें लघु करुनि हेमांबुजरुची
धरी संध्याकाळीं दिवसनिशिसंधी शुभ शुची. ४८
विशाळा, कल्याणी, विलसति अयोध्याकुवलया,
कृपाधारा धारा नगरि, मथुरा भोगनिलया;
अवंती मध्यस्था बहुनगरि विस्तारजयनी
तुझी त्या त्या नामीं विहरत असे कीर्ति, जननी. ४९
कवींचा संदर्भ स्फुट सुमनगुच्छद्वय बरे,
कटाक्षें कर्णांतीं भ्रमरतनुवद्भासति खरें;
न सोडी त्वत्दृष्टी नव नव रसां लुब्ध म्हणुनी,
वृथा ईर्षा वाहे शिव नयन आरक्त करुनी. ५०
शिवाला श्रृंगारें मुदित, इतरां क्रूरवदना,
सरोषा गंगेसीं, शिवचरितआश्चर्यरचना;
बिहाली सर्पाला कमळवनशोभाविजयिनी;
सहासा दृष्टीतें सखिजनिं दयार्द्रैकनयनीं. ५१
कटाक्षें करेणांताक्रम गरुडपक्षद्युतिगुणें
शिवाचा चित्तैक्या चळण करिती चंचळपणें.
लसन्नेत्रोपांते हिमगिरिकुलोत्तंसकलिके,
तुझ्या कर्णाकृष्टें स्मरशरविलासां करि निकें. ५२
त्रिवर्णांतें केलें त्रिनयन ( सु ) नीलांजनकळे,
द्विजादी हे जाती, निरिशरमणी, चित्तविमळे,
त्रिदेवां कल्पांतीं पुनरपि समुत्पन्न करिसी,
रज:सत्वोत्पत्ती तमगुणविहारस्थिति तसी. ५३
कराया पुण्यात्मा मज, शिवपराधीनमनसे,
त्रिनेत्रीं सत्कांती अरुण, धवल, श्याम विलसे.
नदस्वामी शोणाधिप, सुरधुनी, सूर्यतनया
त्रितीर्थांचीं स्नानें करविसि परब्रह्मनिलया. ५४
तुझ्या कानीं चाडी नयन करिती मीनविकृती,
भयें त्या मासोळ्या निशिदिनिं जळामाजि बुडती.
दिनांतीं बद्ध श्री स्वदशपुटकीं नीळ कमळें
उष:काळीं सोडी प्रविशति पुन्हा शर्वरिबळें. ५५
निमेषोन्मेषानें प्रळयउदय, श्री, त्रिभुवना,
असें कोण्ही साधू वदति, गिरिजे, सत्यवचना.
निमेषें पैं होतो सकळभुवनध्वंस सहजें
म्हणोनी त्या रक्षा करिसि अनिमेषेंचि, गिरिजे. ५६
सुदीर्घा दृष्टीनें लघु करुनि नीलांबुजछवी,
दयार्द्रे, त्या दृष्टी झडकरि दवार्तासि निववीं.
तयानें मी धन्य क्षिति; वरि नये हानि तुजला;
वनीं, गेहीं जैसा हिमकिरण साम्यें उगवला. ५७
सुरम्यें कर्णाग्रें, गिरिवरसुते, वक्र दिसती,
धनुष्यें कामाचीं, कवतुक न कोण्हासि करिती ?
दृशापांगें सांग श्रवणपथ उल्लंघित असे;
शिवाचा लक्षातें कुसुमशरसंधान विलसे. ५८
प्रभा गल्लीं तेथें प्रतिफळित तांटकयुगळें,
चतुश्चक्रीं वक्रीं मदनरथ मानूं मतिबळें;
शिवे, चकें दोन्ही रविशशि, महीचा रथ लसे,
महायोद्धा मार प्रमथपतिसीं स्पर्धत असे. ५९
महावाग्देवीचा सुरसरससूक्तें नवरसां
करीसि पानातें श्रवणचषकीं स्वादु सुरसा.
चमत्कारश्लाघ्यें धुनित शिरसा कुंडलगणीं
झणत्कारें तारें प्रतिवचन आश्चर्य करणी. ६०
तुझा नासावंश, ध्वज हिमगिरीचा सबळ कीं,
फळप्राप्ती आम्हां अभिलषैत योग्या करु निकी.
जयाश्वासें मुक्तामनि शिशिरतेनें निपजती,
बहिर्वृद्धि श्रीनें तव अधरिं मुक्तामणि, सती. ६१
स्वभावें आरक्ता, जननि, तव दंतालि विलसे,
वदावें साम्यत्वा तरि लघुगुणी विद्रुम दिसे;
लसद्बालार्काची द्युति, अरुणिमा कोठुनि तया ?
नसे लज्जा कोण्हा अधरिं तुळितां विद्रुम जया ? ६२
स्मितास्यें चंद्राभें लसितमुखज्योत्स्नामृत पितां
जकोरांला जाली अतिमधुरते चंचुजडता;
म्हणौनि चंद्राचे अमृतकिरणां आम्लरुचिनें
पिती स्वच्छंदें ते निशिसमयीं कांजीकमतिनें. ६३
श्रमार्ता, तूं माता, पतिगुणकथा नित्य कथितां,
जपापुष्पा ऐशी, जननि, तव जिव्हा निरखितां
जिये अग्रीं वाणी स्फटिकसदृशा बैसुनि बरी
तनू माणिक्याची स्फुरत परिणामीं द्युति धरी. ६४
रणीं दैत्यां सर्वां जिणुनि त्यजिती टोपकवचें,
श्रमार्ता, सूर्यास्तीं त्रिपुरहरनिर्माल्य न रुचे;
विधींद्रोपेंद्रादी हळुचि शशिकर्पूरधवळें,
प्रसादातें घेती, जननि, तव तांबूलशकलें. ६५
स्ववीणा वाग्देवी धरुनि शिवमाहात्म्य कथितां,
महागानारंभीं, जननि, तव वक्रांबुजगता
निघे वाणी सप्तस्वरमधुर, तैं लज्जितवती
स्वयें वीणा झांकी निजवसनिं वाणी भगवती. ६६
भुजाश्लेषीं ग्रीवा तव, गिरिसुते, कंटकवती
शिवालागीं भासे मुखकमळनालाकृतिमती.
स्वयें गौरा कालागरुबहलपंकानुकळिका
मृनालाली जैसी विलसत गळां हारलतिका. ६७
त्रिरेखा कंठीचां, मधुरतरगानैकनिपुणे,
निवाहीं श्रीशंभुग्रथितकरबंधत्रयगुणें,
प्रबंधें सद्गीतें उठति शुभ सप्त स्वर, उभे,
त्रयग्रामें सप्तस्थितिउदितमूर्च्छा अनुगमे. ६८
मृनाली कंजाची, मृदुतर तशा श्रीभुजलता;
तिन्ही, चार्ही वक्रीं स्तवि विधि शिरच्छेद घडतां,
नखें रुद्र, छेदी प्रथम शिर, तें येकचि शिरीं
करें रक्षा केली, चहुं शिरिंहि तैसे कर धरी. ६९
नखज्योत्स्नाकंजा लघुतर गणी हास्य करुनी,
कराब्जाची शोभा; स्तवन करुं कैसी स्ववदनीं ?
कदाचित् येकांशें कमळिं उपमा, तेहि विकळा,
परि क्रीडे लक्ष्मीचरःणतळलाक्षारुण दळां. ७०
पिती येके काळीं स्तन गणपति, स्कंद बरवे,
हरू तें मत्खेदा स्रवत मुखिं जें दुग्ध मिरवे.
पहातां जो शंकें गजमुख उरीं कुंभरचना,
स्वकुंभस्पार्शानें करि जननिला हास्यवदना. ७१
तुझे वक्षोज, श्री, अमृतरसमाणिक्यघट ते,
मनीं माझ्या भ्रांती किमपि न वसे, हो गिरिसुते;
म्हणौनि तत्पाना करिति वधुसंसर्ग त्यजुनी
कुमारत्वें अद्यावधि गणपति, स्कंद, जननी. ७२
गजाचे कुंभांतर्गतजनित मुक्ताफळमणी,
समारंभें हारावलिग्रथित सूत्रें शुभगुणीं,
कुचीं शोभे त्यांची द्युति, अधरबिंबीं प्रसवली,
जसी शंभोकीर्ती त्रिभुवनिं विचित्रा मिरवली. ७३
तुझ्या स्तन्यें, धन्ये, हृदयिंहुनि दुग्धांबुधि, शिवे,
वहातो त्या पोटीं अमृतरस वाग्देवि मिरवे;
कृपेनें तत्पान द्रविडशिशुलागीं करविसी,
कविप्रौढांमध्यें नवरसिक काव्यें वितरिसी. ७४
हरक्रोधज्वालाज्वळित मदनें त्रास धरुनी
सरा नाभीमध्यें पतन करि दाहार्तिशमनीं,
उठे त्या धूमाची सरळ लतिका तेथुनि, शिवे,
तियेतें रोमाली जन वदति जाणोनि बरवें. ७५
जशी कालिंदीची कृशतरतरंगाकृति दिसे,
अनोपम्या, अंबे, तव कुचतटीमध्ये विलसे.
सुघर्षे अन्योन्यें कुचकलशिंची अंतरचरी
तनू आकाशाची प्रविशत दिसे नाभिकुहरीं. ७६
स्फुरे वल्ली रोमावलि, तव कुचारंभक फळें,
अळें कामाग्नीचें, सुरतटिनिआवर्त, विमळे,
रतीचा लीलेचें सदन अथवा नाभि, गिरिजे,
शिवाचे सिद्धीचें विवर नयनानंद सहजें. ७७
स्वभावें जे सूक्ष्मा स्तनतटभराक्रांत नमली,
म्हणोनी नाभीचां त्रिवळि उदरामाजि शिरली.
सखे, ऐसें भासे तटिनितट तेथें तरु जसा,
चिरस्थायी तैसी कटि कुशल राहो, ध्रुव तसा ७८
स्तनाचां घर्मानें तटघटित चोळीहि तुटते,
तथा बाहूघर्षे ललित करिती हेमघट ते;
तयांला रक्षाया कटिअवनकार्या समजुनी
स्मरें केले बंध त्रिवळिलतिका रज्जु म्हणुनी. ७९
नितंबस्थूलत्वें, गिरिवरसुते, झांकिसि धरा,
महिचां विस्तारा लघु क अरुनि हा निश्चय खरा.
नितंबीं यासाठीं सकळ भुवनां साम्य गुरुता,
तयाचां प्राग्देशीं लवविशि लघुत्वा स्वललिता. ८०
गजाची शुंडा, कीं कनककदळी, दोन उपमा
स्फुरे जंघायुग्मीं परि उभयही तुच्छमहिमा.
सतीधर्मे शंभुप्रणति करितां वृत्त, कठिणें
फळें आलीं जानू विबुधकरिकुंभद्वयगुणें. ८१
मृडाला जिंकाया द्विगुण शर केले, गिरिसुते,
तुझ्या दों जंघांचे तरकसभरी काम पुरते.
जया अग्रीं शोभा दशहि शर पादांगुळिपणें,
नखाग्रें तीं भल्ल सुरमुकुटसंघर्षितगुणें. ८२
सदा वाहे ज्यांतें निगम शिरसा भूषणविधी,
तुझीं तीं पादाब्जें मम शिरिं समर्पीं, सदयधी.
जया अर्घ्ये गंगा पशुपतिजटाजूट विलसे,
किरीटीं विष्णूचां द्युति अरुणरत्नांकित दिसे. ८३
‘ नमो ’ बोलों वाचे नयनसुखकारी पदयुगा
तुझ्या, लक्षारंगें अनवरतरंगीत सुभगा;
अशोका वृक्षांचें वनहनन इच्छी शिव मनीं
अती ईर्षावेशें मृदुपण गुणेच्छा म्हणवुनी. ८४
विनोदें सापत्नी स्मरत शिवतो क्रोध तुजला,
नमी तेव्हां भाळीं चरणयुगळें ताडिती भला,
स्मरोनि पूर्वींचे निजदहनवैरासि बरवें
तुलाकोटिक्काणें स्मरकिलकिलीनूपुररवें. ८५
हिवामध्यें जातां हिमगिरिगुहाक्रांत विमळा
निशी निद्राभागीं उषसि अपराण्हीं समकळा;
लघू कंजें लक्ष्मी पदकमळिं भक्तासि विलसे,
पदाब्जें अंबेची हॅंसति कमळां, चित्र न दिसे. ८६
विपत्तीतें नाशी पदकमळकांती तव भली,
कवींद्रीं ते कैसी कठिणकमठीपृष्ठ तुळिली ?
मुदा रुद्रानें जे कर धरुनि लग्नीं मिरविली,
महापाषाणीं ते, सदयहृदये, कां बसविलीं ? ८७
स्त्रिया स्वर्लोकींच्या, करनखशशी लाजवि तयां,
तुझीं श्रीपादाब्जें हॅंसति सुरवृक्षां गुणधियां;
फळें त्यांचीं इच्छासमचि, पदकंजीं बहुफळें;
दरिद्राला भद्रार्पण करिती लक्ष्मी निजबळें. ८८
वदे कोण्हे काळीं, जननि, पद प्रक्षालुनि तुझें,
विमिश्रें आलक्तें विमळ जळ विद्यार्थि सहजें
पितां तो वाग्देवीमुखकमळतांबूलरस कीं
करे काव्यें मूका नवारसपदप्रायसयमकीं. ८९
तती पादाब्जांची अभिनव सिकाया परिचया,
अहो, हंसीं केलें तव सदनिं वास्तव्य सुधिया.
न सोडी पादाब्जें रणतमणिमजीरनिकरें,
बरी शिक्षा घती स रि ग म न सप्तस्वरभरें. ९०
विधी, विष्णू, रुद्रेश्वर तव पलंगाकृति धरी,
शिव अस्वच्छच्छायाकपटपटिं आच्छादन करी,
तुझ्या कांतीमिश्रें शिव अरुण भासे कवतुका,
विनिर्मीसी नेत्रां बहुलरसश्रृंगाररसिका. ९१
स्वकेशीं वक्रत्वें, ललितवदनें, मंदहसितें,
मृदुत्वें गात्रांशें, कठिणकुचपाषणभरितें.
कटि क्षीणा, जंघा विपुल जघना, सर्व सुगुणा,
जगद्रक्षा शैवी जयति करुणातर्क्यअरुणा. ९२
कलंकी कस्तूरी, रजनिपति बिंबात्मकजळें,
कळांचा कर्पूरें मरकतमणीपात्र घडिलें.
सुपात्रीं त्वत्पाना प्रतिदिनिं नभीं रिक्तकुहरी
विधी वारंवारें सितअसितपक्षीं जळ भरी. ९३
शिवाची तूं राणी, म्हणुनि तुझिया दिव्य चरणीं
पुजेची मर्यादा चपळहृदयां दुर्लभपणीं.
तथा ते ब्रह्मेंद्रादिकसुरवरांलागिं अतुळा,
तव द्वारीं सिद्धी नटति अणिमाद्याहि सकळा. ९४
पदांभोजीं आला मणिमुकुरतेजीं दिनमणी,
भयें त्वद्वक्त्राब्जीं स्तिमित कर केले मृदुगुणीं.
यथा वक्त्रांभोजीं प्रतिफळित आदर्श उदरीं
निरातंका होसी शशि निजहृदंभोरुहपरीं. ९५
विधीकांता ध्यातां बहुत असती सत्कवि जनीं,
धनाढ्यत्वें आम्हीं म्हणविति असों श्रीश भुवनीं.
विना शंभू, अंबा, सति, तव कुचालिंगन करी,
असा कोण्ही नाहीं, कुरबकहि जे स्पर्श न करी. ९६
तुझ्या अष्टौ सिद्धी घृणिहि अणिमाद्या समुदिता
तदैक्यें जो चिंती त्वमहमिति मातानुभवता,
त्रिलोकींचा सिद्धी तृण सम तयाल चित्र न कधीं,
महासंवर्ताग्नी मुकुटिं करि नीराजनविधी. ९७
विधीची वाग्देवी गृहिणी वदती आगम मती,
हरीकांता लक्ष्मी, हररमणि हे पार्वति सती,
तुरीया तूं कोण्ही अकळ मुनिदुर्गम्यकलना,
महामाये, विश्व भ्रमविसि परब्रह्मललना. ९८
स्तनें पीनोत्तुंगें हसितवदनां(भो)जरसिकें
कटाक्षें कंदर्पाकृतिशतसहस्त्रद्युतिनिकें
हरालागीं भ्रांती हृदयिं पडते, हे तनु, उमा,
तवाकारें भक्तां परिणाति असी ध्यानमहिमा. ९९
महावाणीलक्ष्मीपति विधिहरि श्रेष्ठ् जगतीं
रतीपातिव्रत्त्या मदनसमरूपें ढळविती,
सुटे अष्टौ पाशीं, अनुभवि परब्रह्म सहजें,
चिरंजीवी तो कीं, जननि, तुजला जो नर भजे. १००
निधे, संवित्स्मेरे, अगणितगुणे, नीतिनिपुणे,
निराकारज्ञाने, यमनियमचित्तान्वितगुणे,
मिधीलिप्यूझ्झीते श्रुतिउपनिषत्संस्तुतपदे,
निरातंके, अंगीकृत करिं जगीं मत्कृति मुदे. १०१
ज्वलज्वालादीपीं दिनपतिसि नीराजन जसें,
सुधाद्रावी चंद्रोपळजळलवें अर्ध्यहि तसें;
स्वनीरें अब्धीचां उदधिसिं किजे तर्पण जनीं,
तुझ्या, वाग्देवी, तूं स्तुति करविसी तेंवि, जननी. १०२